असंवेदनशीलतेची किंमत

२०१२-१३ मध्ये कॅरियर आयक्यूच्या विरोधात अमेरिकेतील विविध न्यायालयांत गोपनीयता-भंगाचे तब्बल १८ खटले भरण्यात आले.

अमृतांशु नेरुरकर amrutaunshu@gmail.com
‘वापरकर्त्यांच्या नकळत विदा जमा केली’ या आरोपाला ‘हेतू शुद्धच’ हे उत्तर पुरेसं नसतं; हे नंतर उमगलं..

ट्रेवर एक्हार्टने एचटीसी स्मार्टफोनमध्ये ‘कॅरियर आयक्यू’च्या सॉफ्टवेअरतर्फे होत असलेलं वापरकर्त्यांच्या संवेदनशील गोपनीय माहितीच्या कथित हेरगिरीचं प्रकरण उघडकीस आणल्यानंतर प्रचंड गदारोळ तर झालाच; पण त्यामुळे होणाऱ्या नकारात्मक प्रसिद्धीचा सर्वाधिक फटका अर्थातच कॅरियर आयक्यूला बसला. या प्रकरणाच्या सहाच वर्ष आधी, २००५ मध्ये तंत्रज्ञानातील नवउद्यमींचं नंदनवन समजल्या जाणाऱ्या कॅलिफोर्नियाच्या सिलिकॉन व्हॅलीत कॅरियर आयक्यूचा जन्म झाला होता. त्या काळात उदयास येत असलेल्या सेल्युलर तंत्रज्ञानाची विविध कंपन्यांच्या स्मार्टफोन्सवरील कार्यक्षमता तपासण्यासाठी कॅरियर आयक्यू वेगवेगळ्या स्वरूपांची सॉफ्टवेअर्स बनवायची. या सॉफ्टवेअरच्या मदतीने गोळा होणारी माहिती सेल्युलर सेवापुरवठादार कंपनीला आपल्या सेवेचा दर्जा उंचावण्यास पुष्कळ मदत करीत असे.

स्मार्टफोनची कमीत कमी मेमरी खाणारी, कार्यक्षमतेने चालणारी आणि सेल्युलर सेवेसंदर्भात अचूक विदा (डेटा) गोळा करू शकणारी ही सॉफ्टवेअर्स अल्पावधीतच सेल्युलर सेवापुरवठादार व स्मार्टफोन उत्पादकांमध्ये अत्यंत लोकप्रिय झाली आणि अल्पावधीतच दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपन्या (एचटीसी, टी-मोबाइल, एनईसी, हूएवी आदी) कॅरियर आयक्यूच्या ग्राहक तथा भागीदार झाल्या. २०११ पर्यंत कंपनीने या क्षेत्रातील एक आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी म्हणून चांगलाच नावलौकिक कमावला होता. एक्हार्टने गौप्यस्फोट करायच्या दोनच आठवडे आधी, २७ ऑक्टोबर २०११ रोजी ‘आयडीसी’ या (तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध उत्पादनं, सेवा तसेच घडामोडींवर संशोधन व त्यांचं विश्लेषण करून भविष्यातील शक्यतांची मांडणी आपल्या संशोधन अहवालात करणाऱ्या) अग्रगण्य कंपनीने कॅरियर आयक्यूचा ‘‘बिझनेस अ‍ॅनॅलिटिक्स’ क्षेत्रातील मध्यम आकाराच्या कंपन्यांमधली सर्वश्रेष्ठ कंपनी’ म्हणून गौरव केला होता.

कंपनी यशाची अशी नवनवीन शिखरं पादाक्रांत करत असताना एका य:कश्चित संगणक तंत्रज्ञानं गोपनीयतेच्या उल्लंघनाचे कंपनीवर केलेले आरोप, कॅरियर आयक्यूच्या संचालक मंडळाला जराही रुचले नाहीत. वास्तविक कॅरियर आयक्यूचं सॉफ्टवेअर्स स्मार्टफोन्समध्ये अधिष्ठापित (इन्स्टॉल) करण्यामागे फोन उत्पादक कंपनीचा आणि खुद्द कॅरियर आयक्यूचासुद्धा माहितीचौर्य किंवा हेरगिरीचा कोणताही उद्देश नव्हता. सेल्युलर सेवापुरवठादार कंपन्या कॅरियर आयक्यू सॉफ्टवेअरद्वारे गोळा केलेल्या माहितीचा वापर, त्यांच्या ग्राहकांना सेल्युलर सेवा देशाच्या कोणत्याही भागात विनाव्यत्यय मिळत राहावी व एकंदरीत त्यांच्या सेवेचा दर्जा सुधारावा यासाठी करत होत्या. शहराच्या एखाद्या भागात नेटवर्क व्यवस्थित येत नसेल तर वापरकर्ता त्याच्या स्मार्टफोनवरून सेल्युलर आधारित एकही सेवा (कॉल करणं, एसएमएस पाठवणं किंवा इंटरनेटचा वापर आदी) वापरू शकायचा नाही. पण सेल्युलर कंपनीला ग्राहकांची ही समस्या लगेचच जाणून घेण्याचा काही मार्ग नव्हता कारण सिग्नलअभावी वापरकर्त्यांपर्यंत पोहोचणं हेच अशक्यप्राय व्हायचं. अशा वेळेला वापरकर्त्यांच्या फोनवरील ‘की-स्ट्रोक’च्या आधारे सेल्युलर कंपनी अशा जागांचा शोध घ्यायची व त्यावर योग्य त्या उपाययोजना (सेल्युलर मनोरे उभारणं वगैरे) करायची.

