मेरे प्यारे देशवासियों, भारताने आपल्या समृद्ध परंपरेचा झेंडा नुकताच आंतरराष्ट्रीय स्तरावर फडकावला, हे आपणास माहीत झाले असेलच. या घटनेचा अभिमान वाटावा की लाज वाटावी, हे ती घटना घडून दिवस उलटला तरीही आम्हांस ठरविता आलेले नाही. त्याचे कारण असे, की लहानपणी आम्ही शाळेत असताना, ‘माझ्या देशातील समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे आणि त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन’ असे आम्ही दररोज म्हणत राहिलो. पण पुढे आमच्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा पाईक होणे तर दूरच, पण या परंपरांची लाज वाटून आम्ही चूर होत गेलो. आता मात्र याचीच आम्हास लाज वाटत आहे. परंपरांचा पाईक होण्यासाठी प्रयत्न केले नाहीतच, पण त्या टिकविण्यासाठीही कोणतेच प्रयत्न केले नाहीत, याची खंत आम्हांस सतत बोचत राहील. म्हणूनच, आपल्याकडून जे घडले नाही, ते दुसऱ्या कोणी करून दाखविल्याचा मात्र आम्हांस अभिमान वाटू लागला आहे. नवे वाहन खरेदी केल्यावर त्याला नजर लागू नये यासाठी त्याला लिंबू-मिरची आणि बिब्बा-कोळसा बांधावयाचा असतो, ही आपली परंपराच आहे. याच परंपरांचा पाईक होण्यासाठी प्रयत्न करावा अशी शाळकरी वयातील त्या प्रतिज्ञेची अपेक्षा होती. पण वय वाढल्यावर अक्कलदेखील वाढली या गैरसमजात राहून, लिंबू-मिरची ही अंधश्रद्धा आहे, असेच आम्ही म्हणत राहिलो. थोडक्यात, प्रतिज्ञेचा आम्हाला विसर पडला. त्याची आता लाज वाटू लागलेली असतानाच, आशेचे किरण जगाच्या क्षितिजावर चमकू लागले आहेत, ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. परंपरांचे पाईक होण्याची पात्रता अंगी असलेले अनेक जण आसपास आहेत.. नव्हे, परंपरांचा झेंडा सातासमुद्रापार फडकावून जगाला अचंबित करण्याचे धाडस दाखविणारेदेखील आमच्याकडे आहेत, याचा अपरिमित आनंदही आम्हांस झाला आहे. परंपरांना लाथाडणारे, नाके मुरडणारे आणि परंपरांची खिल्ली उडवत पुरोगामित्वाचा टेंभा मिरविणारे आसपास असताना या कृतीचीही खिल्ली उडविली जाईल याची पूर्ण कल्पना असूनही, फ्रान्सच्या भूमीवर आम्ही आमच्या ‘लिंबू-मिरची परंपरेचा’ आविष्कार घडवून दाखविलाच! खरं म्हणजे, आम्ही कधी कधी दसरा-दिवाळीच्या काळात आमच्या गाडय़ांना हार घालतो, नाक्यावर लिंबू-मिरची-कोळसा विकणाऱ्याकडून हळूच गाडीला तो बांधूनही घेतो, पण त्यामागे परंपरा जतनाचा कोणताच हेतू नसतो. गरीब बिचाऱ्या लिंबू-मिरची विकणाऱ्यांना रोजगार मिळावा एवढाच त्यामागचा हेतू असतो. आता याला परंपरांचे जतन म्हणावयाचे की अंधश्रद्धा, हे ठरविणे कठीणच. म्हणूनच, एकीकडे राजनाथ सिंहांनी फ्रान्समध्ये राफेलच्या चाकाखाली लिंबू चिरडून पुराण्या परंपरेचे पालन केले त्याचा आनंद मानावा की त्याची लाज वाटावी, हेच आम्हांस समजेनासे झाले आहे. आनंद मानला, तर आम्हांस प्रतिगामी ठरविले जाईल आणि लाज बाळगली तर परंपरेचा पाईक होण्याची पात्रता अंगी येण्यासाठी सदैव प्रयत्न करण्याच्या प्रतिज्ञेशीच ती प्रतारणा ठरेल याची भीतीही वाटू लागली आहे. सध्या तरी समाजातून जो सूर जोरकसपणे उमटेल त्या सुरात सूर मिसळण्याचेच धोरण ठेवावे, असे आम्ही ठरवत आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राफेल पूजनानंतर चाकाखाली ठेवलेल्या त्या लिंबामुळे जगाच्या नजरेत भारतीय परंपरांविषयीच्या कुतूहलाचे भाव दाटले असतील याबाबत मात्र आम्हांस कोणतीच शंका नाही!

मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajnath singh puts lemons on new rafale jet
First published on: 10-10-2019 at 01:57 IST