सप्ताहान्ताचा दिवस असल्याने अंमळ विरंगुळा हवा म्हणून वेगळे काही तरी शोधण्याच्या धडपडीत असताना, खळखळून हसावे असे वाटू लागल्याने काही राजकीय बातम्यांकडे वळलो असता अचानक एक विनोद समोर उभा ठाकला आणि त्यावर हसत असताना, अनेक नवे-जुने सर्वात मोठे विनोद मनाला गुदगुल्या करू लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच कृष्णेच्या घाटावर यशवंतरावांच्या विचाराचे पाईक असल्याचे सांगून या वर्षीचा सर्वात मोठा विनोद केल्याचे महाराष्ट्राचे मोठे साहेब शरद पवार यांनी म्हटल्यावर कृष्णेचा तो घाट डोळ्यासमोर तरळू लागला. याच घाटावर काही वर्षांपूर्वी थोरल्या साहेबांच्या पुतण्याने, पक्षी, तत्कालीन जलसंधारण मंत्री असलेल्या अजितदादा पवार यांनी एका विनोदाबद्दल प्रायश्चित्त घेतले होते तेही आठवले आणि आम्ही खदखदा हसू लागलो. चांगले विनोद शोधायचे असतील तर राजकारणाच्या वर्तुळात फेरफटका मारावा. तेथे विनोदाचे बगीचे फुललेले असतात. कृष्णेच्या काठावर फुललेल्या या दोन विनोदांच्या गुदगुल्या हसवत असतानाच आम्हाला अलीकडेच ऐकलेला एक विनोद आठवला. खरे म्हणजे, तो विनोद झाला तेव्हाच आम्ही त्यावर खळखळून हसलो होतो. पण पुढे जेव्हा जेव्हा तो आठवेल तेव्हा न विसरता हसायचे असे आम्ही गंभीरपणे स्वत:स बजावलेले असल्याने तो विनोद पुन्हा आठवून आम्ही आजही हसलो. राजकारणात एखादा विनोद हा त्या वर्षांतील सर्वात मोठा विनोद वाटावा, तोवर लगेचच त्याहूनही मोठा विनोद जन्माला येतो आणि अगोदरचा सर्वात मोठा विनोद त्यापुढे अगदीच छोटा वाटू लागतो. जेमतेम २० दिवसांपूर्वी चिंतन शिबिरात बोलताना, २०१९ मध्ये शरद पवार पंतप्रधान होणार असे भाकीत प्रफुल्ल पटेल यांनी केले, तेव्हा तो सर्वात मोठा विनोद असावा असे आम्हाला वाटले होते. गेल्या वर्षभरात एक विनोद वारंवार होत असला तरी त्याचे हसवणूक मूल्य अपरंपार असल्याने, वेळ पडल्यास सत्तेवर लाथ मारू हा या वर्षांतील सर्वात मोठा विनोद आहे, असे काही जण म्हणत असल्याने आम्हीही त्यावर विश्वास ठेवून आहोत. काही विनोद शिळे होतच नाहीत. अशा विनोदास आम्ही प्रामाणिकपणे दाद देत असतो. नारायण राणे यांनी स्वाभिमान पक्ष काढला, तेव्हाही हसावे असे आम्हास वाटले होते. पण आता हसण्याशिवाय इलाजच नाही. एखाद्या स्वाभिमानी नेत्यास एखाद्या पदासाठी लाचार झालेले पाहणे हा विनोद मानला, तरी त्याला कारुण्याची झालर आहे. आणि कारुण्याची झालर असलेले विनोद अधिक दाहक असतात. फेरीवाल्यांचा प्रश्न आमच्यामुळे सुटला असे उद्धवजींनी घाईघाईने घेतलेल्या तीन मिनिटांच्या पत्रकार परिषदेनंतरही अनेकांना तो विनोद वाटला होता. पण असे चुटकुले राजकारणात होतच असतात. त्यातून एका विनोदाची सर्वात मोठा विनोद म्हणून निवड होत असते. जाणत्या राजाने असा सर्वात मोठा विनोद निवडला, तेव्हा खदखदून हसण्यावाचून गत्यंतरच नाही!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi articles on sharad pawar
First published on: 27-11-2017 at 02:25 IST