सकाळ झाली. मध्यरात्रीच राजे मोहिमेवरून परतल्याची बातमी तोवर वाऱ्यासारखी मावळ्यांपर्यंत पोहोचली होती. एकएक मनसबदार राजवाडय़ावर येऊन मुजरा करू लागला. ‘राजांनी सामना जिंकला, दिल्ली दरबारी बाजी मारली’, अशी बातमीही तोवर कानोकानी झाली होती.  राजांच्या मुत्सद्देगिरीची वर्णने करणारे रकाने भरण्यास प्रारंभ झाला होता. खानासोबतचा पहिला सामना राजांनी कसा चतुराईने जिंकला याचे रसभरीत वर्णन उद्या प्रत्येक मावळ्यापर्यंत पोहोचलेच पाहिजे, असे फर्मान एका सरदाराने आधीच सोडले होते. आणखी काही वेळातच दरबार भरणार होता. राज्यातील कलावंतांना आवतन धाडले गेले. एकएक कलाकार दरबारात दाखल होऊ लागला. सारे जण हजर झाल्याखेरीज दरबारात दाखल व्हायचे नाही, हा राजांचा शिरस्ता होता. दरबार भरला. धीरगंभीर मुद्रेने राजांनी दरबारात पाऊल टाकले. सारे जण अदबीने उभे राहिले. दिंडीबाहेर तुतारीचा नाद घुमला. सर्वाना आसनस्थ होण्याची खूण करून राजे स्वत: सिंहासनावर बसले. आज त्यांच्या चेहऱ्यावर कमालीचे समाधान दिसत होते. गेले अनेक दिवस काहीशा तणावामुळे राजे अस्वस्थ भासत होते. राजांच्या पदरी असलेल्या नवरत्नांनाही तो तणाव जाणवत होता. एके दिवशी धीर करून एक जाणता सरदार राजांच्या कानाशी झुकला. ‘राजे, असे कुढत दिवस काढण्यापेक्षा एकदाच आपण हा ताण संपवावा. दिल्लीत जाऊन गनिमी कावा दाखवावा आणि शत्रूला गाफील करून योग्य वेळ येताच संधी साधावी’.. सरदाराने कानाजवळून तोंड बाजूला केले आणि डोळे मिचकावत स्वतचा डावा कान खसाखसा खाजवला. राजांनी गंभीरपणे त्याच्याकडे पाहात मान हलविली. सरदाराचा सल्ला पटल्याचे समाधान राजांच्या चेहऱ्यावर उमटले, आणि त्यांनी दिल्ली गाठण्याची तयारी केली. आज तीच मोहीम फत्ते करून राजे महाली परतले होते. दरबारातील कलाकारांकडे पाहात राजांनी हलकेसे हास्य केले. सारे कलाकार हारीने समोर उभे होते. राजांनी खूण करताच, पाठीशी घेतलेले हात कलाकारांनी समोर केले, आणि राजांचे डोळे विस्फारले. प्रत्येकाच्या हातात एकएक ‘सुवर्ण कमळ’ होते. राजे स्वतशीच हसले. कमळ पाहून त्यांचा चेहरा प्रसन्न झाला. राजांनी पाठीमागे बघितले. सिंहासनाच्या बाजूलाच एक फायबरचा वाघ तांबारल्या डोळ्यांनी दरबाराकडे पाहात होता. राजांनी त्याकडे दुर्लक्ष केले. कलाकारांनी सोबत आणलेली सुवर्ण कमळे पाहून राजे सुखावले होते. दरबारातच सिंहासनासमोर एक सुंदर कारंजे होते. राजे प्रसन्न झाले. हातातील कमळ वाघाच्या शेजारी शोभणार नाही, हे उमगताच त्यांनी तळ्याच्या नक्षीदार काठावर कमळाची फुले रचली. तळ्यातील कासवाने समजूतदारपणे एक झोकदार गिरकी घेतली होती. कासवाची गिरकी पाहून राजे समाधानाने हसले.. राजांच्या  कानाशी लागून त्यांना गनिमी काव्याचा सल्ला देणाऱ्या सरदाराने डावा कान खसाखसा खाजविला आणि हसत दरबारात नजर फिरवली. दिंडी दरवाजाबाहेर पुन्हा तुतारी घुमली..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray and narendra modi
First published on: 14-04-2017 at 02:47 IST