ही बातमी नवी नाही. अनेक वर्षांपासून कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात रानटी हत्तींचा हा कळप धुमाकूळ घालतोय. दहशत माजवली आहे या कळपाने. जीव मुठीत धरून वावरण्याची वेळ या रानटी हत्तींनी आणली, तेव्हा जनतेने सरकारलाही साकडे घातले. सरकारने या हत्तींना हुसकावून लावण्याचे अनेक प्रयत्न केले, पण त्यात त्यांना यश आले नाही. या कळपातला टस्कर तर भयंकरच आक्रमक आहे. केवळ त्याच्या आठवणीनेही अनेकांची गाळण उडायची. या रानटी हत्तींच्या बंदोबस्तासाठी सरकारी अधिकाऱ्यांनी केरळ, कर्नाटकात जाऊन अभ्यास केला आणि अनेक वर्षांच्या हत्तींच्या धुडगुसानंतर आता म्हणे सरकारला एक उपाय सापडला आहे. या हत्तींना माणसाळावयाचे आणि त्यांच्याकडून काही विधायक कामे करून घ्यायची असे आता सरकारने ठरविले आहे, ही यातली नवी बातमी! असे काही तरी होणार याची कुणकुण समाजाला अगोदरच लागलीही होती. अनेकांचा यालाही विरोधच होता अशीही चर्चा आहे. स्वत: मुख्यमंत्रीदेखील या प्रयोगास फारसे अनुकूल नव्हते, अशी आतल्या गोटातील खबर आहे. पण वरून त्यांना दटावले गेले. ‘जबडय़ात घालुनी हात, मोजतो दात, जात ही अमुची’ असे म्हणता आणि दोन-तीन रानटी हत्तींना घाबरता? असा सवाल त्यांना ‘वरून’ केला गेला आणि मुख्यमंत्री नरमले. ‘ठीक आहे’ म्हणाले. आता या हत्तींना ‘माणसात आणण्याचे’ प्रयोग सुरू होणार आहेत. एवढे दिवस धुमाकूळ घालणाऱ्या, नासधूस करणाऱ्या या उन्मत्त रानटी हत्तींना वठणीवर आणण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी काही विश्वासू माहुतांवर सोपविली आहे असे म्हणतात. हे हत्ती सिंधुदुर्गात कामाला येतील, तेथील जनतेलाही दिलासा मिळेल असा काही तरी तोडगा काढून हत्तींना माणसात आणा, असे त्यांनी या विश्वासू माहुतांना बजावले आहे. केरळ-कर्नाटकात तर असे किती तरी जंगली हत्ती निमूटपणे माणसांच्या मदतीसाठी कामे करतात. त्यांचा रानटी माज उतरविणे आणि त्यांना माणसाळविणे हे काम सुरुवातीला काहीसे अवघड असते. कारण आपल्या जंगलात आपण काहीही करू शकतो, या मस्तीत वावरणारे हे हत्ती सुरुवातीस संस्कारांचे सारे प्रयोग झिडकारूनच लावतात. याआधी काहींनी हा प्रयोग करून पाहण्याचे प्रयत्नही केले. काहींनी तर हत्तींचा उपद्रव थांबविण्यासाठी आणि त्यांना आपल्या हद्दीबाहेर हुसकावून लावण्यासाठी धक्कातंत्राचा- म्हणजे, विजेचा प्रवाह असलेल्या तारांच्या कुंपणाचाही- प्रयोग केला. पण माजलेल्या या हत्तींना वठणीवर आणण्याचा नाद सोडून देणेच त्यांनी पसंत केले आणि हत्तींनी पुन्हा उच्छाद मांडला. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात याआधी कधी असा रानटी प्राण्यांचा उपद्रव होत नसे. शांत, सोज्वळ वातावरणात, हाती असेल तेवढय़ात समाधानाने जगावे अशी येथील सामान्य माणसाची प्रवृत्ती.. त्यामुळे रानटी हत्तींच्या धुमाकुळानंतर त्याला तडा गेला. आता या हत्तींना माणसाळविण्याच्या प्रयोगाकडे साऱ्या ‘शिंदुर्गा’चे लक्ष लागले आहे.. काय होते बघायचे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wild elephant in sindhudurg
First published on: 02-10-2017 at 03:54 IST