जस्टिन त्रुडो

‘घराणेशाही’ या शब्दाला नकारात्मक अर्थच अधिक आहे, हे आपल्याला माहीत आहेच.

जस्टिन त्रुडो

‘घराणेशाही’ या शब्दाला नकारात्मक अर्थच अधिक आहे, हे आपल्याला माहीत आहेच. पण एखाद्या घराण्यातील पुढली पिढी आपल्या कर्तृत्वाने सन्माननीय ठरते, तेव्हा या नकारात्मकतेला अपवाद सिद्ध होतो. कॅनडात आता जस्टिन त्रुडो या तरुण पंतप्रधानांच्या निवडीनंतर कुणाला ‘घराणेशाही’ आठवेल, कारण त्रुडो कॅनडाचे दिवंगत माजी पंतप्रधान पिएर त्रुडो यांचे पुत्र आहेत. पियर यांचा देशात मोठा करिश्मा होता. त्यावरच स्वार होऊन आता ४३ वर्षांचे जस्टिन हे पंतप्रधान झाले आहेत.

हे खरे असले तरी ‘मावळते’ पंतप्रधान स्टीफन हार्पर यांच्या राजवटीस कंटाळलेल्या देशाला नवी दिशा देण्याचे आश्वासन जस्टिन यांनी दिले आणि देशानेही त्यावर विश्वास ठेवला. कॅनडाच्या इतिहासातील ते दुसरे तरुण पंतप्रधान आहेत. आताच्या निवडणुकीत जस्टिन यांनी विद्यमान पंतप्रधान स्टीफन हार्पर यांच्या नऊ वर्षांतील अप्रिय राजवटीची अखेर केली आहे. वडिलांचे पद गेल्यानंतर, एके काळी शाळेत मास्तरकीही करणारे जस्टिन हे २००८ पासून खासदार आहेत. ‘सकारात्मक व दूरदृष्टीच्याराजकारणाचा हा विजय आहे. खऱ्या बदलाची गरज आहे असाच संदेश लोकांनी या निवडणुकीत दिला,’ असे त्यांचे म्हणणे आहे.

त्रुडो यांच्या लिबरल पक्षाने मतदानात जी आघाडी घेतली होती, ती कायम टिकवली. हार्पर यांनी त्रुडो यांच्या आर्थिक धोरणांवर केलेली टीकाही त्यांच्या अंगाशी आली. लिबरल पक्षाला ३३८ जागांचे बहुमत मिळाले आहे. जस्टिन त्रुडो यांचे वडील पिएर त्रुडो हे कॅनडात १९८४ पर्यंत पंतप्रधान होते. त्यांचा करिश्मा मोठा होता. त्यामुळे अमेरिकेत ते ओळखले जात होतेच, शिवाय त्यांची तुलना जॉन एफ केनेडी यांच्याशी केली जात असे. त्यांनी १९६८ मध्ये सत्ता मिळवली तेव्हा त्या लाटेचा उल्लेख ‘त्रुडोमॅनिया’ असा करण्यात आला होता. आता पंतप्रधान होत असलेले जस्टिन त्रुडो यांनी लिबरल पक्षाचा चार वर्षांपूर्वी पराभव होऊनही त्यात चैतन्य आणले. श्रीमंतांवर करवाढ, तीन वर्षांत आर्थिक तूट भरून काढण्याच्या आणाभाका यामुळे त्यांना सत्ता मिळाली आहे. त्यांच्या वडिलांनी १६ वर्षे एकहाती राज्य केले. त्रुडो यांच्या काळात कॅनडाचे अमेरिकेशी संबंध सुधारण्याची चिन्हे आहेत. सत्तापालटाची लोकेच्छा पूर्ण झाली हे खरे, पण कॅनडाची वाटचाल खरोखर लोकांच्या अपेक्षेप्रमाणे होते की नाही व वडिलांप्रमाणेच जस्टिनही दमदार खेळी करतात का, याकडे जगाचे लक्ष आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Justin trudeau profile

ताज्या बातम्या