मे महिन्याच्या सुट्टीपेक्षा दिवाळीची सुट्टी खरं तर अधिक आनंदाची. मस्त थंडी पडलेली असते, फराळाच्या पदार्थावर ताव मारायची सोय असते आणि घरात सगळीकडेच आनंदाचं वातावरण असतं. अशा वेळी अभ्यासाचं नाव काढायचं, म्हणजे खरं तर सगळ्याच उत्साहावर पाणी पडण्यासारखं. पण यच्चयावत शाळांमधील मुलांना दिवाळीच्या सुट्टीत शाळेनं दिलेला गृहपाठ करण्याची सक्ती असल्यानं, त्यांची पंचाईत होणंही स्वाभाविकच. मुलांपेक्षाही पालकच अशा वेळी जास्त हवालदिल होतात. कुठे सहलीला जायचं म्हटलं, तर हा गृहपाठ आडवा येतो. तो न करावा, तर शाळेच्या रागीट ‘टीचर्स’कडून ओरडा खायची तयारी ठेवावी लागते. मग असे गृहपाठ ऊर्फ ‘प्रोजेक्टस्’ पूर्ण करायची जबाबदारी  पालकांवर येऊन पडते. ते बापडे कामधाम सोडून ‘गुगल’ करीत बसतात. यंदा सगळ्या शाळांनी, सगळ्या विद्यार्थ्यांना एकच विषय दिला आहे. सरकारी फतव्यापुढे कोणाचं काय चालणार? त्यामुळे या दिवाळीत महाराष्ट्रभरातील सगळ्या विद्यार्थिजगतात सरदार वल्लभभाई पटेल यांचा गजर होणार आहे. तशी तंबीच दिलीये शासनानं. सापाचे फोटो आणा, एखादं उपकरण तयार करा, यासारख्या किचकट आणि न जमणाऱ्या गृहपाठावर आता शाळेबाहेरील अनेक नव्या उद्योगांनी समर्थ पर्याय शोधून काढला आहे. वर्तमानपत्रात जाहिरात देऊन असे गृहपाठ ‘रेडिमेड’ विकण्याची नामी शक्कल आता अवतरली आहे. फक्त प्रोजेक्टचं नाव सांगायचं आणि पैसे द्यायचे. चकचकीत प्रोजेक्ट तयार! पुण्या-मुंबईच्या शाळा-महाविद्यालयांच्या बाहेर तर अनेक जण अशा तयार गृहपाठाच्या जाहिरातीची हॅण्डबिलं वाटत असतात. आता वल्लभभाईंचा सारा जीवनपट विविध छायाचित्रांसह तयार करण्याचं काम या नवउद्योगांना करावं लागणार आहे. पालकांनाही आता गुगलवर वल्लभभाईंचं जीवन धुंडाळायला लागणार आहे. मुलांनी काय करायचं आणि काय करायचं नाही, याचे निर्णयही शासनच घेऊ लागल्यानं, शिक्षकांची त्रेधातिरपीट उडणं स्वाभाविक असतं. पण आता शाळाही अशा फतव्यांना सरावली आहे. आदल्या दिवशी समस्त शाळांना कळवण्यात येतं, की उद्या विद्यार्थ्यांनी इतकी इतकी झाडं लावायची आणि त्याची छायाचित्रं संध्याकाळच्या आत शिक्षण विभागाला पाठवायची. या असल्या ऐन वेळच्या उपक्रमांनी दमछाक झालेल्या शाळा आणि विद्यार्थी यांना अभ्यास कधी करायचा, असा प्रश्न आता पडू लागला आहे. ऐन दिवाळीच्या सुट्टीतच  एकता सप्ताह आल्यामुळे शिक्षण खात्यालाही पर्याय नव्हता म्हणा. पटेल प्रोजेक्ट पूर्ण करून हे सगळं थांबणार नाही; सुट्टी संपल्यावर निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, स्वातंत्र्यसैनिकांच्या भेटी घेणं यांसारख्या उपक्रमांनाही विद्यार्थ्यांना सामोरं जावं लागणार आहेच. सुट्टीत काही निवडक वाचन करावं, आपले छंद जोपासावेत, अशी स्वप्नं सगळेच जण पाहात असतात. यंदाच्या दिवाळीत पोलादी पुरुष असलेल्या वल्लभभाईंच्या कार्याचा परिचय करून घ्यायचा की तयार गृहपाठ सादर करायचा, एवढाच प्रश्न आता विद्यार्थी आणि पालकांपुढे उभा ठाकला आहे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: School homework in diwali holidays
First published on: 21-10-2016 at 03:07 IST