जाहिरातबाजी करणाऱ्याची मातीही विकली जाते आणि न करणाऱ्याचे सोनेदेखील विकले जात नाही, असे म्हणतात. मग बाजारपेठ मिळविण्यासाठी जाहिरात केली तर वावगे काय? ‘देशासाठी सबसिडी सोडा’, असे आवाहन करणाऱ्या जाहिरातींवर शेकडो कोटी रुपये खर्च केले, तेव्हाच लोकांना राष्ट्रभक्तीच्या या नवमार्गाची माहिती झाली आणि त्यांनी देशासाठी काही कोटींच्या सबसिडीवर पाणी सोडले, असे म्हणतात. गेल्या दोन-अडीच वर्षांत जाहिरातींवर जितके पैसे खर्च झाले, तेवढय़ा पैशात दहा मंगळयाने तयार करून अवकाशात झेपावली असती, असाही काहींचा भाबडा तर्क आहे.  सरकारने जाहिरात केली नाही, तर जनकल्याणाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचणार कशा? जाहिरातींचे हे असे महत्त्व निर्विवाद असले तरी ऐन निवडणुकीच्या काळात मतदारांसमोर हात पसरणाऱ्या उमेदवारास मात्र, ‘आचारसंहिता’ नावाचा बागुलबोवा सतावत असल्याने, हाती पैसा असला तरी जाहिरातीचा रतीब मतदाराच्या दारात पोहोचविताच येत नाही. अशा अडचणीच्या वेळी काही प्रसारमाध्यमे एक व्रत करीत असतात. एखाद्या उमेदवाराविषयी, स्थानिक पुढाऱ्याविषयी लोकमत काय आहे, हे सकाळी सकाळीच त्या उमेदवारास कळावे आणि लोकांनाही उमेदवाराची ओळख व्हावी अशी गरज असताना केवळ आचारसंहितेसारख्या अडसरामुळे ते अशक्य होत असेल, तर काही तरी केले पाहिजे, या उदात्त हेतूने अशा माध्यमांनी निवडणूक काळात घेतलेल्या या व्रतास, ‘पेड व्रत’ असे म्हणतात. अलीकडे झाडे लावण्यासाठी जनजागृती करावी लागते, ती वाढविण्यासाठीही त्यांना ‘खतपाणी’ही घालावे लागते आणि विविध भाषांमधून त्यासाठी जाहिरातीही कराव्या लागतात. त्यापासूनच प्रेरणा घेऊन सकाळपासून लोकमताचा कानोसा घेण्यासाठी सज्ज असलेल्या काही माध्यमांनी ‘पेड व्रता’चा वसा घेतल्याने, आचारसंहितेला ‘आदरपूर्वक वळसा’ घालून प्रतिमानिर्मितीचा सोपा मार्गच उमेदवारांना सापडला आहे. उमेदवारांसाठी सवलतीच्या दरांत प्रतिमानिर्मितीची वेगवेगळी ‘परवडणारी पॅकेजेस’ देऊ करण्याच्या परोपकारी प्रकारातून अशा माध्यमांच्या सामाजिक जाणिवांचेच प्रतिबिंब उमटताना दिसते. या ‘पेड व्रती’ माध्यमांमुळे ऐपतदार उमेदवार निवडण्यास मतदारास घरबसल्या मदत होईल आणि साहजिकच लोकशाहीदेखील ज्यांना जशी हवी तशी होईल. या पेड व्रताचे एवढे सारे फायदे असतानाही, ते लपूनछपून करावे लागते, हे त्या माध्यमांचे दुर्दैव!.. ‘‘पेड’ लगाओ, ‘पेड’ बढाओ’’ या उक्तीचा आगळा ‘अर्थ’ शोधण्याचे विधायक काम करूनही, त्याची वाच्यता करता न येणे, म्हणजे, ‘सहन होत नाही आणि सांगताही येत नाही’ यापेक्षा वेगळे नव्हे!