डॉ. तेजिंदर पाल सिंग

शेतकऱ्यांना पैसा मिळवून देणाऱ्या या पिकाबाबत जगातील काही मोजक्या संशोधकांनी काम केले आहे.

भारतात विशेषकरून महाराष्ट्र व इतर काही राज्यांत कापूस हे शेतकऱ्यांना हमखास उत्पन्न मिळवून देणारे पीक आहे. बीटी कॉटनवरून वाद झाले असले तरी त्यानंतर कापसाचे उत्पादन काही प्रमाणात वाढल्याचे दिसून आले होते. शेतकऱ्यांना पैसा मिळवून देणाऱ्या या पिकाबाबत जगातील काही मोजक्या संशोधकांनी काम केले आहे. त्यातील एक म्हणजे डॉ. तेजिंदर पाल सिंग. त्यांच्या नेतृत्वाखाली पंजाब कृषी विद्यापीठात पदव्युत्तर पातळीवर कापसावरील संशोधन गेली तीन दशके चालू होते. डॉ. सिंग यांचे नुकतेच निधन झाल्याने कापूस संशोधन क्षेत्राला पर्यायाने कृषी क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. डॉ. सिंग यांनी डॉ. एल. एस नेगी, एस. एन. सिक्का व ए. बी. जोशी यांच्यासमवेत भारतीय कृषी संशोधन संस्थेत कापसावर काम केले होते. त्यात त्यांना अमेरिकेचे डॉ. एस.जी स्टीफन्स यांचेही सहकार्य होते. पंजाब विद्यापीठातील कापूस संशोधन विभागात डॉ. सिंग हे प्रमुख होते. त्यांनी भारताच्या एकात्मिक कापूस उत्पादन प्रकल्पात मोलाची भूमिका पार पाडली होती. वनस्पतींचे अंकुरण या विभागात काम करताना त्यांनी कापसाचे उत्पादन नेमके कसे होते, त्यातील टप्पे समजून घेतले होते. त्यानंतर डॉ. सिंग व त्यांच्या चमूने कमी काळात जास्त उत्पादन देणाऱ्या कापसाच्या प्रजातीही शोधून काढल्या होत्या. कापूस संशोधन नकाशात त्यामुळेच पंजाबला महत्त्वाचे स्थान मिळाले होते. देशातील कापूस उत्पादकात व वैज्ञानिकात त्यांचे नाव आदराने घेतले जात असे. त्यांना एकूण नऊ पुरस्कार मिळाले होते त्यात डॉ. जी. एस. खुश पुरस्काराचा समावेश होता. पंजाबच्या राज्यपालांनी त्यांचा सन्मान ‘लीडर ऑफ सव्‍‌र्हे टीम’ म्हणून १९८४ मध्ये केला होता. पंजाब कृषी विद्यापीठाच्या व्यवस्थापकीय मंडळाने त्यांच्या नेतृत्वाखालील चमूचा सन्मान केला होता कारण त्यांनी त्या वेळी एलएच ९०० ही कापसाची नवी प्रजाती शोधून काढली होती. डॉ. सिंग यांनी वेगवेगळय़ा राज्यातील कापूस उत्पादक संघटनांना मोलाचे सल्ले दिले. तेजिंदर यांनी तयार केलेल्या एलएच ९०० या कापसाच्या प्रजातीची लागवड भटिंडा जिल्ह्यात माजी आयएएस अधिकारी अमरजित सिंग संधू यांनी केली होती. तेथे या कापसाच्या चाचण्या पहिल्यांदा झाल्या होत्या. तेजिंदर यांचा जन्म २८ जून १९३५ रोजी लुधियानातील भैनी दारेसा खेडय़ात झाला. नंतर त्यांनी शालेय व महाविद्यालयीन शिक्षणानंतर पंजाब कृषी विद्यापीठात १९६९ पासून काम सुरू केले होते. त्या वेळी ते सहायक कापूस संशोधक होते. विशेष म्हणजे पंजाब कृषी विद्यापीठात काम करताना ते वनस्पती संशोधन विभागाचे अधिष्ठाता होते. त्यांना नागपूर येथील कापूस संशोधन व विकास संस्थेने पुरस्कार देऊन गौरवले होते. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Eminent cotton scientist dr tejinder harpal singh profile

Next Story
अनलजित सिंग
ताज्या बातम्या