‘अहो, बंद करा तो टीव्ही. कितीदा तुमचे तेच तेच वाक्य बघणार आहात तुम्ही. आयुष्यात पहिल्यांदा संधी मिळाली म्हणून इतके हुरळून जाण्याचे कारण काय? आणि संधी कशामुळे मिळाली तर उत्कृष्ट मिशा राखल्या म्हणून. चर्चेचा विषय काय तर रामाच्या मूर्तीला मिशा हव्या की नको. तुमचा बाईट घेतला दोन मिनिटांचा. दाखवला तीस सेकंदाचा, त्यातले तुमचे वाक्य काय तर ‘आत्याबाईला मिशा असत्या तर त्यांना काका म्हटले असते ’ ही म्हण कशी लोकप्रिय ठरली ते. आता त्या मूर्तीचा या म्हणीशी काय संबंध? तरीही टीव्हीवर दिसतो म्हणून दिवसभर ही बडबड वारंवार ऐकत बसलात. कोण कुठले ते भिडे. पावसाळ्यात तसाही त्यांना कामधंदा नसतोच म्हणे! दिली मिशीची पुडी सोडून. आणि या टीव्हीवाल्यांना तर कुठला धरबंदच उरला नाही. सुपारी चघळावी तसे विषयच चघळतात. आमच्या हृदयी वसलेला राम यांना इतका स्वस्त वाटला की काय?’ काकूंचा दांडपट्टा ऐकून तात्या गारद झाले. एव्हाना त्यांच्या मिशीची वर असलेली टोके खाली झुकू लागली. तरीही धीर एकवटून ते बोलले. ‘अगं पण मिशी ही पराक्रमी पुरुषाचे लक्षण समजली जाते. दुर्दैवाने कधीकाळी राम रेखाटताना ती दाखवली गेली नाही.. आता मंदीरच उभारताय तर मिशीची आठवण करून देण्यात गैर काय?’ हा युक्तिवाद ऐकताच काकू जाम भडकल्या. ‘राम पराक्रमी होता. मर्यादा पुरुषोत्तम होता हे मान्यच, पण मिशी नाही म्हणून त्याचा पराक्रम कमी जोखला जाणार आहे का? आम्हाला तसाच राम आवडतो. लोभस, राजबिंडा. पराक्रमाचे म्हणाल तर तुम्ही आयुष्यात मिशी सांभाळण्यापलीकडे काय केले? रोज सकाळी त्या मिशीला वळण लावण्याच्या नादात कित्येकदा दूध ऊतू गेले. मुलांच्या शाळेच्या बस चुकवल्या. आगाऊ आरक्षण करूनही रेल्वे चुकवली. मिशीला पीळ देत पराक्रमी असल्याच्या थाटात ऑफिसला जायचे आणि साहेब रागावले, मेमो दिला की घाबरून रात्रभर झोपायचे नाहीत. अजूनही घरात साधी पाल दिसली तरी तुमची घाबरगुंडी उडते. आता सांगा पराक्रमाचा व तुमचा काय संबंध?’ काकूंच्या चौफैर वस्त्रहरणाने तात्यांची भंबेरीच उडाली. तरीही उसने अवसान आणत ते म्हणाले ‘अग, पण आयुष्यात प्रथमच आपला नवरा टीव्हीवर दिसला याचा आनंद तुला व्हायला नको का? ’

‘आग लागो त्या तुमच्या टीव्हीला. इतक्या वर्षांनी राममंदीर होत आहे. ते कसे असेल यात साऱ्यांना रस आहे. रामाला मिशा हव्यात की नको यात नाही. तरीही कुणी एकाने बुडबुडा सोडला की लगेच त्याच्या मागे धावायचे. मिशीआख्यान सांगायचे. परमेश्वराला मिशी चिकटवण्याचा हा उद्योग उथळच आहे.. पुरुषी मानसिकतेला बळ देणारा. मिशी असलेले तेवढेच शूर बाकी भेकड, हा वाह्यतपणा नाही काय? स्त्रिया काय शूरवीर नव्हत्या? मी तुमच्या आयुष्यात नसते तर काय झाले असते याचा विचार करा जरा’ आता मात्र तात्यांना टीव्ही बंद करण्याशिवाय पर्यायच उरला नाही. ही नसती तर आपले जगणे कठीण झाले असते, मिशी असून सुद्धा! याची जाणीव त्यांना पुन्हा एकदा झाली. तरीही त्यांचे मिशीप्रेम त्यांना स्वस्थ बसू देईना! अंगात बळ आणून त्यांनी विचारलेच ‘आज रात्री अमोल पालेकर- उत्पल दत्तचा मिशीपुराणवाला ‘गोलमाल’ बघायचा का? त्यांच्या प्रश्नातला निरागसपण बघून काकू नरमल्या, हसल्या व म्हणाल्या ‘ चला तुमच्यासाठी दहाव्यांदा बघू ’ तिचा होकार ऐकून सुखावलेल्या तात्यांनी मिशीला पीळ देण्याचे कटाक्षाने टाळले.