डेमिस हसाबिस म्हणजे ‘पृथ्वीपेक्षाही मोठा मेंदू असलेला माणूस’! जगभरात त्याची हीच ओळख आहे. वय अवघे ३७. पण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील हा दादा माणूस. त्याची डीपमाइंड टेक्नॉलॉजिस ही कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी गुगलने अलीकडेच विकत घेतली. आणि त्यानिमित्ताने त्याचे नाव पुन्हा चर्चेत आले. कारण – तब्बल ४९.८० कोटी डॉलरचा हा खरेदी करार म्हणजे युरोपमधील गुगलचा सर्वात मोठा ‘ताबाव्यवहार’ आहे.
संगणकीय तंत्रज्ञान, वैद्यकशास्त्र आणि बुद्धिबळ अशा तीन परस्परांपासून वेगळ्या तरीही बुद्धिमत्तेची कसोटी पाहणाऱ्या तीन क्षेत्रांत एकाच वेळी आपला ठसा उमटवणाऱ्या डेमिसने वयाच्या चौथ्या वर्षांपासून बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात केली होती. आणि हा मनुष्य इतका श्रीमंत की अवघ्या तेराव्या वर्षी इंग्लंडकडून खेळताना त्याने मास्टर किताब पटकावला होता. वयाच्या १६व्या वर्षी, १९९४मध्ये त्याने बुलफ्रॉग या कंपनीत काम करताना ‘थीम पार्क’ हा गेम बनवला. हा गेम प्रचंड लोकप्रिय ठरला. लंडनमधील क्वीन्स कॉलेजमधून कम्प्युटर सायन्स विषयातून पदवी घेतल्यानंतर डेमिसने स्वत:चा व्यवसाय सुरू केला. एलिक्सिर स्टुडिओज नावाने सुरू केलेल्या या कंपनीत त्यांनी ‘रिपब्लिक : द रिव्होल्यूशन’ हा गेम बनवला. हा गेमही त्यांच्या आधीच्या गेमप्रमाणेच पसंतीस उतरला. या गेमला ‘बाफ्टा’साठी नामांकनही मिळाले होते.
गेम बनवण्याचे क्षेत्र पादाक्रांत केल्यानंतर त्याने आपला मोर्चा वैद्यकशास्त्राकडे वळवला. कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटिलिजन्स) हा त्याच्या आवडीचा विषय. कोणताही मानवी हस्तक्षेप न करता संगणकालाच स्वत:चेच नियोजन आणि समोर पडलेल्या प्रश्नांची उकल करण्याची क्षमता उपलब्ध करून देणे म्हणजे आर्टिफिशियल इंटिलिजन्स होय. हसाबिस याने या शाखेची पदवी मिळवल्यानंतर २०११मध्ये त्याने अन्य दोघांच्या साथीने ‘डीपमाइंड टेक्नॉलॉजिस’ची स्थापना केली. मेंदुशास्त्र अभ्यासक आणि संगणक प्रोग्रॅमर्स अशा दोन वेगवेगळ्या क्षेत्रांतील तज्ज्ञांना एकत्र आणून ‘डीपमाइंड’ने संगणकाला स्वत:ची बुद्धी देण्यासाठी अभिनव प्रयोग राबवण्यास सुरुवात केली. अवघ्या दोन वर्षांत ही कंपनी इतकी नावारूपाला आली की तंत्रज्ञान क्षेत्रातील दोन मोठय़ा कंपन्या गुगल आणि फेसबुक यांनी ती खरेदी करण्यासाठी डेमिसशी बोलणी सुरू केली. फेसबुकसोबतची बोलणी अयशस्वी ठरल्यानंतर २६ जानेवारी रोजी गुगलने ‘डीपमाइंड’ खरेदी केली. डेमिसच्या ‘अफाट’ मेंदूतून जन्मलेल्या ‘डीपमाइंड’वर आता गुगलची ताबेदारी येईल. पण ‘पृथ्वीपेक्षाही मोठा मेंदू असलेल्या’ डेमिसच्या डोक्यात खोल कुठेतरी नवा आणि अचाट प्रयोग जन्म घेत असेल, हे नक्की.
संग्रहित लेख, दिनांक 31st Jan 2014 रोजी प्रकाशित
डेमिस हसाबिस
डेमिस हसाबिस म्हणजे ‘पृथ्वीपेक्षाही मोठा मेंदू असलेला माणूस’! जगभरात त्याची हीच ओळख आहे. वय अवघे ३७. पण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील हा दादा माणूस.
First published on: 31-01-2014 at 12:14 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vaiktivedh demis hassabis