सुभाष केदार, हेमांगी जोशी

शिक्षकांना ग्रामीण तसेच दुर्गम भागातील म्हणजेच तिथल्या लहान मुलांची बोलीभाषा बोलता न येणे, न समजणे हा शिक्षण प्रक्रियेतील मोठाच अडथळा आहे. तो लक्षात घेऊन मेळघाटात बोलल्या जाणाऱ्या कोरकू भाषेचा अभ्यासक्रम तयार करून तो शिक्षकांना आणि इतरांना शिकवण्याच्या अनोख्या प्रयोगाविषयी. २१ फेब्रुवारी या आंतरराष्ट्रीय भाषा दिनानिमित्त..

teacher demanded physical relations after seeing student alone in classroom
नागपूर : वर्गात एकट्या विद्यार्थिनीला पाहून शिक्षकाने…
rte marathi news, rte latest marathi news
आरटीई अंतर्गत बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या चौथी, सातवीनंतरच्या शिक्षणाचे काय होणार?
design courses at iit bombay
डिझाईन रंग- अंतरंग : डिझाईन शिक्षण: विद्यार्थी, पालकांमधील सर्जनशीलता वाढवणारा दुवा
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?

आदिवासी क्षेत्रात ‘शालेय शिक्षण’ या विषयात काम करताना मुलांच्या शिक्षणासोबत त्यांची भाषा हासुद्धा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे हे लक्षात घ्यावे लागते. मी कोरकूबहुल मेळघाट भागात काम करताना पाहिले की शिक्षकांना मुलांची भाषा कोरकू समजत नाही आणि मुलांना शिक्षकांची मराठी भाषा समजत नाही. भाषा येत नसेल तर अनेक प्रश्न उभे राहतात. वर्गात शिकवलेले आकलन होत नाही. संभाषण घडून येत नाही. शिक्षक आणि मुलांचे नाते तयार होत नाही. वर्गात योग्य पद्धतीने आंतरक्रिया घडून येण्यास व्यत्यय येतो. शिक्षकही हतबल होतात. शिक्षकांना ही भाषा यायला हवी, त्यांनी शिकून घ्यायला हवी असे आम्ही म्हणत होतो, परंतु, पण त्याच वेळी हेही लक्षात येत होते की कोरकू भाषा ही मराठीपेक्षा इतकी भिन्न आहे की ती केवळ ऐकून, सरावाने समजत नाही, शिकता येत नाही. शिक्षकांना ही भाषा शिकवावी असा हेतू मनात ठेवून आम्ही कोरकू भाषा शिकवण्याच्या कोर्सेसचा शोध घेत होतो, पण मेळघाटात ही भाषा शिकवणारे कोणीच नाही हे आमच्या लक्षात आले. कोणत्याही सरकारी संस्थेनेही कोरकू भाषा शिकवण्याचा अभ्यासक्रम तयार केला नाहीये.

 कोरकू शिकताना..

