त्यांनी खूप खूप पक्षी पाळले होते. छान छान पक्षी, रंगीबेरंगी पक्षी. उडणारे पक्षी. बोलणारे पक्षी. चिडणारे पक्षी. काऊ-चिऊ-राघू-मैना.. चिवचिवणारे, टिवटिवणारे.. पक्षीच पक्षी. आपापल्या झाडांवर, आपापल्या फांद्यांवर, आपापल्या आभाळात पक्षी मस्त विहरत असत. ते म्हणाले, असे करून  चालणार नाही. वेगळे राहून भागणार नाही. एक चिडिया, अनेक चिडिया, दाणे वेचायला येतात चिडिया, ही गोष्ट ठाऊक आहे नं तुम्हाला? त्या चिडिया पाहा एकत्र येतात आणि शिकाऱ्याच्या जाळ्यासह भुर्र उडून जातात. एकीमध्येच बळ आहे पाखरांनो. एक व्हा. कोणी आत या, कोणी दारात राहा, कोणी हे करा, कोणी ते करा, हवे तर फ्रिंज म्हणूनही राहा, पण एक व्हा. एका आवाजात बोला. तुमच्या एका आवाजाने दुमदुमून जातील सगळी गगने. उलथून पडतील सिंहासने. तेव्हा या पक्ष्यांनो, या रे या, लवकर भरभर सारे या. आजवर स्वत:साठी चिवचिव केली, कावकाव केली, मी तुम्हाला टिवटिवायला शिकवतो. मिळेल सूर तुमचा माझा, तर सूर बनेल आपला. मग खूप खूप पक्षी आले. त्यांनी त्यांना गाणी शिकविली. गाणी नव्हे, ती भक्तिगीतेच. जो गाणी म्हणेल तो राष्ट्रपक्षी. त्यांना बसायला छान छान घरटी. उंच उंच फांदी. झोपायला गादी आणि  ल्यायला खादी! सारे पक्षी हरखले, मोहरले. एका सुरात, कदमतालात म्हणू लागले गाणी. पाहता पाहता साऱ्या पक्ष्यांचे कंठ- कंठच काय सारे पक्षीच-  बनले एकसारखे. दिसू लागले पोपटासारखे. काही पोपट मिठू मिठू करून देशराग देऊ लागले, काही पोपट मिठू मिठू करून देशराग गाऊ लागले. साऱ्या रानावनात गेली त्यांची शीळ. बाकीच्या सुरांना  बसली मग खीळ. पोपटांनी आवतले सारे ध्वनिक्षेपक. फार काय, पोपटच झाले साज आणि पोपटच झाले आवाज. त्याच्या खांद्यावर बसून म्हणू लागले, कोणी करायचा नाही आता मिठू मिठू बोलायचा माज. ते पाहून त्यांचा तर कंठच दाटून येई. डोळ्यांत येई पाणी. पोपटांना दाटुमुटुचे दटावून तो मनातल्या मनात म्हणे, पाखरे माझी किती शहाणी. तेव्हा पोपट छाती काढून म्हणू लागले, कोण कोकीळ आणि कोण मैना, कोण लता आणि कोण किशोर, आमच्यासाठी तो साराच शोर. तुमचीच वाणी, तुमचीच गाणी आम्हांस पाहिजे रानीवनी. पुढे काय झाले नि कसे झाले माहीत नाही, परंतु एके दिवशी त्या पाळलेल्या पोपटांनी केला कहर. लताबाईचाच बदलला स्वर. आता ते म्हणताहेत, छे छे, हे म्हणजे फारच झाले. पण मला काही ठाऊक नाही. माझ्या पोपटांनी मला हे न विचारताच केले. त्यांनी खूप खूप पोपट पाळले होते. त्याची ही गोष्ट.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pet parrot story
First published on: 18-01-2017 at 03:32 IST