अहाहा! काय तो प्रसंग वर्णावा.. साक्षात् सद्गुरू योगीजी असे समोर उच्चासनी बसलेले. त्यांच्या चेहऱ्यावर तेज. मागे प्रभावळ. जणू सहस्ररश्मी एकसमयावच्छेदेकरून प्रकाशमान झालेले. त्यांच्या पुढय़ात भक्तांची ही गर्दी. त्यातील प्रत्येक जण असा आध्यात्मिक तल्लीनतेस पावलेला. योगीजींच्या मुखातून विचारमौक्तिकांचा असा सडा सांडतोय आणि प्रत्येक श्रोता आपल्या कर्णसंपुटात तो साठवून घेतोय. असा तो सगळा माहोल..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजूनही आमच्या मध्य आणि अंतकर्णेद्रियांतील गाभाऱ्यात योगीजींची ती वाणी घुमत आहे. ते सांगत होते – ‘अखेर हे सर्व विश्व म्हणजे काय आहे? हे भवताल, हा आसमंत, ही प्रकृती.. काय आहे? ही सारी माया आहे. आपल्या मानण्यावर हे आहे सारे. आपला दृष्टिकोन, आपले विचारचक्षू यांवर हे सारे अवलंबून आहे. समजा आपण डोळे झाकले तर समोर काय असते? अंधार! म्हणजे आपल्यासाठी सत्य काय? तर अंधार.’ अहाहा! किती योग्य, किती रास्त हे विचार. हे विचार जर सर्वानी आचरणात आणले तर हे जग किती सुखी होईल? पण नाही. तामसी, राक्षसी वृत्तीने घेरून टाकले आहे आपले सर्व विचारविश्व. त्यामुळे आपणांस जिकडेतिकडे वाईटच दिसते. हल्लीचेच पाहा. तामसी लोक म्हणतात, की या देशात लिंचिंग वाढले आहे. आम्हांस तर आधी हे लिचिंग म्हणजे काय तेच कळेना. नंतर कोणी तरी सांगितले, की १९८४ मध्ये दिल्लीत जे झाले त्यास लिंचिंग म्हणतात. आता थोडा तार्किक विचार केला तर कोणाच्याही लक्षात येईल, की झुंडीकडून होत असलेल्या हत्येची सुरुवात तर तेव्हापासून झालेली आहे. आणि ते तर काँग्रेसचे पाप. बिगरकाँग्रेसी राज्यात असे कधी घडलेच नव्हते. पाहा ना विचार करून. झाका पाहू डोळे. बघा, काय दिसते ते.. अंधार! म्हणजे सिद्धच झाले की नाही की पूर्वीच जास्त प्रमाणात झुंडकारण होते, झुंडीने केलेल्या हत्या होत्या. परंतु लोक असे राक्षसी की ते म्हणतात, आताच गोरक्षणाच्या नावाखाली झुंडकृत हत्या होत आहेत. असो.

योगीजी पुढे सांगत होते – ‘आपण एखाद्या गोष्टीस किती महत्त्व देतो त्यावरच त्या गोष्टीचे महत्त्व ठरत असते.’ किती उच्च, उन्नत, उदात्त असा हा विचार! आणि कित्ती कित्ती खरा! आता समजा आपण झुंडकृत हत्यांना महत्त्वच दिले नाही तर त्यांना महत्त्व उरेल का? आणि समजा एखाद्याला एखादी बाब कितीही महत्त्वाची वाटली, तर जोवर आपण ती महत्त्वाची मानत नाही तोवर ती महत्त्वाची ठरेल का? हे जरा गुंतागुंतीचे तत्त्वज्ञान आहे. पण योगीजींनी ते छानच सोपे करून सांगितले – ‘झुंडकृत हत्येला नको ते महत्त्व दिले जात आहे कारण काँग्रेसला राईचा पर्वत करायचा आहे त्यातून.’ बरोबरच आहे. हत्या, आत्महत्या, प्राणवायूअभावी लहानसहान मुले मरणे हा सर्व प्रकृतीचा नियमच आहे. ते घडतेच. आता आपण जर सतत मृत्यूचाच नकारात्मक विचार करीत राहिलो, तर मग हे जीवन आनंदी होईल का?

तेव्हा ‘भो भक्तहो, नकारात्मक विचार सोडा. कशाला महत्त्व द्यायचे ते आम्ही सांगू. त्यालाच महत्त्व द्या. तेव्हा डोळे मिटा आणि पाहा.. किती छान अंधार पडलाय..’ योगीजी प्रवचन देत होते आणि आम्ही डोळे झाकून घेतले होते..

मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yogi adityanath
First published on: 27-07-2018 at 03:02 IST