पत्रकार, राजकारणी, साहित्यिक अशी बहुमुखी प्रतिभा लाभलेल्या व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे ओदिशाचे साहित्यिक व काँग्रेस नेते अन्नदा प्रसाद राय. ओडिशातील बहुतांश सर्वच क्षेत्रांत अमीट छाप पाडलेल्या राय यांचे नुकतेच निधन झाले. राजकीय, साहित्यिक वर्तुळात त्यांचा मोठा लौकिक होता.
राय यांचा जन्म जाजपूर जिल्ह्य़ातील मंगलापूर गावात १९३७ मध्ये झाला. ते राजकीय क्षेत्रातील नेते म्हणून जेवढे लोकांना परिचयाचे होते त्यापेक्षा त्यांची ओळख पत्रकार व साहित्यिक म्हणून अधिक होती. ‘ऐराबाता’, ‘रुद्र समुद्र’, ‘पुनश्च चर्चा’, ‘धम्मा’, ‘पांडुरा स्वाख्यारा’, ‘मैतिरा लुहा’, ‘उपनयसा कथानतारा’, ‘बालाया’, ‘अजाना गचारा माया’, ‘पौशारा प्रार्थना’, ‘राय रा चिछी’, ‘सुनयना’ ही त्यांची पुस्तके विशेष नावाजली गेली. त्यांना साहित्यिक म्हणून नाव मिळाले ते ‘कांता’ व ‘फुलारा सहारा कटका’ या दोन पुस्तकांमुळे. त्यांचे ‘मुथाए जिबना अंगुली स्मृती’ हे आत्मचरित्र हा ओरिया साहित्यातील उत्तम कलाकृतीचा नमुना आहे.
राय यांनी ‘जा देवी’ नावाने त्यांच्या पत्नी भक्तिलता यांचे चरित्र लिहिले आहे. शिर्डीच्या साईबाबांवरही त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यांना ओरिया भाषेतील कामगिरीसाठी अनेक पुरस्कार मिळाले असून त्यात साहित्यरत्न सम्मान, व्यास कबी फकीर मोहन सम्मान, सरला सन्मान व भारत-सोविएत साहित्य पुरस्काराचाही समावेश आहे.
साहित्याशिवाय पत्रकारितेतही त्यांनी तेवढय़ाच जोमाने काम केले. ते ओरिया वृत्त नियतकालिक ‘अग्निवीणा’चे संस्थापक संपादक होते. पूर्वीच्या ‘मातृभूमी’ या वृत्तपत्राचे संपादकपद त्यांनी भूषवले होते, त्यात त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली. उत्कल साहित्य समाज, ओरिया प्रतिवा पूजा संसद, जादी मंगला साहित्य संसद या संस्थांचे ते माजी अध्यक्ष होते. राजकारणातही त्यांनी अविभक्त कटक जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष म्हणून काम करताना सामाजिक व राजकीय जाणिवांचे भान ठेवले. ओदिशा प्रदेश काँग्रेसचे ते सरचिटणीसही होते.
राजकारणात त्यांनी बराच काळ काम केले असले, तरी ते साहित्यिक म्हणून लोकांच्या जास्त लक्षात राहतील यात शंका नाही. त्यांचा महाराष्ट्राशी संबंध म्हणजे त्यांची एक नात पुण्यात; तर एक बनारसला असते. ओदिशात साहित्याचा प्रसार व्हावा यासाठी त्यांनी उत्कल तरुण साहित्य परिषदेची स्थापना केली होती. अनेक तरुण साहित्यिक सातत्याने त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी येत. राय यांनी साहित्य व राजकारण यांची गल्लत केली नाही. त्यांच्या साहित्याला अध्यात्माची डूब मात्र होती. राजकीय नेत्यांमध्ये हवी ती संवेदनशीलता असतेच असे नाही, पण साहित्यिक असल्याने त्यांच्या ठायी ती होती. त्यामुळे लोकांचे प्रश्न समजून घेण्यात ते यशस्वी ठरले.