अ-संवादाची चूक!

असं असलं तरीही एक्हार्टनं काढलेले काही मुद्दे बिनतोड होते. एक तर असं काही सॉफ्टवेअर आपल्या फोनमध्ये आहे याचा वापरकर्त्यांला कसलाही थांगपत्ता लागणं, ते सॉफ्टवेअर अदृश्यावस्थेत कार्य करत असल्याने, जवळपास अशक्य होतं. दुसरं म्हणजे वापरकर्त्यांचे ‘की-स्ट्रोक’ जसेच्या तसे गोळा करणं आणि त्यानंतर ठरावीक वेळानं ते सेल्युलर सेवापुरवठादारापर्यंत पोहोचते करणं, हे प्रकार वापरकर्त्यांना अंधारात ठेवून चालू होते. त्याला आवडो अथवा न आवडो, कॅरियर आयक्यूचं सॉफ्टवेअर आणि विदा गोळा करणारी फाइल हटवता येत नसल्याने, गोपनीय माहितीची देवाणघेवाण निरंतर सुरू राहणार होती. यामुळेच ‘हा प्रकार म्हणजे वापरकर्त्यांच्या गोपनीयता हक्काचं उल्लंघन आहे’ असा एक्हार्टचा समज होणं अगदी साहजिक होतं.

कॅरियर आयक्यूचा अशा प्रकारची विदा गोळा करण्यामागचा हेतू कितीही शुद्ध असला तरीही शेवटी प्रश्न वापरकर्त्यांच्या गोपनीय माहितीच्या गैरवापरासंदर्भात असल्यानं, हा विषय अत्यंत संवेदनशील बनला. अशा वेळी कंपनीच्या संचालक मंडळाने एक्हार्टचे मुद्दे समजून घेऊन त्याचे गैरसमज दूर करण्यावर भर देण्याची गरज होती. जर एखादा विषय संवेदनशील असेल तर सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी संवादावर भर देणं हे परिपक्वतेचं लक्षण मानलं जातं. इथंच कॅरियर आयक्यूने घोडचूक केली. स्वत:च्या भूमिकेविषयी असलेल्या अतिआत्मविश्वासामुळे असेल किंवा अल्पावधीत मिळालेल्या यशाची हवा डोक्यात गेल्यामुळे असेल; पण कंपनीच्या संचालक मंडळानं एक्हार्टशी कोणताही संवाद न साधता, आपल्या संस्थळावर उपलब्ध असलेलं साहित्य एक्हार्टनं कोणत्याही परवानगीशिवाय वापरल्याबद्दल, चक्क कॉपीराइट उल्लंघनाचा खटला भरण्याची त्याला धमकी दिली. एवढंच नव्हे, तर एक्हार्टनं आपला या प्रकरणासंदर्भातला ब्लॉग तसंच यूटय़ूब दृक्-मुद्रणं संस्थळांवरून काढून टाकावीत अशी सूचनावजा आज्ञाही केली.

ईएफएफमुळे पारडं फिरलं!

कायदेशीर कचाटय़ात सापडण्याच्या भीतीने एक्हार्ट लगेच वठणीवर येईल याची कॅरियर आयक्यूच्या संचालक मंडळाला खात्री वाटत होती. पण कंपनीच्या दुर्दैवानं एक्हार्टच्या मदतीला इलेक्ट्रॉनिक फ्रंटियर फाउंडेशन (ईएफएफ) ही नागरिकांच्या मुक्त अभिव्यक्तीचा आणि गोपनीयता हक्काच्या रक्षणाचा हिरिरीनं पुरस्कार करणारी संस्था धावून आली. ईएफएफने एक्हार्टला कायदेशीर मदत तर पुरवलीच, पण कॅरियर आयक्यूशी लढण्यासाठी जी काही आर्थिक रसद लागेल तिची तजवीज करण्याचीही हमी दिली. ईएफएफच्या मदतीमुळे एक्हार्टनं कॅरियर आयक्यूला लिहिलेल्या पत्रात कंपनीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, कंपनीच्या संस्थळावर उपलब्ध असलेलं सर्व प्रकारचं साहित्य ही एक ‘सार्वजनिक ठेव’ (पब्लिक गुड) असल्यामुळे, कॉपीराइट-भंगाचा प्रश्नच उद्भवत नाही. या विषयासंदर्भात न्यायालयीन लढाई लढण्याची कंपनीची इच्छा असल्यास, त्यासाठीही तो तयार असल्याचं एक्हार्टनं ठणकावून प्रतिपादन केलं.

