पॅरिसवासी भारतीय चित्रकार म्हटले की, हा चित्रकार उगाच तोऱ्यात राहात असेल आणि सुट्टीत मायदेशी आला की भारतीय संस्कृतीबद्दल फार आस्था
बाळगत असेल, अशी एक प्रतिमा चित्रकलाप्रेमींना माहीत आहे. या प्रतिमेच्या अगदी उलट राजेंद्र धवन होते. साधे. भारतात आले की, ‘मीच राजेंद्र धवन’ असे काही आर्ट गॅलऱ्यांत त्यांना सांगावे लागे आणि मग कुठे त्यांचे स्वागत वगैरे होई. अमूर्तकला हा अजिबात लोकप्रिय नसलेला प्रकार, वयाच्या तिशीपासून अगदी पंचाहत्तरीपर्यंतचे अर्धशतकभर राजेंद्र यांनी हाताळला. त्यांच्या चित्रांत निसर्गदृश्यासारखे तुकडे दिसत..जवळची शेते किंवा माळ, लांबचा डोंगर आणि त्यामागचे आकाश अशा तीन टप्प्यांत निसर्गचित्रकार चित्राला खोली (डेप्थ) आणतो, तसे तीन विविधरंगी तुकडे धवन यांच्या चित्रांत दिसत. ही निसर्गदृश्ये तर नाहीत.. तरीही नजरेला खोलवर नेण्याचे काम ही चित्रे करताहेत, ही खोली केवळ मितीच्या आभासातून निर्माण झालेली नसून पोतनिर्मिती आणि रंगलेपन यांची ही किमया आहे, हे प्रेक्षकाला जाणवे. चित्रभर अवकाशाचे तुकडे दुरून रिकामे वाटत, पण जवळून या एकाच अवकाशाचे किती थर चित्रकाराने रंगवले आहेत, हे लक्षात येईल. अमूर्तचित्रकार अबोलच असला पाहिजे असे नाही, पण धवन कमी बोलणे पसंत करत. १९३६ साली जन्म आणि पुढे १९५३ ते ५८ पर्यंत ‘दिल्ली स्कूल ऑफ आर्ट’मध्ये कलाशिक्षण, इथवरचा त्यांचा प्रवास एका रेषेत होता, पण १९६० ते १९६२ दरम्यान युगोस्लाव्हियात, त्यावेळच्या बेलग्रेडला (बिओग्राड) येथे शिक्षणासाठी वास्तव्य झाले आणि फरक पडला. परतल्यावर ‘द अननोन’ हा कलागट त्यांनी स्थापन केला. चित्रकार म्हणून भारतात पैसा मिळेना, म्हणून कलाशिक्षकाची नोकरीही केली. पण १९७० साली ते, पॅरिसला निघून गेले. तिथे मात्र १९७३ पासून ‘गालेरी दु हॉत-पेव्ह’मध्ये त्यांची प्रदर्शने भरत. कीर्ती वाढत गेली, न्यूयॉर्कपर्यंत पसरली आणि मग त्यांनी भारतात दमदार पुनरागमन केले. ललितकला अकादमीसह अनेक
भारतीय संस्थांच्या संग्रहांत त्यांची चित्रे आहेत, पण हा चित्रकार भारतीयांना पुरेसा पाहायला न मिळताच गेल्या बुधवारी (३१ ऑक्टो.) अनंतयात्रेला निघून गेला.