‘..तर तुम्ही काय म्हणत होता?’, मोबाइलवरील बोलणं संपवून त्या सद्गृहस्थांनी पुन्हा विचारणा केली. ‘तुमच्या वाढीव मानधनाचं..’ पत्रकारानं आठवण करून दिली. ‘हा हा. किती वाढलं ते?’ सद्गृहस्थांनी पत्रकारालाच विचारलं. ‘अहो, मुंबईत महिन्याला १० हजारांवरून २५ हजारांवर गेलंय मानधन तुमचं. बाकी ठिकाणीही मानधन वाढलंय’, पत्रकारानं माहिती पुरवली. ‘हो हो. बरोबर. काल पोरं म्हणत होती आमची,’ सद्गृहस्थ म्हणाले. ‘या मानधनाचं कसं आहे बरं का.. च्या XXX’ मध्येच खड्डा आल्यानं गाडी हलकेच उडाली आणि त्यासोबत सद्गृहस्थ, पत्रकार व गाडीचा चालक हेही उडाले. रिक्षा, टॅक्सी, बसबरोबरच पजेरो गाडीही खड्डय़ांमुळे अशी उडते, ठेचकाळते, याचं ज्ञान पत्रकाराला झालं. गाडी जरा स्थिरस्थावर झाल्यावर सद्गृहस्थांनी आपल्या डाव्या हाताची मूठ आवळत तो हात पत्रकारापुढे जोरजोरात हलवला. क्षणभर पत्रकार दचकला. खड्डय़ाचा राग आपल्यावर काढतात की काय हे.. पाठीत दणका घालतात की काय आपल्या, असं त्याला वाटून गेलं. पण सद्गृस्थांची ती कृती त्यांच्या हातातील सोन्याची अदमासे २० तोळ्यांची साखळी ठीकठाक करण्यासाठी होती. ‘हा. तर मानधन. आता १० हजारांवरून २५ हजारांवर ही काय वाढ आहे का? फक्त १५ हजार? छ्छे. अहो महागाई किती वाढलेय..’ इतके ते बोलले आणि त्यांचा मोबाइल खणखणू लागला. ‘सोनू.. तुझा माझ्यावर भरवसा नाय काय..’ ही रिंगटोन काही वेळ सद्गृहस्थांनी वाजू दिली आणि मग मोबाइल घेतला. ‘हा, काय? किती? त्याला ३० आणि आम्हाला १४? ***. चालणार नाही बोल त्या ***ला,’ असं म्हणत सद्गृहस्थांनी मोबाइल बंद केला. ‘तर, काय २५ पे.. आपलं हजार. खूपच कमी वाढ आहे ही. अहो सॉलिड खर्च असतात आमचे. एरिया बारका असला म्हणून काय झालं? सतत फिरावं लागतं. पब्लिकचं काय हवं नको पाहावं लागतं. पोरांना सांभाळावं लागतं. पेव्हरची कामं असतात, कुठे स्वच्छतागृहाचं काम असतं, कुठे झाड लावायचं असतं. त्या सगळ्यात पैसा लागतो साहेब आम्हालाही. आणि आमचीही फॅमिली आहे. टोमॅटो १०० रुपये किलो झाले. कोथिंबीर जुडी ८० रुपयांना. कसं भागणार?’ इतक्यात सद्गृहस्थांचा मोबाइल पुन्हा वाजला. ‘अरे काय रे. तुला बोललो ना. २० फायनल. नाही. कमीबिमी नाही..’ एवढं म्हणून त्यांनी मोबाइल ठेवून दिला. पत्रकाराचं उतरायचं ठिकाण आल्यानं त्यानं गाडीचा दरवाजा उघडला. उतरता उतरता, ‘सोनू.. तुझा माझ्यावर भरवसा नाय काय’, ही रिंगटोन त्याच्या कानावर पडली. आपल्या खिशातील मोबाइल आणि पँटच्या खिशातील पाकीट चाचपून बघत त्यानं गाडीचा दरवाजा लावून घेतला. सद्गृहस्थांकडे काचेआडून पाहत त्याने हात हलवला. सद्गृहस्थांनीही हात हलवला. पजेरोतील सद्गृहस्थांच्या हातातील साखळीचे तेज बंद काचेआडूनही जाणवत होते..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poor condition of roads in maharashtra
First published on: 17-07-2017 at 02:37 IST