‘ए भय्या ठीकसे तोलो’ म्हणत भाजी घेणाऱ्या ललिताजी किंवा धबधब्याखालची ‘लिरिल गर्ल’ ही काल्पनिक पात्रे घराघरांत आणि अक्षरश: मनामनांत पोहोचवणाऱ्या जाहिराती करणारे अ‍ॅलेक पदमसी, हे भारतीय इंग्रजी रंगभूमीचेही एक महत्त्वाचे आधारस्तंभ. इंग्रजी नाटकांना भारतीय चेहरा देण्याचे काम त्यांनी केले. या कामाचा गौरव आता पुण्याच्या ‘तन्वीर सन्माना’ने होणार आहे. पदमसी यांना पद्मश्री (२०००), साहित्य अकादमीने गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या जन्मशताब्दीनिमित्त खास दिलेला टागोररत्न पुरस्कार असे मानाचे पुरस्कार यापूर्वी मिळाले, पण तन्वीर सन्मानाचे अगत्य आगळे. पदमसी यांचे अनेक समांतर सहप्रवासी मराठी रंगभूमीवर होते. या रंगभूमीचे अप्रूपही त्यांना वाटे.
‘तुघलक’ हे मराठी, हिंदीत आलेले नाटक पदमसी यांनी इंग्रजीत करू पाहिले होते.. ऐन १९६० च्या दशकात, प्रायोगिक नाटय़ चळवळीचे वारे जोरात असताना अ‍ॅलेक पदमसीदेखील ‘लिंटास’ ही जाहिरात संस्था सांभाळत नाटय़क्षेत्रात कार्यरत झाले. लिंटास ही त्यांनीच नावारूपाला आणलेली संस्था. त्या वेळच्या ग्राहकांना मुखोद्गत असणाऱ्या अशा कित्येक जाहिरात-ओळी (कॅचलाइन्स) लिंटासनेच दिल्या होत्या. चंगळवाद आणि ‘ब्रँड-सजगता’ कमी असलेल्या त्या ४० वर्षांपूर्वीच्या काळात १०० हून ब्रँड ‘लिंटास’ने उभे केले होते आणि या साऱ्यामागे कल्पनाशक्तीपासून सादरीकरणाच्या तपशिलांपर्यंत पदमसींचा मेंदू आणि हात चालत असे. लिंटास वाढू लागल्यावर अनेक तरुणांमधील गुण हेरून त्यांनी या गुणांना मुक्त वाव दिला.. किंवा किमान त्या तरुणांना मुक्तच वाटेल, आपण त्यांना मार्गदर्शन वगैरे करतो आहोत हे कळणारही नाही- अशी काळजी घेतली!
मुक्तपणा, काहीसा बेछूटपणाच कल्पनांसाठी आवश्यक असतो.. विचार मात्र बांधीव असायला हवेत.. एवढं पथ्य पाळायला पदमसी सांगत. त्या वेळी कुणाला हे कळत नसेलच, तर आज पदमसी यांच्या जगण्याकडे पाहून कळावे. ‘जीझस ख्राइस्ट सुपरस्टार’ किंवा ‘एव्हिटा’सारख्या इंग्रजी संगीतिका (म्युझिकल्स), ‘रोशनी’ हे १९८० च्या दशकातच ‘ऑनर किलिंग’सारख्या विषयांना स्पर्श करणारे आणि एका ग्रामीण पंजाबी मुलीच्या फुलण्याची कथा सांगणारे संगीतमय इंग्रजी नाटक.. अशा देशी-विदेशी विषयांमधले नाटय़ त्यांनी मांडले. चमकदारपणा हा प्रेक्षकाला आकर्षून घेणारा गुण आहेच, पण या ‘स्पेक्टॅकल’पेक्षा कथा आणि अभिनय महत्त्वाचा, हे त्यांच्या नाटकांत काम करणाऱ्या अनेकांवर त्यांनी ठसविले. ‘डबल लाइफ’ हे पदमसींच्या आत्मचरित्राचे (इंग्रजी व मराठीही) नाव असले, तरी समाजकार्याचे तिसरे आयुष्य सध्या सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alyque padamsee profile
First published on: 01-12-2015 at 02:02 IST