दुष्काळ, दारिद्रय़, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, खून, बलात्कार, बेरोजगारी, उपासमार अशा असंख्य समस्या विक्राळपणे नाचत असताना, त्या समस्या तीव्रपणे जगासमोर येणार नाहीत याची काळजी घेणे हाच समस्यामुक्तीच्या आभासाचा सर्वात सोपा मार्ग ठरतो. अशा समस्या एका रात्रीत सोडविण्यासाठी एखाद्याकडे जादूची कांडी नसेलही, पण समस्यांवर केंद्रित झालेले लक्ष अन्यत्र वळविण्याचे अनेक मार्ग उपलब्ध असतील, तर आपोआपच समस्यामुक्तीचा आभासी आनंद उपभोगता येतो. सध्या अशा अनेक खऱ्या समस्या उपेक्षित ठेवून, त्यांना पुरून उरणारी ‘भारतमाता की जय’च्या उद्घोषाची गरज हीच सर्वात मोठी समस्या ठरविण्याचा घाट घातला जात आहे. त्यावरील वाद आता शिगेला पोहोचल्याने, जगण्याच्या लढाईतील अनेक समस्या त्यापुढे थिटय़ा असल्याचा भास सर्वाना होऊ लागला आहे. देशाचा जयघोष कोणत्या शब्दांनी करायचा याचा वाद आधी उभा करायचा, तो पुरेसा शिगेला पोहोचला की हलकेच आपले अंग काढून घेत इतरांना त्या वादात गुंतवून ठेवायचे आणि अशा खेळात जगण्या-मरण्याशी जोडलेल्या समस्यांचा विसर पडेल अशी व्यवस्था करायची, हे तंत्र नवे नाही. या खेळात सारेच राजकारणी वाकबगार असल्याने, मुख्यमंत्र्यांच्या पदावर बसणारी व्यक्ती त्यात अधिक वाकबगार असली पाहिजे, हे ओघानेच येते. दोन दिवसांपूर्वी त्याची चुणूकही दिसून गेली. वास्तविक, राज्यातील १६ जिल्ह्य़ांत भीषण दुष्काळ आहे. त्यावरील उपाययोजनांना सर्वोच्च प्राधान्य देण्याची ग्वाही देणारे ४५ मिनिटांचे भाषण ठोकताना मुख्यमंत्र्यांनी भारतमातेच्या जयघोषाच्या वादाचा मुद्दा पाच मिनिटांसाठी तरी कशाकरिता उभा केला, हा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्यांनी या मुद्दय़ावर जोरदार शड्ड ठोकले, तेव्हा प्रसारमाध्यमे नेमका तोच मुद्दा उचलणार हे न समजण्याएवढे मुख्यमंत्री बालबुद्धीचे खचितच नाहीत. तरीही भारतमातेचा जयघोष कोणत्या शब्दांत करायचा हा दुष्काळ, शेतकरी आत्महत्यादी समस्यांहूनही गहन प्रश्न असल्याचे पुरेसे अधोरेखित होत नाही आणि अन्य समस्यांवर हा वाद मात करीत नाही असे बहुधा त्यांना वाटले असावे. म्हणून त्यांनी पुन्हा ट्विटरचा वापर करून प्रसारमाध्यमांना नेमके खाद्य दिले. आता हेतू साध्य होताच चार फटके माध्यमांना मारण्याचा शहाजोगपणा त्यांनी दाखविला, आणि सोमवारी विधिमंडळात, ‘पद गेले तरी चालेल’ वगैरे भाषा करीत देशाचा जयघोष कोणत्या शब्दात करायचा, हेच पुन्हा सांगितले. खऱ्या समस्यांना पुरून उरणारी ही आभासी समस्या तशीच गाडून टाकली, तर खऱ्या समस्या डोकी वर काढतील, एवढे समजण्याचा हा शहाणपणा कौतुकास्पद म्हणावा, की कसे?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Row over devendra fadnavis remark of bharat mata ki jai
First published on: 05-04-2016 at 01:19 IST