‘हं शायरसाहेब, अभिनंदन करा बरं आमच्या शौकतचं.. लग्न होणारे तिचं.. तसा दूरच्या नात्यातलाच आहे मुलगा..’ सन १९४७ मधल्या कुठल्याशा दिवशी, मोठय़ा बहिणीचे हे बोल ऐकल्यावर शौकतला लागलेला ठसका, त्यातून सावरत नजर ज्यांच्याशी भिडवली त्या कैफी आझमींच्या नजरेत शौकतला दिसलेला विश्वास.. इथे आयुष्य बदलले! नुकतेच निधन झालेल्या अभिनेत्री शौकत आजमी यांचे जन्मसाल १९२८ असले, तरी त्यांचा खरा ‘जन्म’ झाला तो लग्नानंतर.. मुंबईत!
हैदराबादेस मुशायऱ्यानिमित्त आलेले कैफी आणि बहिणीकडे आलेली शौकत यांची मने जुळल्यानंतर, शौकत काही दिवसांतच कैफींसोबत मुंबईत आल्या. प्रागतिक, ‘तरक्कीपसंद’ असणे हा या दोघांचा स्वभावधर्म. कैफींच्या संसारात आणि इस्मत चुगताई, मजरूह सुल्तानपुरी, साहिर लुधियानवी अशा मैत्रमंडळातही रमल्या. यंदा शतक महोत्सव साजरा करणारी ‘इप्टा’ (इंडियन पीपल्स थिएटर) ही तेव्हाही मुंबईतील महत्त्वाची प्रयोगशील नाटय़संस्था होती. आकाशवाणीच्या श्रुतिकांमध्ये ज्यामुळे संधी मिळाली तो धारदार आवाज, त्याहूनही धारदार डोळे आणि सहज वावर ही शौकत यांची वैशिष्टय़े शौकत यांना ‘इप्टा’च्या नाटकांपर्यंत घेऊन गेली. कैफींनी पटकथा लिहिलेला ‘गर्म हवा’ हा शौकत यांचा पहिला चित्रपट ठरला. या चित्रपटास राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. मात्र शौकत लक्षात राहिल्या, त्या ‘बाजार’ आणि ‘उमराव जान’ या चित्रपटांतील त्यांच्या भूमिकांमुळे. ‘बाजार’मध्ये स्थानिक मुली लग्नाच्या नावाखाली अरबांना विकणारी हैदराबादी महिला त्यांनी वठवली; तर ‘उमराव जान’मध्ये तवायफ-कोठय़ाची मालकीण. या दोन्ही भूमिका तशा खलप्रवृत्तीच्या, पण त्यांना मानवीपणा दिला शौकत यांनीच. ‘तू भूमिका करतेस तेव्हा शौकत आझमी नसतेस..’ अशी दाद देणाऱ्या मीरा नायर यांनी कोठेवाल्या ‘मॅडम’चे आजकालचे रूप साकारण्याची गळ शौकतना घातली. चित्रपट होता ‘सलाम बॉम्बे’. आणखीही काही चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या, पण ‘साथिया’ हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला. कैफी आझमी २००२ मध्ये निवर्तल्यानंतर, २००४ सालात ‘याद की रहगुजर’ हे त्यांच्या सहप्रवासाच्या आठवणींचे पुस्तक प्रकाशित झाले. त्याचे इंग्रजी भाषांतर ‘कैफी अँड आय’ (२०१०) या नावाने झाले. हिंदी रंगमंचावर ‘कैफी और मै’ हा त्याचा नाटय़ाविष्कारही जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांनी सादर केला. ‘लग्न होणारे तिचं..’ हे कैफींनी ऐकल्यानंतरच्या प्रसंगासह अनेक प्रसंग त्यात आवाजातून जिवंत झाले.. आणि शबाना यांना, ‘शौकत आझमींची मुलगी’ ही मूळची ओळख परत मिळाली!