करोनाच्या पहिल्या लाटेमध्ये, जेव्हा आमच्या हातात निवांत वेळ होता तेव्हा प्रायोगिक तत्त्वावर संस्थेतील कर्मचाऱ्यांसाठी ‘चला कोरकू शिकू या’ हा अभ्यासक्रम आम्ही तयार केला. अर्थात यासाठी आधी आम्हाला कोरकू व मराठी भाषेच्या विविध अंगांचा अभ्यास करावा लागला. आमचा स्वत:चा काही अभ्यास होताच, परंतु आम्ही अन्य संदर्भग्रंथ अभ्यासले. अमरावतीचे डॉ. काशिनाथ बऱ्हाटे आणि अकोल्याचे श्रीकृष्ण काकडे यांनी कोरकू भाषा व संस्कृती यावर संशोधनात्मक पुस्तके तयार केली आहेत. डॉ. गणेश देवी आणि अरुण जाखडे हे संपादकद्वय असलेल्या ‘भारतीय लोकभाषांचे सर्वेक्षण’ या ग्रंथातही कोरकू भाषेचा समावेश आहे, ते लिखाणही आम्ही वाचले. या सर्वाचा मुख्य भर हा कोरकू भाषेची निरीक्षणे आणि वैशिष्टय़े नोंदविण्यावर आहे. भाषा शिकविण्याच्या पद्धतींसाठी आम्ही अन्यत्र शोध घेतला तेव्हा आदिवासी शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने गोंडी भाषेसाठी तयार केलेल्या अभ्यासक्रमाच्या पुस्तिकेचा आम्ही अभ्यास केला. मुंबई विद्यापीठाने तयार केलेल्या मराठी भाषा कोर्सविषयी जाणून घेतले. या सर्वाचा अभ्यास केल्यावर आम्ही आमची अशी एक पद्धत ठरवली ज्याचा मुख्य भर हा व्याकरणआधारित नसून संवादआधारित ठेवला आणि तोच आम्हाला यथावकाश फार उपयुक्त वाटला.

सुरुवातीला संस्थेतील आणि संस्थेशी संबंधित अन्य अशा १५ सहभागींसोबत कोर्स घेतल्यानंतर यातून शिकून आम्ही प्रत्येकी बारा दिवसांच्या दोन टप्प्यांमधील अभ्यासक्रम विकसित केला जो व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग आणि गूगल मीट या माध्यमातून चालवू लागलो. कोरकू भाषेचे बारकावे, भाषेची वैशिष्टय़े आणि सौंदर्य या अभ्यासक्रमात आम्ही आणले आहे. कोरकू गाणी, कोरकूमध्ये भाषांतरित गोष्टी, खूप सारे संवाद, भाषेचे व्याकरण हे घटक त्यात घेतले आहेत. १२ – १२ दिवस रोज ठरावीक वेळेत व्हॉट्सअ‍ॅप समूहावर होणाऱ्या चर्चा, सहभागींना दिला जाणारा गृहपाठ या गोष्टी कोर्सला आनंददायी बनविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरल्या. हा अभ्यासक्रम बाहेरील लोकांसाठी खुला करून दिल्यावर यामध्ये अनेक क्षेत्रांतील लोकांनी सहभाग नोंदविला, जसे शिक्षक, सामाजिक क्षेत्रात काम करणारी मंडळी, प्रशासकीय अधिकारी, विद्यार्थी व आश्रमशाळांचे गृहपाल इत्यादी. आदिवासी भाषा शिकण्याची इच्छा ठेवून शहरी भागांतील मंडळी या अभ्यासक्रमात सहभागी झाल्याने आम्हाला सुखद धक्का बसला आणि आमची उमेद वाढली. 

 प्रतिसाद उत्साहवर्धक

त्यातून आम्हाला हे जाणवलं की केवळ विदेशीच नाही, तर आपल्याच देशातील आदिवासी  भाषा शिकण्यामध्येही रस असलेली मंडळी आहेत. भाषांचे अस्तंगत होत जाणे थांबवण्यासाठी तिला जास्तीत जास्त प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचवण्याचा, त्या भाषेत मौखिक व्यवहार करण्यास प्रोत्साहन देण्याचाही उपयोग होतो हे आमच्या लक्षात आले. या कोर्समुळे अनेकांच्या तोंडात कोरकू गीते बसली. गाण्यातील शब्दांचा भाषा शिकण्यासाठी उपयोग होतो अशा प्रतिक्रिया सहभागींकडून आल्या. प्रत्येक बॅचनंतर आम्ही हा अभ्यासक्रम अद्ययावत करण्याचे काम करत राहिलो. आणि त्यातून आमचंही भाषेविषयी उत्तम शिक्षण होत गेलं. प्रामुख्याने शिक्षकांना हा कोर्स खूप महत्त्वपूर्ण वाटला हे त्यांनी त्यांच्या प्रतिक्रियेतून दाखवून दिलं कारण मुलांसोबत संवाद घडवायचा असेल तर भाषाच मुख्य आहे, अध्ययन अध्यापन प्रक्रिया याने सुलभ होते हे त्यांना माहीत आहे. सहभागींच्या प्रतिक्रिया पाहा. एक शिक्षक म्हणतात, ‘‘मला कोरकूचे काही शब्द माहीत होते, पण आता तर मराठी वाक्याचे थोडेफार कोरकू वाक्य तयार करता येते आणि याचा मला शिकवताना चांगलाच फायदा होणार आहे.’’

