जगातील उत्तम क्षेत्ररक्षक रवींद्र जडेजा भारताकडून खेळतो हे आपलं भाग्यच. ऑस्ट्रेलियासारख्या देशात मैदानं इतकी भलीमोठी. त्यात वर तप्त सूर्य. कुठेकुठे म्हणून धावायचं? किती लांबवरून चेंडू फेकायचा? आपला जडेजा भलताच चपळ. एकदम चित्त्यासारखा पळतो. वाघासारखा चेंडूवर झेपावतो. नजर गरुडासारखी तीक्ष्ण. पार सीमारेषेवरून चेंडू भिरकावला तरी तो तीनपैकी एका स्टम्पाचा वेध घेणारच! जवळपास पाळतीवर असला, म्हणजे प्रतिस्पर्धी संघातील फलंदाज अजिबात धाव घेऊ किंवा चोरू धजावणार नाहीत; पण तो सध्या ११ जणांच्या संघात खेळू शकत नाही. कारण?  त्याचा डावा खांदा दुखतोय ना.. म्हणजे असं,  की रवींद्र जडेजा डावखुरा. म्हणजे डाव्या हाताने फलंदाजी करतो आणि गोलंदाजीही करतो. हे दोन्ही जर दुखऱ्या खांद्यामुळे करताच येत नसेल, तर संघात घेऊन फायदा काय? तरी त्याची देशनिष्ठा दांडगी. दुखरा खांदा असूनही ऑस्ट्रेलियाला गेला. केव्हा गरज पडेल सांगता येत नाही तेव्हा अशा वेळी हजर असावं या सुविचारातून. ऑस्ट्रेलियात गेल्यावर प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली थक्क. अरेच्चा! हा कसा इथं? पण बरं झालं. तेवढाच आधार. कारण जायबंदी भिडूंची यादी वाढतच होती. प्रथम पृथ्वी शॉ, मग रोहित शर्मा आणि रविचंद्रन अश्विन. काही जायबंदी, काही जायबंदी होण्याच्या मार्गावर. तरीही जडेजाला खेळवावंच लागलं. चांगला क्षेत्ररक्षक ना तो! अ‍ॅडलेड आणि पर्थ येथील सामन्यांमध्ये काही धडधाकट खेळाडूंना फावल्या वेळात माघारी बोलावून त्यांच्या जागी बदली खेळाडू म्हणून निव्वळ क्षेत्ररक्षण करण्यासाठी जडेजाला खेळवलं गेलं. ऑस्ट्रेलियातल्या खेळाडूंना प्रश्न पडला. हा इतका धावतो वगैरे  तरी ११ जणांमध्ये खेळण्यास अनफिट कसा? पुन्हा जडेजा खेळण्यास अनफिट, असं शास्त्री सांगतात. त्याला पर्थमध्ये का खेळवलं गेलं नाही याचं कारण कोहली भलतंच सांगतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता रविवारी भारताचं क्रिकेट बोर्ड जडेलाला फिटनेस प्रमाणपत्र (भारतात बसून!) देऊन मोकळं होतं. हे सगळं होत असताना राहुल आणि विजय हे फलंदाज ऑस्ट्रेलियात ‘खेळण्यास फिट’ आहेत की नाही यावरही थोडा विचार व्हायला हवा होता ना? विशेषत: राहुलला वरकरणी अनफिट ठरवून जडेजासारखं बदली क्षेत्ररक्षक म्हणून खेळवलं, तर तो  जितक्या धावा करतो त्यापेक्षा नक्कीच जास्त धावा तो वाचवू शकेल! या दोन फलंदाजांऐवजी आणखी दोन गोलंदाज खेळवले, तर सध्याच्या गोलंदाजांवर पडत असलेला ताणही कमी होईल आणि त्यांचा फिटनेस शाबूत राहील.  सहा-सहा गोलंदाज कदाचित ऑस्ट्रेलियाला अधिक भारी पडू शकतील. फिटनेस सर्टिफिकेटवरून आठवलं.. शास्त्री आणि कोहली यांना संवादाचं फिटनेस सर्टिफिकेट मिळालं आहे का? मिळालं असेल तर कोणी दिलं? कारण एकाला मैदानावर शिवीवाचून बोलता येत नाही, दुसरा कॅमेऱ्यासमोरही शिवीशिवाय बोलू शकत नाही! बरं, भारताच्या फिटनेस प्रशिक्षकांना फिटनेस सर्टिफिकेट कुणी दिलंय का? याविषयी माहितीच्या अधिकारात काही कळू शकेल का?

मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravindra jadeja fitness issue in tour of australia
First published on: 25-12-2018 at 01:28 IST