त्ये मिरजेच्या लक्ष्मी मार्केटात काळी भावली लटकावनारं उमेदवार येडं हाय.. कोकनात कुनी तरी भानामती करतया म्हंताना येकजन कुनी तरी तिकडं ग्येला आनि करनी करून निवडनुकीच्या फडात उतरला, तर त्येच्या करनीला त्वांड देन्यासाटी ह्य़े येडं लक्ष्मी मार्केटात काळी भावली लटकावून बसलंया म्हना की.. आमाला इच्यारला असता, तर आमी त्येला लई भारी गुरू सांगिटला असता. मुंबईत नुस्ती चक्कर मारला असता, तर लोकल ट्रेनच्या डब्ब्यात बाबांच्या झैराती बगून त्येला बरोबर उलटी करनीवाला गंडा घावला आस्ता. पन त्ये येडं, रस्त्यावं भावली टांगून बसलया.. हितं मुंबईत बाबा खान बंगाली,  बाबा रहमान बंगाली, आसं किती तरी बाबा, वाट्टंल त्या समश्या चिटकीसरशी सोडवत्यात, वर खुल्ला चॅलेन्जबी देत्यात. हमारा किया हुवा काटने वाले को दस हज्जार का इनाम आसंबी लिवत्यात. मूठकरनी, वशीकरन, सौतन से छुटकारा, पॉलिटिक्स में परेशानी, प्रेम समस्या, मनचाहा प्यार पाने का अक्सीर इलाज.. किसी भी समस्या का तीन मिनट मे समाधान करनेवाले पासरीभर बाबा मुंबईत बसत्यात.  पुरोगामी म्हाराष्ट्रात जादूटोनाविरोधी कायदा झाला त्येच्या लई आदुगरपास्न समद्या बाबांनी धंद्याचं लायसन काडलया म्हंत्यात. म्हंतानी, त्येंच्या झैरातीला कुनी धक्का लावत न्हाईत, आनि झैरातीवर खुल्ला मौबैल नंबर द्यूनसुदीक, ह्य़े बाबा घावत न्हाईत. बाबाचा खुल्ला चैलेन्ज आसला, तरी समाधान न्हाई झालं तं वापस बाबाकडं ग्येला तं उलटी करनी हुईल म्हनून भ्या वाटतं म्हंताना, गुपचूप बसत्यात. त्ये लक्ष्मी मार्केटात काळी भावली लटकावून भानामती करनारं उमेदवार आमच्या मुंबईत आलं आसतं, तर त्याला असा येकादा बंगाली बाबा घावला आस्ता की ल्येका.. मागं, म्हंजी, झालं बगा चारपाच म्हैनं.. पुन्याशेजारच्या पिप्री-चिचवडच्या निवडनुकीत, थितं तिसऱ्या प्रभागात येका बाईमानूस उमेदवारावर आशीच काळी जादू केल्याली बगा कुनी तर.. जितंजितं बुथं लावल्याली, तितंतितं, काळ्या भावल्या लटकावल्याल्या.. लई जोरदार झाल्ती बगा ती इलेक्शन. आसं काय तर केलं न्हाई तर राजकारनाला मजा न्हाई येत..  राजकारनात बाबास्नी लई चलती आसतिया.. मागं, त्ये आंधश्रद्धावालं दाभोलकर, त्येचं खुनी पकडन्यासाठी पोलिसांस्नीपन प्लांचेट करावं लागलं व्हतंच की.. मंत्रालयात कायकाय मंत्र्यांच्या केबिनातबी, काय तर गुंडाळल्याली कापडं लटकताना दिसत्यातच ना.. मुंबईत समदं नाकं आनि समद्या शिगनलवर, आवसंपुनवंला, लिंबू-मिरच्यांचं घाऊक मार्केट हुतंय.. घराला म्हनू नको, गाडीला म्हनू नको, आनि सार्वजनिक संडास-मुतारीच्या दरवाज्यालाबी, लिंबू-मिरच्या लटकावल्याला दिसत्यात. जादूटोनाविरोधी कायद्यावरच करनी करून सोडत्याल येवडं पावरबाज बाबा-बुवा मुंबईत भेटत्याल म्हंताना, कोन तर येडं, कोकनात ग्येलं, आनि त्ये आऊटडेट झाल्याला भगतास्नी गाटून काय तर भानामती करून आलं म्हंताना ह्य़े त्येच्यापेक्षा श्यानं, रस्त्यावं भावल्या लटकावत आसंल, तर त्येच्या गालाखाली काजळ उमटवायची गरज हाये बगा.. पुरोगामी म्हाराष्ट्रात निवडनुका जिकन्यासाटी काळ्या भावल्या, भानामती आनि मूठकरनी करनारं पावरबाज बाबा आसतील, तर फुडच्या टायमाला, लिंबू-मिरच्या आनि काळ्या भावल्यांचा बाजार जोरात येनार म्हना.. आता ती लटकल्याली काळी भावली टेन्शनमधी आसनार.. येवडं करूनबी करनीचा उतारा पडला न्हाई, तर तिचं काय खरं न्हाई..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra black magic act maharashtra anti superstition act andhashraddha nirmulan act
First published on: 23-07-2018 at 02:44 IST