scorecardresearch

रेने गिरार्ड

‘द इकॉनॉमिस्ट’सह सर्वच गंभीर वृत्तपत्रांनी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी लेख लिहिले आहेत.

रेने गिरार्ड
‘जमाव कधीच निरपराध नसतो. सामूहिक हिंसाचार हा खोटारडेपणाच्या आड दडलेला असतो’, हे विधान फ्रेंच विचारवंत आणि मानव्यसंशोधक रेने गिरार्ड यांनी येशूच्या सुळी जाण्यासंदर्भात केले होते खरे, पण ते कोणत्याही देशातील/ काळातील सामूहिक हिंसाचाराला लागू पडावे. गिरार्ड यांचे निधन गेल्या आठवडय़ात, वयाच्या ९२ व्या वर्षी झाले आणि जगाने तत्त्वचिंतक- अभ्यासक गमावला. युद्ध, हिंसाचार आणि ‘संस्कृती’ यांच्या संबंधांचा अभ्यास करताना वाङ्मय, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, इतिहास यांचा आंतरशाखीय विचार करून त्यांनी ‘बळीचा सिद्धान्त’ मांडला होता. या अनुषंगाने, ‘आपल्या इच्छा आपल्या नसतात’ (मानवी अनुकरणाचा सिद्धान्त) आणि अनुकरण करता येत नाही म्हणून- किंवा दुसऱ्याकडे आहे ते आपल्याकडे नाही म्हणून संघर्ष/ हिंसाचार, कारणाचे सुलभीकरण करून निरपराधांना नाडण्याची प्रवृत्ती.. अशी सत्ये त्यांनी साधार मांडली. चार्ल्स डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धान्त हा मानवी संस्कृतीत टिकून राहिलेल्या बहुविधतेलाही लागू आहे असे सांगणारे गिरार्ड ‘मानव्यविद्यांमधील डार्विन’ म्हणून ओळखले जात.
नीतिशास्त्रातील प्रश्न शास्त्रीय आणि समाजशास्त्रीय आधारांनी सोडवू पाहणाऱ्या या विद्वानाने मध्ययुगीन इतिहासात पदव्युत्तर पदवी, तर अमेरिकेत जाऊन ‘अमेरिकन ओपिनिअन ऑन फ्रान्स (आल्बेर कामू व मार्सेल प्रूस्त)’ या विषयात विद्यावाचस्पती पदवी घेतली. ते मूळचे फ्रेंच. ग्रंथपाल म्हणून काम करताना १९४७ मध्ये पॅरिसला त्यांनी चित्रप्रदर्शनही भरविले होते. पण अमेरिकेत येऊन त्यांची प्रतिभा बहरली. त्यांच्या ३० पुस्तकांपैकी बहुतेक अमेरिकी विद्यापीठांनीच प्रकाशित केली. त्यांनी अध्यापन केलेल्या विद्यापीठांची यादी डय़ूक्स, न्यूयॉर्क, जॉन हॉपकिन्स व स्टॅन्फर्ड अशी भारदस्त आहे. ‘द स्केपगोट आय सॉ’, ‘शेक्सपिअर : द थिएटर ऑफ एन्व्ही’ ही त्यांची पुस्तके सर्वमान्य ठरली तर ‘थिंग्ज हिडन सिन्स फाउंडेशन ऑफ द वर्ल्ड’ या पुस्तकातून फ्रॉइडच्या ‘टोटेम’ आणि ‘टॅबू’ या संकल्पनांना त्यांनी दिलेले आव्हान किंवा ‘थिअरीज आर एक्स्पेंडेबल’मधून विद्याशाखीय व्यवस्थेला त्यांनी दिलेला हादरा हे वादग्रस्त ठरले.
‘द इकॉनॉमिस्ट’सह सर्वच गंभीर वृत्तपत्रांनी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी लेख लिहिले आहेत. त्या लेखांतून जाणवत राहाते की, हा केवळ अभ्यासू विद्वान नव्हता. जगातील ‘खरे’ प्रश्न (उदा. माणसे का भांडतात?) धसाला लावण्याची धमक आणि त्यासाठी इतिहासापासून ते विज्ञानापर्यंत सर्व प्रकारचे ‘साक्षीदार तपासण्या’ची तयारी त्यांच्याकडे होती. बायबलसकट कशाहीकडे टीकात्म, निराळय़ा नजरेने पाहिल्यामुळेच त्यांचा अभ्यास पुढे जाऊ शकला.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध ( Vyakhtivedh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rene girard profile

ताज्या बातम्या