ईएफएफचा पाठिंबा व त्याआधारे एक्हार्टनं दिलेलं संयमी पण सडेतोड प्रत्युत्तर पाहून कॅरियर आयक्यूला आपल्या आक्रस्ताळ्या हाताळणीमुळे हे प्रकरण हाताबाहेर जात असल्याची प्रथमच जाणीव झाली आणि तिनं नरमाईचं धोरण स्वीकारण्याचं ठरवलं. एक्हार्टच्या पत्राला उत्तर देताना कंपनीनं आपल्या भूमिकेवरून पूर्णपणे घूमजाव करून, एक्हार्ट कॉपीराइट-भंग करत नसल्याचा स्वत:च निर्वाळा दिला व त्यामुळेच त्याच्यावर खटला दाखल करण्याचा प्रश्नच कसा उद्भवत नाही, अशी मखलाशी करीत त्याला आश्वस्त करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.

डिसेंबर २०११ मध्ये प्रथमच कॅरियर आयक्यूनं आपल्या संस्थळावर स्वत:च्या तंत्रज्ञानाचे अंतरंग उलगडणारी व त्याचा सेल्युलर सेवापुरवठादारांना होत असलेला उपयोग दर्शविणारी एक श्वेतपत्रिका प्रकाशित केली. त्यात कंपनीच्या सॉफ्टवेअरमुळे वापरकर्त्यांच्या गोपनीय माहितीला कसा धोका पोहोचत नाही यावर भाष्य केलं होतं. तसंच हे सॉफ्टवेअर फोन उत्पादक कंपन्यांकडूनच परस्पर फोनवर कसं अधिष्ठापित केलं जातं व त्यातून गोळा झालेली विदा कॅरियर आयक्यू कशी हाताळत नाही, हेही निक्षून सांगितलं होतं. पुढे २०१२ मध्ये कॅरियर आयक्यूनं, कंपनीची गोपनीयता धोरणं ठरविण्यासाठी एका विशेष अधिकाऱ्याची (चीफ प्रायव्हसी ऑफिसर) नेमणूकही केली. थोडक्यात, विदासुरक्षा आणि गोपनीयता या विषयांना आपण अत्यंत गांभीर्याने घेत आहोत असं दाखविण्याचा कंपनीने निश्चित प्रयत्न केला.

पण तरीही शेवटी हे उशिरा सुचलेलं शहाणपणच ठरले. एक्हार्टने केलेल्या गौप्यस्फोटानंतर जवळपास महिनाभर त्याला धमकावण्यापलीकडे, कॅरियर आयक्यूने एक्हार्टशी तसंच स्मार्टफोनच्या समस्त वापरकर्त्यांशी संवाद साधून त्यांना आश्वस्त करण्याची जराही तसदी घेतली नव्हती. त्यामुळे कंपनीच्या नाममुद्रेची झालेली हानी नंतरच्या स्पष्टीकरणानंतरही भरून निघाली नाही.

२०१२-१३ मध्ये कॅरियर आयक्यूच्या विरोधात अमेरिकेतील विविध न्यायालयांत गोपनीयता-भंगाचे तब्बल १८ खटले भरण्यात आले. कंपनीच्या फोन उत्पादक ग्राहकांनी यापुढे तिचं कोणतंही सॉफ्टवेअर वापरणार नाही असं न्यायालयात शपथपूर्वक सांगितलं आणि कंपनीकडे पूर्णपणे पाठ फिरवली. कॅरियर आयक्यूचा विदा गोळा करण्यामागचा उद्देश कितीही शुद्ध असला तरीही ती वापरकर्त्यांच्या अनभिज्ञतेत व त्यांच्या परवानगीशिवाय गोळा होत असल्यानं कंपनीला यातून सुटकेचा मार्ग सापडणं कठीण होतं. अखेरीस डिसेंबर २०१५ मध्ये अमेरिकेच्या दूरसंचार क्षेत्रातील अग्रगण्य अशा ‘एटीअँडटी’नं कॅरियर आयक्यूला कवडीमोलात विकत घेतलं. पहिल्या सहा वर्षांत कंपनीनं जो नावलौकिक कमावला होता तो पुढल्या केवळ तीन वर्षांत धुळीला मिळवला. वापरकर्त्यांप्रति दर्शवलेल्या असंवेदनशीलतेची कॅरियर आयक्यूला फार मोठी किंमत मोजावी लागली होती.

लेखक माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील ओपन सोर्स, विदासुरक्षा व गोपनीयता तसेच डिजिटल परिवर्तन या विषयांचे अभ्यासक आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विदाव्यवधान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loksatta vidavyavdhan facts about carrier iq software zws

Next Story
हार्लनची कसोटी..
ताज्या बातम्या