‘भारत माझा देश आहे. या देशातील समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.’ अशी प्रतिज्ञा एके काळी शाळाशाळांतून घेतली जात होती. प्रत्येक पाठय़पुस्तकाचे या प्रतिज्ञेने नटलेले पहिले पान पालटताना, देशाच्या समृद्ध परंपरांचा पाईक होण्याचे स्वप्नही अधिकच गहिरे होऊन जायचे.. प्रतिज्ञेचे सूर शाळाशाळांमध्ये घुमू लागले, की इतिहासदेखील रोमांचित होऊन जायचा. गेल्या काही वर्षांत मात्र, इतिहासाला लाज वाटू लागली असावी. वर्तमानाचे बोट सोडून भूतकाळात दडी मारून बसावे असेच त्याला वाटू लागले असावे अशीच परिस्थिती सध्या सर्वत्र दिसते आहे. इतिहासाची मोडतोड करणारे काळ सर्वत्र सोकावले असावेत, असे दिसू लागले आहे.  ज्याचा इतिहास तेजस्वी, त्याचे भविष्य उज्ज्वल असे एके काळी म्हटले जायचे, तेव्हा इतिहासालाही गर्व वाटायचा. आता मात्र, आपण भूतकाळात जमा झालो आहोत असेच त्या इतिहासालाही वाटू लागले असेल. दडी मारली नाही, तर ही सोनेरी पाने पिवळी पडतील या भयाने इतिहासाचे भूत वर्तमानातील अंधाराचे कोपरे शोधण्यासाठी धडपडू लागले असेल.. आज आपली अशी गत झाली असेल, तर आपले भविष्य कसे असेल या चिंतेने इतिहास आणखीनच खंतावलादेखील असेल.  ज्या स्वदेशासाठी, स्वराज्यासाठी लढा देणाऱ्या लोकमान्यांना इंग्रजांनीदेखील इतिहासात अजरामर करून ठेवले, त्या इतिहासाचीच आता केविलवाणी स्थिती ओढवली आहे. हा इतिहास अगदी अलीकडचा आहे, पण त्याची सोनेरी पाने पिवळीकाळी करून टाकण्याचा पराक्रम आपल्या स्वराज्यातच होत असल्याचे पाहून इतिहासाला स्वत:लाच आपले तोंड झाकून घ्यावेसे वाटू लागले असेल. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच, अशी सिंहगर्जना करून लोकमान्य टिळकांनी  इंग्रजी सत्तेविरुद्धच्या असंतोषाचा अंगार मनामनांत फुलविला आणि स्वातंत्र्यलढय़ाच्या इतिहासात स्वत:चे एक सोनेरी पान निर्माण केले, त्या असंतोषाचे जनक असलेल्या लोकमान्यांचा राजस्थानच्या पाठय़पुस्तकात ‘दहशतवादाचे जनक’ असा उल्लेख झाल्याने, ते पाठय़पुस्तक मात्र, नव्या असंतोषाचे जनक ठरणार आहे. इतिहासाची मोडतोड करणे हे काम सोपे नसते. त्यासाठी अवघी बुद्धी पूर्णपणे भानावर राहून गहाण टाकावी लागते. राजस्थानच्या भाजप सरकारमधील पाठय़पुस्तक निर्मिती मंडळाने लोकमान्यांना दहशतवादाचे जनक ठरविताना या साऱ्या प्रक्रिया पार पाडल्या असणार यात शंका नाही. बुद्धी गहाण टाकण्याची प्रक्रिया अशी एकाएकी पूर्ण होत नसते. त्यासाठी बालवयापासून तसे संस्कार मनावर घडवून घ्यावे लागतात. यासाठी एखादी मातृसंस्था असावी लागते. त्या संस्थेच्या कोणत्याही शाखेत दाखल झाले, की बुद्धी गहाण टाकण्याचे प्रशिक्षण मिळते, अशी चर्चा सध्या सुरू झालीच आहे. त्याला राजस्थानातील पाठय़पुस्तक निर्मिती मंडळाच्या या ऐतिहासिक पराक्रमाने पुष्टी मिळाली आहे. प्रत्येक वर्तमानकाळ हा भविष्यासाठी नवा इतिहास निर्माण करत असतो असे म्हणतात. राजस्थानच्या या पुस्तकाने भविष्यासाठी स्वत:चा, पिवळ्या पानाचा एक इतिहास निर्माण केला आहे. तो कधीच सोनेरी असणार नाही, हे स्पष्ट आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajasthan class 8 book calls lokmanya tilak father of terrorism
First published on: 14-05-2018 at 01:12 IST