लोकप्रतिनिधित्वाची झूल अंगावर चढली, की एखाद्याच्या आयुष्याचेच नखशिखान्त सोने होऊन जाते आणि लोकप्रतिनिधित्व हा विशेषाधिकार आहे अशा समजात त्या व्यक्तीचा वावर सुरू होतो. आलिशान बंगल्याच्या दाराशी उभ्या असलेल्या इंपोर्टेड मोटारगाडय़ांमुळे लोकप्रतिनिधींची ओळख रूढ होत गेली, त्या काळातच त्र्यंबक सीताराम कारखानीस नावाचे एक आमदार याला अपवाद म्हणून वावरत होते. शेतकरी कामगार पक्षाचे शाहुवाडीचे आणि नंतर कोल्हापूर शहराचे आमदार म्हणून १९५७ पासून चार वेळा विधानसभा गाजविणाऱ्या या आमदाराचे मोठेपण मात्र त्यांच्या साध्या राहणीतूनच ठळक झाले होते.   त्यांच्या घरावर आमदारकीची झूलदेखील कधी चढली नाही. राजकारण हे सेवाव्रत समजून निरलसपणे काम करणाऱ्या त्र्यंबकरावांना त्यांच्या पत्नीने, हेमलता ऊर्फ माई कारखानीस यांनी सावलीसारखी साथ दिली. पतीच्या सेवाव्रताला कोणतेही गालबोट लागू नये, यासाठी माईंनी जीवन वेचले. पतीच्या राजकीय वजनाचा लाभ उठवून आपल्याही संसाराचे सोने करणे त्यांना सहज शक्य होते, पण त्यांनी तो मार्ग कधीच स्वीकारला नाही आणि राजकारणाच्या मार्गाने दारी येणाऱ्या संपत्तीची, वैभवाची स्वप्नेदेखील कधीच पाहिली नाहीत. त्यागाची, निरपेक्षभावाची वृत्ती सहजासहजी साध्य होत नसते. आमिषांचे आणि मोहाचे क्षण सदैव आसपास घुटमळत असतानाही जाणीवपूर्वक त्यांना अव्हेरण्यासाठी कणखर मन आणि धाडसही लागते. माई कारखानीस यांनी पतीच्या सेवाकार्यात सावलीसारखी साथ देताना ते दाखविले, जपले म्हणून त्र्यंबक सीताराम कारखानीस नावाच्या एका आमदाराभोवती सच्चाईचे वलय कायम राहू शकले. त्र्यंबकराव कारखानीसांच्या हयातीतच नव्हे, तर त्यांच्या पश्चातदेखील माईंनी ही निरपेक्ष सेवावृत्ती सातत्याने जपली. कोल्हापुरात कपिलतीर्थाजवळ संसाराची सुरुवात करून एका ध्येयवादी पतीच्या वाटचालीला खंबीरपणे साथ देणाऱ्या माई कारखानीसांचे वयाच्या ८४ व्या वर्षी, पत्र्याचे छप्पर असलेल्या तीन खोल्यांच्या म्हाडाच्या घरात गेल्या शुक्रवारी निधन झाले. आमदारकीचे मानधनदेखील गरजूंना वाटून टाकणाऱ्या त्र्यंबकरावांचा संसार करताना त्यांनी दाखविलेली निष्ठा अजोड आणि दुर्मीळ अशीच आहे. आपला नवरा ज्या समाजासाठी झगडतो, त्या समाजाच्या वेदनांचे वाटेकरी होण्याची जणू माईंना आस होती. कोल्हापूर शहर अलीकडे राजकीयदृष्टय़ा खूपच संवेदनशील झाले आहे. लहानमोठय़ा घटनांचे राजकीय पडसाद जनजीवनावर उमटत असतात आणि शहरभर फलकबाजी सुरू होते, पण निरलस सेवाभावाचे प्रतीक बनलेल्या माईंच्या निधनाची वार्ता मात्र शहराच्या कानाकोपऱ्यापर्यंत म्हणावी त्या वेगाने गेलीच नाही. प्रसिद्धीपासून आयुष्यभर दूर राहिलेली ही महिला अखेरच्या श्वासापर्यंत त्या व्रतालाही जागली.