‘ऑस्कर सो व्हाइट’ ही चळवळ पाचेक वर्षांपूर्वी सुरू होण्याच्या आणि ‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ ही चळवळ गतदशकात सुरू होऊन तिचा परमावधी दोन वर्षांपूर्वी गाठला जाण्याच्या कित्येक दशके आधीपासून सिडनी प्वाटिए हा नट हॉलीवूडमध्ये मुख्य प्रवाहात झळकत होता. पहिला आफ्रिकन-अमेरिकन ऑस्कर विजेता अभिनेता ही त्यांची सुपरिचित ओळख. १९५०-६०च्या दशकांमध्ये अमेरिकेच्या कित्येक राज्यांत ‘सेग्रगेशन’ म्हणजे वर्णाधारित विलगीकरणाचे अधिकृत धोरण अमलात होते. निवासी संकुले, शाळा, आरोग्य केंद्रे, सार्वजनिक वाहतूक  या ठिकाणी गौरेतर, प्रामुख्याने आफ्रिकन-अमेरिकन कृष्णवर्णीय, यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असायची. या भेदाभेदाविरोधात १९५४ ते १९६८ या काळात कृष्णवर्णीयांच्या अनेक चळवळी झाल्या. या काळात सिडनी प्वाटिए एक सक्षम अभिनेता म्हणून हॉलीवूडमध्ये स्थिरावले. मार्टिन ल्युथर किंग, माल्कम एक्स यांच्याप्रमाणे चळवळीत न उतरताही प्वाटिए यांनी आफ्रिकन-अमेरिकन अभिनेत्यांविषयीचे पूर्वग्रह खोडून काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सिडनी प्वाटिए यांचे आई-वडील पूर्वाश्रमीची ब्रिटिश वसाहत असलेल्या बहामातील, पण सिडनी यांचा जन्म अमेरिकेत मायामीत झाल्यामुळे अमेरिकेतच कारकीर्द घडवण्याची संधी त्यांना मिळाली. १६व्या वर्षी ते बहामा सोडून न्यूयॉर्कमध्ये आले आणि फुटकळ कामे करत, अभिनयाची आवड म्हणून ‘अमेरिकन निग्रो थिएटर’मध्ये दाखल झाले. तेथे त्यांना काही चांगल्या भूमिका करण्याची संधी मिळाली. ब्रॉडवेवर त्यांच्या कामाची दखल घेतली गेली आणि १९५०मध्ये त्यांना पहिला चित्रपट मिळाला. ‘द डिफायंट वन’ या चित्रपटातील भूमिकेसाठी १९५८मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी नामांकन मिळाले. १९६३मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लिलीज इन द फील्ड’मधील भूमिकेसाठी प्वाटिए यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे ऑस्कर मिळाले. ऑस्कर नामांकन (१९५८) आणि ऑस्कर पारितोषिक (१९६३) मिळालेले ते पहिलेच आफ्रिकन-अमेरिकन अभिनेते. पहिल्यावहिल्या ऑस्करविषयी ते फार समाधानी नव्हते. कारण आफ्रिकन-अमेरिकनांच्या आंदोलनकाळात आपण समन्यायी आहोत हे ‘दाखवण्या’साठीच अ‍ॅकॅडमीने आपली निवड केली, अशी त्यांची भावना होती. हरकामे, नोकर-चाकर, बूट-पॉलिश करणारे अशा आफ्रिकन-अमेरिकनांसाठीच लिहिल्या जाणाऱ्या, साच्यातील भूमिका त्यांनी कटाक्षाने टाळल्या. १९६७ मध्ये आलेले ‘इन द हीट ऑफ नाइट’, ‘टू सर, विथ लव्ह’ आणि ‘गेस हूज किमग टू डिनर’ हे तिन्ही चित्रपट तिकीटबारीवर गाजल. समीक्षकांनीही गौरवले. त्यांच्या बहुतेक सर्व गाजलेल्या चित्रपटांत आफ्रिकन-अमेरिकनांच्या संघर्षांचा काही तरी संदर्भ असायचाच. पण स्वत:ला त्यांनी नेहमीच आक्रमक, प्रचारकी चौकटीबाहेरच ठेवले. कमी शब्द, डोळय़ांतील जरबयुक्त भेदकता, कमीत कमी अभिनिवेश ही त्यांच्या अभिनयाची वैशिष्टय़े. ‘सेग्रगेशन’ चळवळींनंतर अर्धशतकानंतरही ‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ घडतेच आहे. प्वाटिए यांच्यानंतर तिघाच आफ्रिकन-अमेरिकन अभिनेत्यांना ऑस्कर मिळाले. पण चळवळीची जी संयत प्रतिकारशक्ती मार्टिन ल्युथर किंग यांच्यासारख्यांनी प्राप्त केली, तिला प्वाटिए यांच्या अभिनयाने बळच दिले.