‘‘पालक, मुले काय बोलत आहेत हे तरी आता आम्हाला समजेल.’’

‘‘तुला येत कसं नाही असे म्हणत आपण मुलांवर दाब देतो. आता मला कळायला लागले की मराठी शिकताना मुलांना काय होत असेल.’’

‘‘पहिली, दुसरीची मुले वर्गात अबोल राहतात. थोडे जरी कोरकूमध्ये बोललो तरी ती आता खुलू लागली आहेत.’’

आमच्या हे लक्षात आले की २०-३० वर्षे शाळेत मुलांना शिकविणाऱ्या शिक्षकांनाही कोरकू भाषा येत नव्हती, कारण ती संपूर्ण वेगळीच भाषा आहे. आदिवासी विकास विभाग, धारणी (जिल्हा अमरावती) येथील प्रकल्प अधिकारी मिताली सेठी यांनीही या अभ्यासक्रमात रस दाखवून हा कोरकू अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केला. त्यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या विभागातील आश्रमशाळांतील शिक्षकांना या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यास प्रोत्साहन दिले. या अभ्यासक्रमाच्या आम्ही गेल्या दोन वर्षांत सहा बॅचेस केल्या आहेत.

 कोरकूची वैशिष्टय़े

कोरकू भाषेची नमुन्यादाखल काही वैशिष्टय़े नमूद करणे मला येथे गरजेचे वाटते. कोरकू भाषेत एकाच शब्दाला अनेक समानार्थी शब्द वापरले जातात.  उदाहरणार्थ;  ‘खूप’ हा मराठी शब्द असून त्याला कोरकूत अनेक शब्द आहेत. जसे की पक्काटे, घोनेज, खोबो, खोब, आरमांटे, आनसांटे. तसेच, काही शब्द दोन ते तीन वेगवेगळय़ा अर्थानी वापरले जातात. उदाहरणार्थ; ‘जे’ म्हणजे ‘कोण’ तसेच ‘जे’ म्हणजे ‘दे’, मात्र हा अर्थ समोरच्या व्यक्तीला संदर्भाने कळतो. कोरकू भाषेत वचनविचार आहेत. जसे संस्कृतमध्ये तीन वचने आहेत, तशीच कोरकू भाषेतसुद्धा आहेत.

डोबा (बैल)- एकवचन 

डोबाकिंज (दोन बैल)- द्विवचन

डोबाकू (अनेक बैल)- अनेकवचन

कातळय़ा (बालक)-  एकवचन

कातळय़ाकिंज (दोन बालके) – द्विवचन

कातळय़ाकू (अनेक बालके) – अनेकवचन

मात्र कोरकू भाषेत सजीव वस्तूंचेच द्विवचन आणि अनेकवचन करता येते. निर्जीव वस्तूचे द्विवचन आणि अनेकवचन होत नाही हे एक वेगळेच वैशिष्टय़ दिसून येते. उदा. गाडा (नदी) याचे गाडाकिंज आणि गाडाकू होत नाही. इथे दोन किंवा अनेक नद्या म्हणायच्या असतील तर गाडा हाच शब्द येईल. तसेच या भाषेत लिंगभेद नाही, लिंगानुसार सर्वनामाच्या आणि क्रियापदाच्या रूपातही बदल होत नाही, जे मराठी भाषेत घडते. उदा. हा, ही, हे अशी मराठीत लिंगानुसार सर्वनामे आहेत, पण कोरकूत पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकिलग यांना ‘इनी’ हे एकच सर्वनाम आहे.

