‘ऑस्कर’ पुरस्कार त्यांना तीनदा मिळाला, हे यश म्हणजेच सर्वस्व मानणाऱ्यांसाठी ठीक आहे. ‘हू फ्रेम्ड रॉजर रॅबिट’ या अजरामर चित्रपटात जिवंत पात्रांना रॉजर रॅबिट आणि जेसिका रॅबिट या सचेत (अ‍ॅनिमेटेड) चित्रमय-पात्रांची जोड देण्याचं श्रेय त्यांचेच, हेही चित्रपटवेडय़ांसाठी ठीक आहे. पण रिचर्ड विल्यम्स यांचे खरे कर्तृत्व असे की, ते सचेतपट-कलेचे, म्हणजे अ‍ॅनिमेशन आर्टचे ‘ज्ञानकोश-कार’ होते! या तिसऱ्या कर्तृत्वाचे महत्त्व ज्यांना कळणार नाही, ते करंटेच म्हणायला हवेत आणि अशांनी केवळ इतरेजन पाहतात म्हणून ‘गाजलेले’ सचेतपट पाहावेत- आणि ‘रिचर्ड विल्यम्स यांचे निधन’ या १६ ऑगस्टच्या बातमीविषयी  दु:खही वाटून घेऊ नये!

सचेतपटांकडे एक कला म्हणून ज्यांना पाहायचे असेल, त्यांनी मात्र या निधनवार्तेच्या निमित्ताने तरी विल्यम्स यांच्याविषयीचे लघुपट जरूर पाहावेत. त्यांच्या सचेतपट-कारकीर्दीचा दृश्यानुभव जरूर घ्यावा. ही कारकीर्द १९५८ साली (मिकी माऊस ३० वर्षांचा होत असताना) सुरू झाली आणि १९७१ मध्ये चार्ल्स डिकन्सच्या कादंबरीआधारे त्यांनी चित्रवाणीसाठी केलेल्या ‘ख्रिसमस कॅरोल्स’ या सचेतपटाला, १९७३ सालचे ‘ऑस्कर’ मिळाले! १९८८ सालच्या ‘..रॉजर रॅबिट’चे दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग आणि ‘सचेतीकरण दिग्दर्शक’ रिचर्ड विल्यम्स होते. ‘अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्सेस’ने विल्यम्स यांना ‘उत्कृष्ट दृश्यकरामती’चा पुरस्कार दिलाच, पण  दिग्दर्शक म्हणून पुरस्कार देता येत नसल्याने ‘विशेष पुरस्कार’ देऊन गौरविले! जिवंत माणसांच्या चित्रीकरणानंतर १४ महिने काम करून विल्यम यांनी ‘रॉजर रॅबिट’ घडवला होता.

लहानपणी ‘स्नोव्हाइट’ हा डिस्नेपट पाहून नादावलेल्या रिचर्ड यांनी कसाबसा डिस्ने स्टुडिओत प्रवेश मिळविला, पण पुढे चित्रकलेचे शिक्षण घेत असताना ते सचेतपटांपासून दुरावले. वयाच्या २३ व्या वर्षीपासून पुन्हा सचेतपटांकडे ते वळले. यथावकाश स्वत:चा स्टुडिओही थाटला. इथे उत्तमोत्तम सचेतीकरण-कलावंतांना नोकरी देऊन, त्यांच्याकडून त्यांची शैली शिकून घेण्याचा सपाटाच विल्यम्स यांनी लावला. डिस्नेतील तज्ज्ञ सचेतीकरण-कारांकडून स्वत:च्या स्टुडिओतील सर्वाना शिक्षण मिळावे, म्हणून महिनाभर बाहेरची कामे घेणे बंद ठेवले! कागद  व सेल्युलॉइडवरील सचेतीकरणापासून ते ‘कॅप्स’ या संगणक-तंत्रज्ञानापर्यंत व पुढे पूर्णत: संगणकीय कलेपर्यंतचा प्रवास पाहणारे विल्यम्स गेल्या काही वर्षांत या कलेविषयी व्याख्याने देत. त्या १६ व्याख्यानांचा संच, ‘द अ‍ॅनिमेशन मास्टरक्लास’या डीव्हीडी संचाद्वारे यापूर्वीच उपलब्ध झाल्यामुळे विल्यम्स हे सचेतीकरणाच्या ज्ञानकोश-रूपात उरले आहेत.