चिनी कम्युनिस्ट पक्षाने दोन ‘शताब्दी लक्ष्ये’ निश्चित केली होती – एक २०२१ पर्यंत चीनला मध्यम स्वरूपाचे समृद्ध राष्ट्र बनवणे आणि दुसरे २०४९पर्यंत चीनला एक संपूर्ण विकसित, श्रीमंत आणि शक्तिशाली राष्ट्र म्हणून घडवणे. पहिले लक्ष्य चीनने साध्य केले आहेच, आता दुसऱ्या उद्दिष्टाला गवसणी घालण्याच्या दृष्टीने चिनी कम्युनिस्ट पक्षाने एक ठराव केला. या ठरावातून अध्यक्ष क्षी जिनपिंग यांचे पक्षातील आणि पक्षाच्या केंद्रीय समितीतील प्रमुख स्थान निश्चित झाले आहे. म्हणून जागतिक वृत्त माध्यमांनी त्याचे वर्णन ‘ऐतिहासिक’ असे केले आहे.

‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या अग्रलेखात, प्रख्यात साहित्यिक जॉर्ज ऑर्वेल यांच्या कांदबरीचा संदर्भ देताना, ‘‘जिनपिंग यांचा मार्क्‍सचा अभ्यास कितीही असो, परंतु ते ऑर्वेल यांच्या लेखणीतून उतरलेल्या १९८४ या निरंकुश दु:स्वप्नाचे प्रतीक असल्यासारखे वाटतात’’, असे भाष्य केले आहे. आता तर जिनपिंग संपूर्ण पक्षाचे आणि पक्षाच्या केंद्रीय समितीचे सर्वेसर्वा बनले आहेत. ठरावातून जिनपिंग यांचे चीनवरील नियंत्रण अधोरेखित झाले आहे. त्यामुळे कम्युनिस्ट राजवटीला कायदेशीर मान्यता देणे आणि सत्तेचे नियंत्रण आपल्याकडेच ठेवणे हेच त्यांचे अंतिम ध्येय आहे, अशी टीकाही या अग्रलेखात करण्यात आली आहे.

हा ठराव महत्त्वाचा का आहे, याचा शोध बीबीसीने तज्ज्ञांच्या हवाल्याने घेतला आहे. चीनच्या राष्ट्रीय प्रवासाच्या महाकथेत जिनपिंग स्वत:ला नायक म्हणून उभे करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी स्वत:ला पक्ष आणि आधुनिक चीनच्या भव्य कथानकाच्या केंद्रस्थानी ठेवून आपले शक्तिप्रदर्शन केले आहे. हा ठराव म्हणजे सत्तेत टिकून राहण्याचे एक साधन (टूल) आहे, असे भाष्य ‘चायना नीकान’चे संपादक अ‍ॅडम नी यांनी ‘बीबीसी’शी बोलताना केले आहे. परंतु चीनचे उच्चभ्रू राजकारण पारदर्शक नाही, त्यामुळे तेथे बरेच काही घडत असावे. पुढे तेथील राजकारणात काहीही घडू शकते, ज्याचा आपल्याला अंदाज बांधता येणार नाही, अशी पुष्टीही त्यांनी जोडली आहे.

‘डॉइच वेल’ या जर्मन वृत्तसंकेतस्थळाने डँग युआन या टोपण नावाने प्रसिद्ध केलेल्या लेखात, जिनपिंग हे आता चीनचे तहहयात सत्ताधीश असतील, अशी टीका केली आहे. जुन्या नियमांनुसार त्यांनी पुढील वर्षी पायउतार होणे अपेक्षित होते, परंतु त्यांनी आता आपला तिसरा कार्यकाळही सुरक्षित करून सत्तेवर पकड मिळवली आहे. त्यांचे हे कृत्य निषेधार्ह आहे. या ठरावाने अशा एका व्यक्तीची शक्ती वाढवली आहे ज्याला पक्षनियमानुसार दोन कार्यकाळांनंतर सरचिटणीस म्हणून पुढल्या वर्षी राजकारणातून निवृत्ती घ्यावी लागली असती, अशी टिप्पणीही या लेखात करण्यात आली आहे.

जिनपिंग यांच्या विचारसरणीने चीनला एक कट्टर प्रतिस्पर्धी बनवले आहे. चिनी कम्युनिस्ट पक्षाने तर आता त्यांचे स्थान अधिक मजबूत केले आहे. त्यामुळे ते आणखी भंयकर प्रतिस्पर्धी बनण्याची शक्यता ‘दि वॉल स्ट्रीट जर्नल’मधील विश्लेषणात केवीन रूड यांनी वर्तवली आहे.

‘साऊथ चायना मॉर्निग पोस्ट’ या चिनी सरकारी वृत्तपत्राने स्वाभाविकपणे एकांगी सूर लावला आहे. या वृत्तपत्राचे स्तंभलेखक वँग क्षिआंगवेई यांनी, क्षी यांचे हे नवे युग आहे, परंतु कम्युनिस्ट पक्षाचा ऐतिहासिक ठराव ही फक्त एक सुरुवात आहे, अशी भलामण केली आहे. जिनपिंग यांना माओ आणि डेंग यांच्या बरोबरीचे स्थान देताना पक्षाने एक दुर्मीळ ठराव करून त्यांचे सर्वोच्च नेते हे स्थान अधिक मजबूत केले आहे. मात्र त्यांच्यासमोर देशांतर्गत आणि बाह्य़ आव्हाने उभी आहेत. त्यांना ती पेलावी लागतील, अशी अपेक्षाही या लेखात व्यक्त केली आहे.

चीन कम्युनिस्ट पक्षाच्या १०० वर्षांच्या इतिहासातील अशा प्रकारचा हा तिसरा ठराव आहे. तो ऐतिहासिक का आहे, याचे विश्लेषण जवळजवळ सर्वच माध्यमांनी केले आहे. यापूर्वी माओ झेडुंग (१९४५) यांनी असा ठराव केला होता. त्या ठरावामुळे माओ यांचे नेतृत्व मजबूत झाले आणि त्यांना १९४९मध्ये पिपल्स रिपब्लिक ऑफ चायना निर्मितीची घोषणा करण्याचे संपूर्ण अधिकार मिळाले. डेंग शाओपिंग यांनीही १९८१मध्ये असा ठराव करून आपली पकड बसवली आणि चीनच्या आर्थिक सुधारणांची पायाभरणी केली होती. आता जिनपिंगही त्यांच्या रांगेत जाऊन बसले आहेत, असे माध्यमांनी म्हटले आहे. 

संकलन : सिद्धार्थ ताराबाई