   मनुष्यबळाची गरज

मेळघाटात आरोग्य विभाग, वन विभाग, कृषी विभाग काम करतो. त्यांनाही ही भाषा शिकून घेण्याची आवश्यकता निर्माण होते. कारण गावात पालकांशी संवाद करायचा असेल तर कोरकू भाषेत संवाद झाला की गावकरी सहभाग दाखवतात. तसेच शासनाला एखादी योजना पोहोचवायची असेल तर भाषेचे ज्ञान असले की प्रभावीरीत्या अंमलबजावणी करता येते. आम्ही हा अभ्यासक्रम सर्वासाठीच उपलब्ध करून देत आहोत. परंतु आमचे प्रशिक्षित मनुष्यबळ कमी आहे. तसेच आम्हाला असेही वाटते की हा कोरकू भाषा अभ्यास वर्ग केवळ आम्ही न चालवता इतर लोकांनीसुद्धा तो शिकून घेऊन इतरांपर्यंत पोहोचवावा. भाषा शिकवणारे  जास्तीत जास्त सुलभक तयार व्हावेत. हे होण्यासाठी विविध संस्थांनी यात पुढाकार घेण्याची गरज आहे.

इतर मौखिक भाषांनाही गरज

आम्हाला असेही वाटते की महाराष्ट्रात तर अनेक भाषा केवळ मौखिक स्वरूपात बोलल्या जातात. कोलमी, गोंडी, निमाडी, पावरी, कुंचीकोरवा, कैकाडी, गोरमाटी, गोसावी अशा अनेक भाषा मराठीपेक्षा बऱ्याच वेगळय़ा आहेत. अहिराणी, कोळी झाडी, ठाकर, कोंकणा या मराठीच्या भगिनीभाषा वाटत असल्या तरी त्या वेगळय़ा बोली आहेत. या भाषा शिकविणारे, लोकांपर्यंत पोहोचविणारे अभ्यासक्रम तयार व्हावेत. या भाषांमध्ये मोठय़ा प्रमाणात साहित्य तयार करण्याला चालना मिळावी. राज्य मराठी विकास संस्था, आदिवासी विकास विभाग यांनी या कामात जरूर पुढाकार घ्यावा असे आम्हाला मनोमन वाटते. आर्थिक साहाय्य करणाऱ्या संस्थांनी आदिवासी भाषा शिकविण्याचा अभ्यासक्रम तयार करण्याला आपल्या कामाच्या आराखडय़ात स्थान द्यावे. तंत्रज्ञानाचा वापर करून अशा विविध भाषा शिकविणारे अभ्यासवर्ग मोठय़ा समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी संस्था, सरकारे यांना तंत्रज्ञांनी मार्गदर्शन आणि साहाय्य करावे. लोकशाही प्रगल्भ आणि मजबूत करण्यासाठी आपल्याकडे असलेल्या विविध संस्कृती, भाषा यांना समाजात मानाचे स्थान मिळण्यासाठी भाषा अभ्यासक्रम, त्या भाषेमधील साहित्यनिर्मिती फार मोलाची भूमिका निभावतात हे आम्हाला समजले आहे. स्वयंसेवी संस्था पथदर्शक काम करू शकतात जे आम्ही केले आहे, करीत आहोत. या विचाराचा सर्वदूर प्रसार करण्याची क्षमता मात्र मोठय़ा संस्थांकडे आणि राज्य सरकारकडे आहे, ते त्यांनी करावे हेच आंतरराष्ट्रीय भाषा दिनानिमित्त आवाहन आहे.

लेखकद्वयी  ‘उन्नती संस्था – सामाजिक आणि शैक्षणिक बदलासाठी’ ता. अकोट, जि. अकोला या संस्थेत कार्यरत आहेत.

 Unnati.isec@gmail.Com