विमानतळ नुसता आलिशान दिसून चालत नाही, त्या इमारतीचे मुख्य काम तिने करायचेच असते, हे सर्वज्ञात असूनही ‘जीव्हीके’ कंपनीने मुंबईत उभारलेला द्वितीयतळ किंवा ‘टर्मिनल टू’चे कौतुक रूपसौंदर्यासाठी होते आहे आणि या कंपनीचे संस्थापक अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गुणपती वेंकट कृष्ण रेड्डी हल्ली प्रत्येक मुलाखतीत सांगताहेत.. ‘अभियांत्रिकीकडेही पाहा’! अर्थात, कष्टांऐवजी यशाची चमकच लोकांना पहिल्यांदा दिसते, हे जीव्हीकेंना स्वत:च्या संघर्षमय आयुष्याच्या उदाहरणानेही माहीत असणारच. नेल्लूर या मूळ गावातून हैदराबादेत शिकण्यासाठी येऊन, नेहरूकालीन कल्पनांनी प्रभावित झालेले आणि मग नागार्जुनसागर धरणाचा एखादा कालवा बांधण्याचे कंत्राट पूर्ण करणारे जीव्हीके कंत्राटदारीच्या पुढे गेले. इंजिनीअिरगचे शिक्षण नसताना कालवा पूर्ण केला, तसेच अन्य उद्योगांतही अनुभव नसताना त्यांनी उडी घेतली आणि ते उद्योगही यशस्वी करून दाखविले. एक महत्त्वाची व्यवसायनीती जीव्हीके यांनी सतत वापरली. प्रस्थापित, पण फार न चालणाऱ्या उद्योगांत आपले भांडवल गुंतवायचे, ते वाढवत न्यायचे आणि त्या उद्योगाला उभारी देऊन भांडवली मूल्य आणखी वाढवायचे. विमानतळ उभारणीच्या क्षेत्रात येण्याआधी, १९९७ सालीच त्यांनी वीजनिर्मिती प्रकल्प उभारणीचे काम पूर्ण केले होते. विजेखेरीज हॉटेल व पायाभूत क्षेत्रांतील कंपन्या यांवर त्यांचा भर राहिला. या क्षेत्रातील भांडवल-साहस करताना ज्या अडचणी येतात, त्या सोडवण्याचे मार्ग जीव्हीके यांनी वापरले, त्यातून भूखंडांबद्दल काही आरोपही एकदा झाले आणि त्यांच्या राजकीय संबंधितांबद्दलची कुजबुज तर नेहमीच सुरू राहिली. या साऱ्यावर मात करत, यशाची नवनवी शिखरे ते पार करत राहिले.
केवळ अब्जाधीशांच्या यादीतला क्रमांक वाढवत राहण्यावर समाधान मानणारे जीव्हीके नाहीत. त्यांच्या भांडवली साहसांमुळेच त्यांचा क्रमांक घसरलाही आहे, या यादीतून ते फेकलेही गेले आहेत. पण उद्योजकांसाठीचे अनेक पुरस्कार मिळाल्याचे त्यांना अप्रूप आहे. भारत सरकारच्या पद्मभूषण किताबाचे मानकरी ठरल्यानंतर हे उद्योजकी पुरस्कार घेणे त्यांनी कमी केले. त्याच दरम्यान, मालदीवमधल्या विमानतळाचे कंत्राट रद्द करण्याची कारवाई तिथल्या लष्करशाहीने केल्यावर भारत सरकारने पाठराखण न केल्यामुळे नुकसानच झाले.
तरीही, करायचे ते दणक्यात ही जीव्हीके यांची शैलीच. बेंगळुरूत त्यांनी बांधलेला विमानतळ याची साक्ष देतो, तसेच अख्ख्या हैदराबादेत गाजलेला त्यांच्या मुलाचा विवाहसोहळाही. टीका अथवा स्तुती यांची फार पर्वा न करता आपल्या कार्यभागावर लक्ष राखायचे, ही शिस्त मात्र जीव्हीकेंच्या अंगी आज ७६व्या वर्षीही आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th Jan 2014 रोजी प्रकाशित
जीव्हीके रेड्डी
विमानतळ नुसता आलिशान दिसून चालत नाही, त्या इमारतीचे मुख्य काम तिने करायचेच असते, हे सर्वज्ञात असूनही ‘जीव्हीके’ कंपनीने मुंबईत उभारलेला द्वितीयतळ किंवा ‘टर्मिनल टू’चे कौतुक रूपसौंदर्यासाठी होते आहे

First published on: 15-01-2014 at 04:00 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vaiktivedh gvk reddy