ब्रिजमोहनलाल मुंजाल यांनी उद्योगजगतातील एक कुटुंब शेवटपर्यंत एकत्र ठेवलेच; शिवाय ग्राहक, गुंतवणूकदार, भागीदार यांचेही कुटुंब हिरो या दुचाकी कंपनीभोवती भक्कमपणे उभे केले. त्यामुळेच ते उद्योगविश्वात यशस्वी ठरले. होंडापासून वेगळ्या झालेल्या हिरो कंपनी समूहाचे ते संस्थापक होते. कामगारांमध्ये ‘लालजी’, पुरवठादारांमध्ये ‘हमारा हिरो’ व जपानी भागीदार व मित्रांमध्ये ‘बीएम’ या नावाने ते परिचित होते. त्यांच्या निधनाने देशातील एक अग्रेसक उद्योगपती काळाच्या पडद्याआड गेला आहे.
त्यांचा जन्म पंजाबमध्ये (आताच्या पाकिस्तानातील) कमलिया येथे १ जुलै १९२३ मध्ये झाला. वडील बहादूरचंद किराणा दुकान चालवीत असत. उद्यमशीलतेचा तोच वारसा ब्रिजमोहन यांनी घेतला. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी घर सोडले. सायकलींचे सुटे भाग तयार करण्याचे त्यांनी ठरवले होते. जर्मनी हे त्यांचे त्या काळात दुसरे घरच होते. जगभरात ते फिरले होते व तेथील बाजारपेठा, तंत्रज्ञानाचा अभ्यास केला होता. १९४४ मध्ये ते अमृतसरला आले व नंतर लुधियाना गाठले. पंजाब सरकारने त्यांना सायकली तयार करण्याचा परवाना दिला. १९७५ मध्ये हिरो सायकल हे नाव सर्वतोमुखी झाले. १९८६ मध्ये सर्वाधिक सायकली तयार करणारी कंपनी म्हणून हिरो सायकलची गिनीज बुकात नोंद झाली.
ब्रिजमोहन हे त्यांचे अनेक पुरवठादार, वितरक वा त्यांच्या मुलांना नावाने ओळखत असत. या आपुलकीनेच त्यांचा हिरो समूह शक्तिशाली झाला. नंतर त्यांनी भारत-जपान सहकार्याने १९८० मध्ये हिरो होंडा मोटर्स लि. कंपनी स्थापन केली, ती कमालीची यशस्वी झाली. १९८४ मध्ये होंडा मोटर कंपनीशी त्यांनी मोटरसायकल निर्मितीत सहकार्य केले. होंडाचे तंत्रज्ञान व हिरो कंपनीचा बाजारपेठ-ग्राहक वर्तनाचा अभ्यास यांचा सुरेख मिलाफ या संयुक्त कंपनीत होता. लोकांना परवडणाऱ्या दरात चांगली वाहने देण्याचा त्यांचा सतत प्रयत्न राहिला. २०११ मध्ये हिरो व होंडा या कंपन्या २७ वर्षांच्या साहचर्यानंतर वेगळ्या झाल्या, तरी देशी मोटरसायकल बाजारपेठेत अजूनही हिरोचा वाटा ५० टक्के आहे.
होंडाच्या तंत्रज्ञान उत्कृष्टतेच्या सावलीचे आव्हान अद्याप या कंपनीपुढे आहे. ‘‘मी जे काही शिकलो ते आजोबांकडून शिकलो. त्यांनी जे आयुष्य पाहिले त्याची आपण कल्पना करू शकत नाही,’’ असे त्यांचे नातू राहुल मुंजाल म्हणतात; यावरून ब्रिजमोहन यांचे उद्योगक्षेत्रातील मोठेपण लक्षात येते.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Nov 2015 रोजी प्रकाशित
ब्रिजमोहनलाल मुंजाल
ब्रिजमोहन हे त्यांचे अनेक पुरवठादार, वितरक वा त्यांच्या मुलांना नावाने ओळखत असत
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद

First published on: 03-11-2015 at 01:27 IST
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hero motocorp founder brijmohan lall munjal dies