गोव्यात २०१६ पासून भरणारा ‘सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल’ आणि फ्रान्सच्या आर्ल्स शहरात १९७० पासून भरणारा छाया महोत्सव यांची सांगड घातली ती ‘इन्स्टिटय़ूट फ्रान्स्वां’ या आंतरराष्ट्रीय संस्थेने. डिसेंबर २०२० मधील ‘सेरेन्डिपिटी’तून दक्षिण आशियाई देशांमधले १० छायाचित्रकार निवडायचे, पुढे त्यापैकी एकाची अंतिम निवड करून तिला/त्याला ‘आर्ल्स’मध्ये प्रदर्शनाची संधी आणि निवासासाठी १२ लाख रुपयांची विद्यावृत्ती (ग्रँट) द्यायची, असा तो उपक्रम करोनामुळे रखडला.. अखेर अलीकडेच निवड जाहीर झाली, ती कांचीपुरम येथील छायाचित्रकार पुरुषोत्तमन् सतीशकुमार यांची!

सतीश ३४ वर्षांचे आहेत. वयाच्या विशीपर्यंत चेन्नईच्या कला महाविद्यालयात शिकल्यानंतर कांचीपुरमला परतले आणि या वाढत्या शहराच्या वेशीवरील अर्धनागरी- अर्धग्रामीण परिसरात राहून भोवतालचे जन आणि जीवन टिपू लागले. या १४ वर्षांच्या काळात डिजिटल कॅमेराही त्यांच्याकडे आला, पण बहुतेकदा फिल्मचा वापर करून जुन्या पद्धतीच्या कॅमेऱ्यानेच त्यांनी छायाचित्रे टिपली. या छायाचित्रांतून माणसांची- आणि निसर्गाचीही- जिवंत राहण्याची धडपड दिसते, ग्रामीण चेहऱ्यांचा सच्चेपणा आणि त्या जगण्यात शिरलेल्या शहरी छटाही दिसतात. वडिलांच्या आजारपणात सतीश यांनी, २०१४ ते २०१६ या काळात आजारी वडिलांची अनेक छायाचित्रे टिपली. मृत्यूकडे होणारा प्रवास त्यातून दिसलाच, पण पिढय़ांमधला संवादसुद्धा प्रत्येक फोटोतील वडिलांच्या डोळ्यांमधून प्रकटला. ज्याकडे आपले दुर्लक्षच होत असते, अशा वास्तवातही सौंदर्य असते का, या प्रश्नाचा मागोवा सतीश यांनी कॅमेऱ्यातून घेतला.

अर्थातच, असाच प्रश्न आपापल्या परीने सोडवण्याचे काम अनेक छायाचित्रकारांनी आजवर केले आणि आजही करीत आहेतच. महाराष्ट्रात कणकवली येथील छायाचित्रकार इंद्रजित खांबे हे माणसांच्या सहजीवनाची आणि निसर्ग व प्राण्यांच्या सहजीवनाची छायाचित्रे काढण्यासाठी प्रसिद्धही आहेत. मात्र सतीश यांना संधी मिळाली, ती ‘सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल’च्या आवाहनानुसार अर्ज वगैरे भरून ते स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात सहभागी झाले, म्हणून. या पहिल्या टप्प्यात सात दक्षिण आशियाई देशांतील दहा छायाचित्रकारांना, प्रत्येकी ७० हजार रुपयांची विद्यावृत्ती देण्यात आली होती. त्या दहांतून निवड झाल्यानंतर आता सतीश यांना फ्रान्समध्ये काही काळ राहून, आर्ल्स येथील ‘राँकोत्र दि फोतोग्राफी’ महोत्सवात (२०२२ मध्ये) सहभागी होता येईल. या महोत्सवाने गेल्या ४० वर्षांत जागतिक प्रतिष्ठा प्राप्त केलेली आहे.