‘नॅशनल पेपरवालोंको कुछ भी लिखने दो. मंत्री, आमदार व स्थानिक पत्रकारांमध्ये नवीन वर्षात क्रिकेटचे प्रदर्शनी सामने होतील म्हणजे होतील. यातूनच खेळाला उत्तेजन मिळते. तेव्हा टीकेकडे दुर्लक्ष करत उत्तम दर्जाचे साहित्य खरेदी करून सामने यशस्वी होतील याकडे लक्ष द्या. कोणत्याही स्थितीत झारखंडमधून दुसरा धोनी तयार करायचाच.’ मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा आदेश ऐकून बातमीनंतर मलूल झालेले अधिकाऱ्यांचे चेहरे उजळले. कक्षातून बाहेर पडताच त्यातल्या सर्वात वरिष्ठाने ‘चला खरेदीला’ असे म्हणताच मोटारींचा ताफा रांचीतल्या एका भव्य स्पोर्ट शोरूमसमोर थांबला. विक्रीकौशल्यात माहीर शोरूमच्या संचालकाला बैठकीत काय घडले ते क्षणभरापूर्वीच कळलेले. त्याने ताफा बघताच सेल्समनची एक टीमच तयार ठेवलेली. स्वागतानंतर मग एकेक वस्तू दाखवायला सुरुवात झाली. आधी मुख्यमंत्र्यांसाठीचे किट खरेदी केले जाईल असे फर्मान एकाने सोडताच खुद्द संचालक समोर सरसावला. ‘ही खास ऑस्ट्रेलियावरून मागवलेली बॅट. अतिशय हलकी. साहेबांना उचलताना व फिरवताना अजिबात त्रास होणार नाही. याला चेंडू नुसता टच झाला तरी चौकार, षटकार ठरलेला. तसेही सीएमचा फटका कोण अडवणार म्हणा! गेल्या वेळी त्यांनी अकराच धावा केल्या तरी मॅन ऑफ द मॅच द्यावा लागला ना! आता ही बॅट घ्या, भरपूर धावा निघतील. हे शूज न्यूझीलंडवरून मागवले. थोडे वजनी आहेत पण एकदा धावायला सुरुवात केली की २२ यार्डाचे अंतर तेच कापतात. साहेबांना जाणवणारसुद्धा नाही. हे बुलेटप्रूफ हेल्मेट. यावर चेंडू कितीही जोरात आदळला तरी डोके हलत नाही. ही कॅप. त्यावर साहेबांचे नाव नोंदवून घेतलेले आहे. हे पॅड बघा, यात स्पंजचा एक स्तर जास्तीचा टाकून घेतलेला. कितीही वेगात चेंडू आदळला तरी पायाला जाणवत नाही. फक्त गुदगुल्या तेवढ्या होतात. साहेबांना गॉगल आवडतो हे ठाऊक होते आम्हाला. म्हणून हा खास जर्मनीहून मागवला. हेल्मेटच्या आत अगदी फिट बसतो. मुख्य म्हणजे यातून चेंडू मोठा दिसतो. हे ग्लोव्हज् पण इंपोर्टेड. बॅटवरची पकड अजिबात सुटत नाही. आफ्रिकेहून मागवलेला हा टेनिस चेंडू. कशीही गोलंदाजी केली तर बॅटवरच येतो. त्यामुळे साहेबांच्या धावा या वेळी वाढणार. शिवाय हा अंगावर आदळला तरी वळ उमटत नाही. शेवटी काय, सीएम सुरक्षित तर राज्य सुरक्षित.’ हे ऐकून अधिकारी खूश झाले. तेवढ्यात क्रिकेट खेळणारी काही मुले आत शिरली. उगाच व्यत्यय नको म्हणून त्यांना बाजूलाच थोपवले गेले. ‘आता इतरांसाठी साहित्य दाखवा’ असा हुकूम मिळताच बाकीचे सेल्समन समोर आले. ‘या मंत्री व सत्तारूढ आमदारांसाठी तयार केलेल्या किटस्. थोड्या महाग आहेत. या विरोधी पक्षाच्या आमदारांसाठी, त्या थोड्या स्वस्त आहेत. पुन्हा ओरड होऊ नये म्हणून पत्रकारांसाठी चांगल्या दर्जाचे साहित्य असलेल्या किटस् वेगळ्याच ठेवल्यात. नेहमी निधीच्या उधळपट्टीवर ओरडणाऱ्या डाव्या आमदारांसाठी या हलक्या दर्जाच्या. त्यावर मुद्दाम कमी किमतीची लेबल लावलीत.’ गेल्या वेळच्या शंभरच्या तुलनेत २५ अधिकच्या किट खरेदी करून झाल्यावर अधिकाऱ्यांनी आकडा विचारला. संचालक हसत म्हणाले, ‘८४ लाख. साहेब, या सरकारच्या कृपेमुळे इतर राज्यांनीसुद्धा असे सामने भरवण्याची तयारी सुरू केली आहे. तिथेही मीच साहित्य पुरवतो आहे.’ हे ऐकून आनंदित झालेले अधिकारी ‘बिल भेज दो’ म्हणत बाहेर पडले. मग सेल्समनने आतापर्यंत तिष्ठत असलेल्या त्या मुलांकडे जात तुसड्या आवाजात विचारले, ‘क्या चाहिये’ हे ऐकून खेळाडूंनी कर्णधाराकडे मान वळवली तर तो तिथे नव्हताच. त्यांनी बाहेर जाऊन त्याला आत येण्याची गळ घातली. त्यावर तो म्हणाला, ‘मुझे नही बनना क्रिकेटर, मुझे नेता बनना है।’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National paper ministers mlas and local journalists exhibition matches of cricket akp
First published on: 09-12-2021 at 00:00 IST