काम करायचे, तर घराबाहेर पडावे लागते. काम करायचे, तर इथून तिथे जावे लागते. असे फिरण्यासाठी खर्च येतो. म्हणजे काम करायचे तर खर्चही करावा लागतो.  हे सारे अगदी कालपर्यंत खरे होते. ‘कोविड-१९’ ऊर्फ करोना विषाणूचा फेरा आला आणि साऱ्यांना घरात बसावे लागले, तेव्हा मात्र हे सारेच तर्क पार उद्ध्वस्त झाले. एका जागी बसूनही माणसे काम करू शकतात, हे सिद्ध  होऊ लागले. पाठोपाठ लगेच, प्रदूषण कसे घटले आहे आणि पक्षी कसे किलबिलाट करीत आहेत किंवा आकाशही कसे निळेभोर दिसते आहे याची चर्चा होऊ लागली; पण मुख्य मुद्दा बाजूला ठेवून भलत्याच गोष्टींची चर्चा करायची, हे अलीकडल्या काळात फारच अंगवळणी पडल्यामुळे आर्थिक मुद्दे बाजूला पडले. आर्थिक मुद्दे चर्चेत आले, पण ते कुणाचे किती नुकसान होणार वगैरे रडगाण्यांच्या स्वरूपात. अशी रडगाणी खासगी कंपन्यांनी गायलेली असोत, छोटय़ा उद्योगधंद्यांनी आळवलेली असोत वा तमाम राज्य सरकारांनी एका सुरात म्हटलेली असोत.. ती काही सकारात्मक चर्चा ठरत नाही. यावर कुणी म्हणेल की, जगाचेच सारे नकारात्मक चालले आहे तर आपण काय सकारात्मक बोलणार; पण आपण टाळय़ा वाजवल्या, मेणबत्त्या लावल्या तेव्हाही जगाचे काही तरी नकारात्मक चाललेच होते की नाही? तेव्हा आपण सकारात्मक आर्थिक मुद्दय़ांचा शोध सुरूच ठेवायला हवा. शोधा म्हणजे सापडेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय सापडेल?

जे चटकन सापडणारे आणि अवघ्या देशाला पटणारे उदाहरण आहे, ते आधी पाहू. ‘‘घरून काम’ केल्यामुळे खर्च वाचतो,’ हे आपले गृहीतक आहे. ते सिद्ध करण्यासाठी खरेखुरे आणि मोठेमोठे आकडे आहेत, ते असे : पहिल्या वर्षी ३१७.१९ कोटी रु. खर्च; दुसऱ्या वर्षी ३४२.३२ कोटी रु. खर्च; तिसऱ्या वर्षी ४५५.०५ कोटी रु., चौथ्या वर्षी ४४१.०९ कोटी रु., पाचव्या वर्षी ४७५.३७ कोटी रु; पण सहाव्या वर्षी ८१.२१ कोटी रुपये खर्च. म्हणजे सहा वर्षांमध्ये मिळून एकंदर २११२.२३ कोटी रुपये खर्च. त्याची सरासरी येते २११२.२३ भागिले सहा म्हणजे ३५२.०३ कोटी रुपये दरवर्षी. त्याला बाराने भागले की दरमहा खर्च दिसेल २९.३३ कोटी रुपये. हे सहाही वर्षांचे आकडे भारताचे ‘विदेश मंत्रालय’ आणि ‘पीएमओ’ यांनी अत्यंत पारदर्शकपणे दिलेले आहेत. फक्त सहाव्या वर्षी पंतप्रधानांच्या विमानाची देखभाल-दुरुस्ती आणि हॉटलाइन यांचा खर्च समाविष्ट न झाल्यामुळे, शिवाय त्या वर्षीचे अखेरचे चार महिने एकही परदेश दौरा न झाल्यामुळे आकडा काहीसा लहान दिसतो इतकेच; पण आपला मुद्दा निराळा आहे. ‘घरून काम केल्यामुळे दरमहा २९.३३, म्हणजे पाच महिन्यांत १४६.६८ कोटी रुपये वाचले’ हा तो मुद्दा!  ही सुमारे १४७ कोटींची बचत म्हणजे थोडीथोडकी नाही.. दिल्लीतले भाजपचे एक श्रीमंत (माजी क्रिकेटपटू) उमेदवार गौतम गंभीर यांची आयुष्यभराची मालमत्ता १४७ कोटी रुपयांची होती. तेवढी बचत झाली, अवघ्या पाच महिन्यांत!

आपणा बहुतेक साऱ्या सर्वसामान्य नोकरदारांचाही आता घरून काम पद्धतीचा एक महिना पूर्ण झालेला आहे. तेव्हा आपापल्या खर्चात किती बचत झाली याचे गणित जरूर करावे.. मग महागाईचे काही वाटेनासे होईल!

मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta ulta chasma article on work from home abn
First published on: 23-04-2020 at 00:00 IST