वेफरसारखे चाबरट खाद्यपदार्थ खाण्याची सवय त्यांना खरं तर आधी नसावी. पण व्हाइट हाऊसमध्ये टीव्ही पाहण्याची सवय त्यांना लागली तेव्हापासून ते बिघडले आणि टीव्ही पाहात चाबरट खाद्यपदार्थ खाणारी माणसं जशी दिसतात, तसेच ते दिसू लागले. हे आमचं मत नव्हे. आमचे परमशेजारी लेले यांचं हे मत आहे. म्हणजे लेले यांचं हे मत २७ ऑक्टोबरच्या शनिवापर्यंत नव्हतं. पण २८ ऑक्टोबरच्या रविवारी, सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांनी ते बोलून दाखवलं. आणि खोटं कशाला बोला, आम्हाला ते तत्क्षणी पटलं! एरवी लेले त्यांची मतं मांडतच असतात आणि आम्ही त्यांची अनेक मतं पटत नसूनसुद्धा ऐकून घेत / व्हॉट्सअ‍ॅपवर वाचत असतो. लेले यांची मन की बात ‘लाइव्ह’ असते ती दर रविवारी. म्हणजे त्या दिवशी लेले आमच्याकडे पेपरबिपर मागायला किंवा हातातला पेपर द्यायला येतात. तेही नाही जमलं तर जिन्यात किंवा कम्पाउंडमध्ये गाठतात आणि आमच्या घरी येऊन आम्हाला प्रत्यक्ष समोरासमोर त्यांची मतं ऐकवतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

थोडं विषयांतर होईल, पण लेले यांची बहीण अमेरिकेत असते. ही बहीण लेकीच्या पहिल्या बाळंतपणाला जाऊन सहा महिने राहिली, तेव्हापासून तिला इंडियात करमतच नाही. म्हणून नातीला सांभाळायला जाते, सहा महिन्यांनीच परत येते. इंडियात आल्यावर शहरापासून दूर, कॉम्प्लेक्समध्ये राहणारी ही बहीण रात्रभर स्काइपवरून नातवंडांशी बोलते आणि दिवसा आराम करते. लेले यांना तिचा फार अभिमान आहे. लेले मुळातच भक्त-प्रवृत्तीचे, त्यामुळे त्यांच्या देशभक्तीबद्दल शंका नाहीच. पण बहिणीमुळे त्यांना अमेरिकेचाही अभिमान आहे. सहसा अमेरिकेबद्दल उणा शब्द लेले काढत नाहीत. पण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारतीय प्रजासत्ताकाचा अपमान केला (हेही लेलेंचं मत) तेव्हा लेले भडकले. २८ ऑक्टोबरच्या रविवारी, सकाळी अकरा वाजता आमच्या घरात शिरून त्यांनी थेट डाफरायला सुरुवात केली : काय काम असतं हो एवढं? तिथे पिट्सबर्गमध्ये ११ माणसं एकावेळी मरतायत, स्वत:चा देश नीट सांभाळता येतो का? म्हणे कामं आहेत म्हणून येत नाही.. स्टेट ऑफ द नेशन म्हणे, इथं आमच्या नेशनची सगळी स्टेट रंगीबेरंगी चित्ररथ काढतात ते साधं बघणारसुद्धा नाही? कामं म्हणे..

लेले यांचा राग नेमका कशावर आहे, हे कळेपर्यंत अर्धा तास गेला आणि साडेअकराच्या सुमारास लेले यांनी त्यांचं ते अंतिम मत ऐकवलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे त्यांच्या अधिकृत निवासस्थानीच चित्रवाणी संचापुढे बसून ‘चाबरट’ खाद्यपदार्थ खात असतील आणि बाकी काहीच करत नसतील, असा त्या मताचा अर्थ होत असल्यामुळे इथे ते स्पष्ट लिहिता येत नाही. पण आम्हाला त्या क्षणापुरतं तरी हे मत पटलं, याचं कारण आमचाही देशाभिमान!

पण खोटं कशाला बोला? संध्याकाळी घरचा चित्रवाणी संच सुरू करताना वाटलं : ‘कार्यबाहुल्य’ हे कारण देऊन डोनाल्डभाऊंनी २६ जानेवारीला दिल्लीत येण्याचं निमंत्रण नाकारलं, हेच बरं झालं. भारताच्या प्रजासत्ताक दिनाचं संचलन काय, घरच्या घरी चित्रवाणी वाहिन्यांवरूनही पाहता येतं.

मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us president donald trump turns down invitation to visit india on republic day
First published on: 29-10-2018 at 00:10 IST