पाश्चात्त्यांशी संपर्क आल्यानंतर तेथील अनेक संकल्पना भारतातही रुजू लागल्या. समाजवाद, साम्यवाद, लोकशाही इत्यादी. ‘कल्चर’ ही संकल्पनादेखील अशीच एक. ‘सिव्हिलायझेशन’ (सभ्यता) या जुन्या शब्दापेक्षा अधिक सूक्ष्म अशी. ‘सिव्हिलायझेशन’ म्हणजे जे तुमच्याकडे आहे (व्हॉट यू पझेस) आणि ‘कल्चर’ म्हणजे जे तुम्ही आहात (व्हॉट यू आर), अशी एक सुरेख व्याख्या दोन्ही शब्दांतील फरक स्पष्ट करते.

मुळात ‘कल्चर’ हा शब्द इंग्रजीत जर्मन भाषेतून आला व त्याचा मूळ अर्थ ‘जमिनीची नांगरणी’ हा आहे. इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांनी त्यासाठी ‘संस्कृती’ हा शब्द वापरला होता. त्यापूर्वी कुठल्याही प्राचीन भारतीय साहित्यात ‘संस्कृती’ हा शब्द आढळत नाही. राजवाडे यांनी ‘कल्चर’ शब्दाच्या अर्थातील एक महत्त्वाचा धागा उचलला व त्याला आपल्याकडील संस्कार ही संकल्पना जोडली.

Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
lokrang
गीतांचा भीमसागर…: चळवळीची गाणी…
Why frequent allegations of political infiltration in Sahitya Akademi
विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?
arvind kejriwal
अरविंद केजरीवाल यांच्या जन्मगावातील लोक म्हणतायत…

ज्येष्ठ भाषातज्ज्ञ अशोक केळकर यांच्या आठवणीनुसार राजवाडे यांच्या प्रतिभेमुळे ‘कल्चर’ या शब्दासाठी अधिक अर्थघन असा प्रतिशब्द मराठीला लाभला. त्यावेळी बंगालीत ‘कल्चर’ला प्रतिशब्द म्हणून ‘कृष्टी’ हाच शब्द वापरत. टागोरांना तो तितकासा आवडत नव्हता. त्यामुळे आपले एक मित्र आणि पुण्यातील संस्कृतचे प्राध्यापक परशुराम लक्ष्मण वैद्य यांच्याकडे, ‘‘मराठीत कल्चर या अर्थी कुठला शब्द वापरला जातो?’’ अशी विचारणा त्यांनी केली. वैद्य यांनी कळवले, की मराठीत राजवाडे यांनी ‘संस्कृती’ हा एक सुंदर शब्द त्यासाठी घडवला आहे. टागोरांनीही ‘संस्कृती’ हाच शब्द वापरायला सुरुवात केली. मग आपोआपच इतरही भारतीय भाषांनी ‘कल्चर’साठी ‘संस्कृती’ हा शब्द स्वीकारला.

या साऱ्यातून ध्वनित होणारे एक महत्त्वाचे वास्तव. ‘कल्चर’सारखी एखादी संकल्पना आपल्या भाषेत नेमकेपणे व्यक्त करता यावी याची रवींद्रनाथांसारख्या महान कवीलाही लागलेली आस, त्यासाठी त्यांनी आपल्या एका परभाषक परिचिताला पत्र लिहिणे, त्या परिचिताने दुसऱ्या कोणीतरी रूढ केलेला प्रतिशब्द, त्याला उचित ते श्रेय देऊन, टागोरांना कळवणे, आणि त्यातून सर्वच भारतीय भाषांना एक उत्तम प्रतिशब्द गवसणे, हे सारेच वेधक वाटते. ‘संस्कृती’ शब्दाच्या निर्मितीचा हा प्रवासदेखील ‘संस्कृती’ म्हणजे नेमके काय हेच प्रत्यक्षात दाखवून देतो!– भानू काळे

    bhanukale@gmail.com