सत्तेपुढे शहाणपण नसते म्हणतात; पण एवढे ज्ञान उत्तराखंडातील त्या शिक्षिकेला असते, तर तिने मंत्र्याच्या विधानाला छेद देऊन खरेखुरे उत्तर दिलेच नसते. सत्ताधीशाने बोलावे आणि जनतेने डोलावे असा जमाना आलेला असताना, नेत्याच्या मनातील गणिताचे उत्तर ओळखण्याची कला सामान्यांना कधी अवगत होणार, असा प्रश्न सांप्रतकाळी देशात सर्वत्र फोफावला आहे. सामान्य माणसांची गणिते ही गणिताच्या सूत्रानुसारच सोडवली जात असली, तरी राजकारणाच्या गणिताची सूत्रे वेगळी! येथील एकाचे बेरजेचे गणित हे दुसऱ्या कुणाची तरी वजाबाकीच असते. शिवाय, कोणत्याही प्रश्नाचे उत्तर हे, ‘द्यायचे की घ्यायचे’ या प्रश्नावर अवलंबून असते. म्हणजे, ‘दोन अधिक दोन’ या प्रश्नाचे आपल्यासारख्यांचे उत्तर सरळ आणि स्पष्ट ‘चार’ असेच येईल; पण राजकारणात, ‘द्यायचे’ असतील तेव्हाचे उत्तर ‘तीन’ आणि ‘घ्यायचे’ असतील तर, याच प्रश्नाचे उत्तर ‘पाच’ असेही येईल. आपल्या राज्यातील काही ‘जाणत्यां’ची गणितेही अशाच सूत्रावर बेतलेली असतात, असे म्हणतात; पण मुद्दा आपल्या राज्याचा नाहीच. हे गणित आहे, उत्तराखंडाच्या शिक्षणमंत्र्याचे! आता शिक्षणमंत्री म्हणजे तमाम शिक्षकवर्गाचा पोशिंदा आणि शैक्षणिक धोरण वगरेचा जन्मदाता असल्याने, त्याची अक्कल शिक्षकवर्गापेक्षा अधिक, हे ओघानेच येते. त्यानुसार उत्तराखंडाचे शिक्षणमंत्री अरिवद पांडे यांनी एका सरकारी शाळेत आपल्या गणिताच्या ज्ञानाचे अगाध दर्शन घडविले. ‘उणे’ अधिक ‘उणे’ या प्रश्नाचे उत्तर बिचाऱ्या शिक्षिकेने परंपरागत शिक्षणपद्धतीनुसार झालेल्या शिक्षणाच्या उपकाराला जागून ‘उणे’ असे दिले, पण राजकारणाचे गणित वेगळेच असते हे तिला ठाऊकच नसावे. उणे अधिक उणे या बेरजेचे उत्तर ‘अधिक’ असेच येते, असा हट्ट शिक्षणमंत्र्यांनी धरला आणि हे उत्तर गणिताच्या सूत्राशी विसंगत असल्याचे कळूनही, बिचाऱ्या शिक्षकवर्गाला मंत्र्यापुढे मान डोलवावीच लागली. गेल्या काही महिन्यांत, देशाच्या राजकारणात बेरीज आणि वजाबाकीची गणिते अक्षरश: उफाळली आहेत. त्यातच ‘काँग्रेसमुक्त भारता’साठी भाजपला केवळ बेरजेचे गणितच दिसू लागले आहे. काँग्रेसमधून होणारी ‘वजाबाकी’ हे भाजपचे ‘बेरजे’चे गणित असते, हे राजकीय गणित सरकारी शाळेत शिकविणाऱ्या शिक्षकांना माहीत असणे फारसे संभवतच नाही.  काँग्रेसमध्ये वजाबाकी घडवायची आणि भाजपमध्ये बेरीज जमवून आणायची हाच एककलमी कार्यक्रम देशभराप्रमाणे उत्तराखंडातही सुरू असणार. शेवटी, ‘परफॉर्म ऑर पेरिश’ असा ‘दम’ मुख्य शिक्षकांनी पहिल्याच शिकवणीत दिलेला असल्याने आणि पक्षाच्या एकचालकानुवíतत्व धोरणामुळे अन्य सारे नेते हे केविलवाणे कार्यकत्रेच असल्याने, त्यांना मान डोलावणे स्वत:च्या भवितव्याच्या चिंतेमुळे भागच असते. या धसक्यातूनच शिक्षणमंत्र्यांना दोन वजाबाक्यांच्या गणितातून बेरजेचे उत्तर मिळविण्याची ही धडपड करावी लागली असावी. हे उत्तर बरोबर असो वा नसो, मुख्य शिक्षकाचे समाधान होणे महत्त्वाचे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uttarakhand education minister arvind pandey insults teacher
First published on: 18-09-2017 at 02:46 IST