scorecardresearch

व्यक्तिवेध : टी. रामा राव

सर्वोच्च न्यायालयाने पाडकाम थांबवण्याचा आदेश दिल्यानंतर बुलडोझर सुरूच राहिल्याची आणि ‘आम्हाला त्या आदेशाची प्रत मिळालीच नव्हती’ असा बचाव करून संबंधित मोकळे सुटणार का, याची चर्चा सध्या सुरू असतानाच टी. रामा राव यांची निधनवार्ता आल्यामुळे, ‘अंधा कानून’ या चित्रपटाची आठवण येणे साहजिक आहे.

सर्वोच्च न्यायालयाने पाडकाम थांबवण्याचा आदेश दिल्यानंतर बुलडोझर सुरूच राहिल्याची आणि ‘आम्हाला त्या आदेशाची प्रत मिळालीच नव्हती’ असा बचाव करून संबंधित मोकळे सुटणार का, याची चर्चा सध्या सुरू असतानाच टी. रामा राव यांची निधनवार्ता आल्यामुळे, ‘अंधा कानून’ या चित्रपटाची आठवण येणे साहजिक आहे. न्यायालयातच हत्या घडते, हे कळीचे दृश्य असणारा आणि ‘कायदा-न्याय म्हणजे केवळ कागदोपत्री पुरावे की परिस्थितीची शहानिशा?’ असा प्रश्न उभा करणारा तो हिंदी चित्रपट टी. रामा राव यांनी दिग्दर्शित केला होता. ‘दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतचा पहिलावहिला हिंदी चित्रपट’ अशीही १९८३ च्या त्या चित्रपटाची ख्याती आहे. रजनीकांतचे हिंदीतले पदार्पण अमिताभ बच्चन, हेमामालिनी अशांच्या साथीने होण्याची तजवीज ‘अंधा कानून’द्वारे टी. रामा राव यांनी केली होती. सन २००० चा ‘बुलंदी’ हा या टी. रामा राव यांचा अखेरचा गाजलेला हिंदी चित्रपट, त्यातही रजनीकांत यांची भूमिका होती. धर्मेद्र, जितेंद्र, अमिताभ, अनिल कपूर, रेखा, माधुरी दीक्षित अशा त्या त्या वेळी उच्चस्थानी असणाऱ्या कलावंतांसह सुमारे ३५ हिंदी आणि तेवढेच तेलुगू चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले, २० ते २५ चित्रपटांशी निर्माते आणि पटकथालेखक म्हणूनही ते संबंधित होते.

सन १९३८ मध्ये जन्मलेल्या टी. रामा राव तातिनेनी यांना अगदी कळत्या वयापासूनच चुलत बंधूंमुळे चित्रपटनिर्मितीत सहभागी होण्याची संधी मिळाली. अवघ्या विशीत असताना त्यांचे नाव ‘सहायक दिग्दर्शक’ म्हणून झळकले. अखेर १९६६ मध्ये ‘नवरात्री’ या तेलुगू चित्रपटानिशी त्यांनी दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. तुलनेने हिंदीत त्यांचा शिरकाव बराच उशिरा म्हणजे वयाच्या चाळिशीत झाला. तोवर लग्न, दोन मुले, चित्रपटांखेरीज पोलाद उद्योगक्षेत्रातही थोडीफार गुंतवणूक असा व्याप वाढला होता. १९७७ मध्ये (पुढे ‘तेलुगू देशम्’ स्थापणारे) एन. टी. रामा राव  व जयाप्रदा यांच्यासह तेलुगूत ‘यमगोल’ हा चित्रपट टी. रामा राव यांनी केला होता, त्यावर आधारित ‘लोक परलोक’ (जितेंद्र व जयाप्रदा) १९७९ मध्ये हिंदीत आला. मग गाजलेल्या तेलुगू वा तमिळ चित्रपटांचे हक्क विकत घ्यायचे आणि त्यावर हिंदी चित्रपट स्वत:च्याच दिग्दर्शकीय देखरेखीखाली बनवायचे असा उद्योग त्यांनी सुरू केला. १९८० ते ८२ या दोन वर्षांत जुदाई, मांग भरो सजना, एक ही भूल, मै इंतकाम लूंगा, जीवनधारा आणि ये तो कमाल हो गया हे सारेच चित्रपट चालले, गाजलेसुद्धा! पण ‘जीवनधारा’ स्त्रीचे कणखर रूप दाखवणारा, तर ‘मांग भरो सजना’ पूर्णत: परंपराशरण, पुरुषावलंबी (दोन्हीत रेखाची प्रमुख भूमिका).. मै इंतकाम लूंगा मारधाडपट तर कमाल हो गया विनोदी अंगाचा.. या आशयवैविध्याचा संबंध टी. रामा राव हे दिग्दर्शक असण्यापेक्षा, ते गुंतवणूकदार असल्याशी अधिक होता. त्यामुळेच कुणी त्यांना प्रतिभाशाली वगैरे म्हणण्याच्या फंदात पडणार नाही, पण मद्रासकडल्या चित्रपटांची वाट १९८० आणि ९० च्या दशकांमध्येही हिंदीत खुलीच ठेवण्याचे श्रेय निर्विवाद त्यांना दिले जाते. गाजलेल्याच चित्रपटांना हिंदीत ते आणत, त्यामुळे फार कमी चित्रपट ‘पडले’, बाकी सारे चाललेच! पण सुधा चंद्रनचा ‘नाचे मयूरी’ (१९८६) हिंदीत आणल्याबद्दल हिंदी प्रेक्षकांना नेहमीच टी. रामा राव यांच्याविषयी कृतज्ञता वाटेल, वाटायला हवी.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध ( Vyakhtivedh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vyaktivedh t rama rao supreme court orders stop pad work bulldozer law justice ysh

ताज्या बातम्या