आपल्या हे कसे बरे लक्षात आले नाही आजवर? एवढी का आपली नजर बिघडली आहे? असावे. तसेच असावे. अलीकडे पाहा, लहानपणीच माणसांना जाड जाड काचांचे चष्मे लागतात. दृष्टिदोष लवकर जडतात. काही म्हणता काही चांगले दिसत नाही. दिसते ते सगळे वाकडेच. आता हेच, कोणताही नतद्रष्टपणा न करता, पाहा. समाजात किती तरी देवमाणसे असतात. संतसज्जन असतात. आणि आपणांस काय दिसतो तर त्यांचा भ्रष्ट आचार. या निवडणुकीने मात्र आपली दृष्टी काही प्रमाणात स्वच्छ झाल्याचे दिसले, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब. म्हणजे पाहा आपणांस किती लोकांनी सांगितले, की उभे असलेले अनेक उमेदवार गुंड आहेत, भ्रष्ट आहेत. पण आपण उघडय़ा डोळ्यांनी पाहता काय आढळले, तर ते म्हणजे मायाळू संतांचे अवतार आहेत. म्हणून तर आपण त्यांना निवडून दिले की नाही! पण पोलिसांकडे पाहण्याची आपली दृष्टी मात्र अजूनही चिपडलेलीच आहे. आपल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांवर पाणी मारले म्हणून आपल्याला हा दृष्टिदोष तरी समजला. नाही तर आपण आयुष्यभर कितीही गाजरे खाल्ली असती वा अ जीवनसत्त्वे घेतली असती ना, तरी आपल्याला ते दिसलेच नसते. आणि आपण हेच समजून चाललो असतो, की वाहतूक पोलीस म्हणजे चिरीमिरीसम्राटच. पण या एसीबीवाल्यांनी आपल्या चर्मचक्षूंतील मोतीबिंदू कसा एका अहवालाच्या फटक्यानिशी दूर केला आहे. त्यांनी हे त्रिकालाबाधित नग्नसत्य आपणांस दाखवून दिले की, दिसते तसे नसते. या विभागाचा कारभार अत्यंत पारदर्शी असाच आहे. किंबहुना वाहतूक पोलीस म्हणजे शंभर-दीडशेसाठी हात पसरणारे याचक नसून, ते म्हणजे आपले निश्चलनीकरण करून आपल्याकडील मळकट काळा पैसा दूर करण्याचे काम करणारे स्वच्छतादूतच आहेत. आता न्यायदेवतेच्या डोळ्यांवर असते पट्टी. त्यामुळे न्यायमूर्तीनी एसीबीला विचारले, की मग बुवा, एका वाहतूक पोलिसानेच सादर केलेल्या ध्वनिफितीत पोलीस लाच घेताना दिसतात ते कसे काय? ते का वाहनचालकांकडून भेळ घेत होते? हा सवालच मुळी विचित्र आहे. ते ध्वनिफितीतील वाहतूक पोलीस त्या अडाणी वाहनचालकांना कदाचित नव्या नोटांमधील ‘सिक्युरिटी फीचर्स’ समजावून देत असतील. पण एकदा डोळ्यांवर पडदा पडला की चांगले काही दिसतच नाही. या सगळ्या प्रकरणात एक बाब मात्र फारच वाईट झाली. ती म्हणजे ती पैसे घेतानाची ध्वनिचित्रफीत गुजरात पोलिसांची आहे असे एसीबीने सांगितले. यावरून एसीबीलाही एकदा डोळेच नव्हे, तर डोकेही तपासून घेण्याची आवश्यकता असल्याचेच दिसले. गुजरात मॉडेलमध्ये असे कधी काही भ्रष्ट, अस्वच्छ वगैरे घडणे शक्य तरी आहे का? तेथील कारभाराकडून तर तमाम काचांनी पारदर्शकता हा गुण उचलला असे म्हणतात आणि एसीबी मात्र त्यांवर ठपका ठेवते. हे बरोबर दिसते का? खरेच आता या देशातील तमाम नतद्रष्टांच्या डोळ्यांवर खऱ्याखुऱ्या सर्जिकल शस्त्रक्रियेचीच आवश्यकता आहे..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic police anti corruption bureau
First published on: 16-03-2017 at 02:18 IST