घडीव शिसवी लाकडी मेजावर गडद हिरव्या कॅनव्हासवर रंगीबेरंगी चेंडू आणि लांबसडक काठीच्या साह्य़ाने स्नूकर आणि बिलियर्ड्सचा पट रंगतो. सुखवस्तू आणि लब्धप्रतिष्ठित वातावरणाशी संलग्न असल्याने साहजिकच युरोपियन समूहाचे या खेळांवर सदोदित वर्चस्व राहिले आहे. या मक्तेदारीला आव्हान देत नव्या परंपरेची रुजुवात करण्याचे श्रेय पंकज अडवाणीला जाते. नुकतीच पंकजने चौदाव्या विश्वविजेतेपदाला गवसणी घातली.
वरकरणी एकसारख्या भासणाऱ्या स्नूकर आणि बिलियर्ड्समध्ये तांत्रिक फरक आहे. या दोन खेळांच्या शिखर संस्था आणि स्पर्धा स्वतंत्र आहेत. यामुळेच बहुतांशी आंतरराष्ट्रीय खेळाडू दोघांपैकी एकाची निवड करून वाटचाल करतात. पंकज स्नूकर आणि बिलियर्ड्स दोन्ही खेळतो. दोन्ही खेळांच्या कौशल्यावर अद्भुत प्रभुत्व गाजवत पंकज थेट विश्वविजेतेपदावरच कब्जा करतो. वयाच्या तिशीतच दोन्ही खेळांच्या मिळून तब्बल १४ विश्वविजेतेपदांवर पंकजने आपल्या नावाची मोहर उमटवली आहे.
पुण्यात जन्मलेला, बालपण कुवेतमध्ये आणि जडणघडण बंगळुरूत अशी त्रिस्थळी यात्रा केलेल्या पंकजने दहाव्या वर्षी खेळायला सुरुवात केली. भारतीय स्नूकर-बिलियर्ड्स विश्वाचा चेहरा अशी ओळख बनलेल्या पंकजरूपी हिऱ्याला पैलू पाडण्याचे श्रेय जाते ते माजी स्नूकरपटू अरविंद सॅव्यूर तसेच क्रीडा मानसशास्त्रज्ञ आणि पंकजचा मोठा भाऊ श्री अडवाणी यांना. खेळाशी ओळख झाल्यानंतर दोन वर्षांच्या आतच पंकजने अव्वल दर्जाच्या जेतेपदाची कमाई केली. विक्रम आणि जेतेपदे यांच्यासाठी पंकज समानार्थी शब्द झाला. बिलियर्ड्स प्रकारात वेळ आणि गुण अशा दोन उपप्रकारांची जेतेपदे एकाच वेळी पटकावणारा तो पहिला बिलियर्ड्सपटू आहे. एकाच हंगामात राष्ट्रीय कनिष्ठ आणि वरिष्ठ गट जेतेपद, आशियाई आणि दोन्ही प्रकारातले जागतिक अजिंक्यपद पोतडीत टाकणारा पंकज एकमेव आहे.
अत्यंत प्रतिष्ठेच्या जागतिक रेड सिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या जेतेपदावरही त्याने कब्जा केला. दोन्ही खेळांचे भरगच्च आंतरराष्ट्रीय वेळापत्रक आणि अव्वल खेळाडूंना टक्कर देत किमान खेळणेही कठीण असताना पंकजने जेतेपदांमध्ये अपवादात्मक सातत्य राखले आहे. खेलरत्न पुरस्काराने सन्मानित पंकजच्या वाटचालीने देशभरात या दोन खेळांच्या प्रसाराला चालना मिळाली. अन्य खेळांच्या भाऊगर्दीत हरवलेल्या या खेळांची आस धरून, नकारात्मकतेला छेद देत पंकजने आगळा मापदंड प्रस्थापित केला आहे.

33