क्रिकेटवेडय़ा भारतात फुटबॉलवेडय़ांचे अस्तित्व अनेक वर्षे केवळ पश्चिम बंगाल, केरळ आणि गोवा या राज्यांमध्येच प्रामुख्याने दिसे. या तिन्ही राज्यांसाठी, ब्राझील संघाचा विजय म्हणजे उत्सवच. पण विश्वचषक स्पर्धेत एक जगज्जेतेपद कमी असूनही ब्राझीलपेक्षा सातत्याने कामगिरी जर्मनीने करून दाखवली आहे, असे या मंडळींचे प्रबोधन करण्याचे काम केले नोव्ही कपाडियांनी. मज्जासंस्थेच्या दीर्घ विकारातून त्यांचे ६८व्या वर्षी नुकतेच निधन झाले. दिल्ली विद्यापीठातील एका महाविद्यालयात इंग्रजी विषयाची प्राध्यापैकी करतानाच, जागतिक व भारतीय फुटबॉलविषयी संशोधन, समालोचन, प्रबोधन करण्याचे काम नोव्ही कपाडिया गात्रे थकेपर्यंत करत राहिले. डुरँड चषक, सुब्रोतो चषक या अस्सल भारतीय फुटबॉल स्पर्धाचे समालोचन नोव्ही तल्लीनतेने करायचे. ईस्ट बंगाल व मोहन बागान यांच्यातील दुश्मनीच्या सुरस कथा तपशिलासह मांडल्या जात. मग कधी युरोपियन चॅम्पियन्स लीगच्या हिंदी समालोचनावेळी मँचेस्टर युनायटेड-लिव्हरपूल, रेआल माद्रिद-बार्सिलोना, बायर्न म्युनिच-बोरुसिया डॉर्टमुंड, एसी मिलान-इंटर मिलान यांच्यातील पारंपरिक तीव्र स्पर्धेचे विषयही तितक्याच मुद्देसूदपणे समजावून सांगितले जात. नोव्ही कपाडिया म्हणजे फुटबॉलचा चालताबोलता माहितीकोशच जणू. लहानपणी आजीच्या अंत्यसंस्कारादरम्यान सर्वाची नजर चुकवून नोव्हींनी थेट फुटबॉल मैदान गाठले. कारण तेथे डुरँड चषक स्पर्धेतील एक सामना सुरू होता, जो नोव्हींना चुकवायचा नव्हता! घरी परतल्यानंतर उपस्थितांसमोर त्यांनी सामन्याचे इत्थंभूत वर्णन मांडले. नोव्हींच्या मते, फुटबॉल विश्लेषक आणि संवादकाला प्रथम खेळाविषयी प्रेम असावे लागते. दिल्लीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम म्हणजे त्यांचे जणू दुसरे घरच. निव्वळ एखादा खेळ आवडणारे लाखभर असतात. पण त्या खेळावर निस्सीम प्रेम करताना, त्यातील इतिहास व डावपेचांचे कंगोरे उलगडून दाखवणारे नोव्हींसारखे थोडेच असतात. जागतिकीकरणानंतर भारतात परदेशी क्रीडावाहिन्या दिसू लागल्या. इंग्लिश, स्पॅनिश तसेच युरोपियन क्लब फुटबॉलने येथील युवा पिढीला भुरळ पाडली. भारतीय फुटबॉल यांच्या नजरेतून ‘मागास’, ‘डाऊनमार्केट’ वगैरे ठरू लागले. नोव्ही यांनी मात्र भारतीय फुटबॉलला कधी अंतर दिले नाही. पण त्यांच्या अपेक्षेइतकी उभारी देशी फुटबॉलने कधी  घेतली नाही. फुटबॉलप्रेमींचा हा देश आजतागायत फुटबॉलपटूंचा देश बनू शकलेला नाही. याची मीमांसा नोव्ही सातत्याने करत. पण ते कधीही हताश, व्यथित झाले नाहीत. विश्वचषक स्पर्धासाठी त्यांच्या दारी अनेक वृत्त/क्रीडावाहिन्या रांग लावून उभ्या असत. कारण आंतरराष्ट्रीय फुटबॉलचे अत्यंत सखोल, तपशीलवार विवेचन करू शकत्णारे देशी विश्लेषक मोजकेच. नोव्ही अंथरुणाला खिळल्यानंतर मात्र यांच्यातील किती त्यांच्या घरी फिरकले, या प्रश्नाचे उत्तर कटूच मिळते. मात्र असा कडवटपणा नोव्हींना अखेपर्यंत शिवला नाही.