जगातील चौथ्या क्रमांकाचे हवाई दल म्हणून ओळख असलेल्या भारतीय हवाई दलाचे प्रमुख म्हणून आता एअर मार्शल अरूप राहा यांच्या हुशारीचा लाभ देशाला होणार आहे. या पदावर पुढील तीन वर्षे काम करण्याची संधी त्यांना मिळणार आहे. हवाई दलासमोरील विविध आव्हाने लक्षात घेता लढाऊ विमानाचे सारथ्य करण्याचा अनुभव गाठीशी असणाऱ्या राहा यांना त्यावर कुशलतेने मार्ग काढण्यासाठी पुरेसा वेळही मिळणार आहे. भारतीय हवाई दलाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणारे राहा हे २४ वे अधिकारी. २६ डिसेंबर १९५४ रोजी जन्मलेल्या राहा यांचे बालपण पश्चिम बंगालमधील बिद्याबती येथे गेले. वडील नानीगोपाल राहा यांनी दुसऱ्या महायुद्धात वैद्यकीय सेवा देण्याची कामगिरी बजावली होती. पुरुलिया येथील सैनिकी शाळेत शिक्षण घेत राहा यांनी राष्ट्रीय सुरक्षा अकादमीत दाखल होण्याचा मार्ग प्रशस्त केला. या ठिकाणी सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थीचा मान तसेच राष्ट्रपतींचे सुवर्णपदकही त्यांनी पटकावले. १४ डिसेंबर १९७४ रोजी भारतीय हवाई दलात ते दाखल झाले. त्यानंतर त्यांच्या कारकिर्दीचा आलेख लढाऊ विमानासारखा वेगवान राहिला. आतापर्यंतच्या सेवेत हवाई दलाची विविध मुख्यालये, प्रशिक्षण तसेच नियोजन व कर्मचारीवर्गाशी संबंधित कामांचीही जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. परदेशात सेवा करण्याचा त्यांना अनुभव मिळाला, तो युक्रेन येथील भारतीय दूतावासाच्या माध्यमातून. या शिवाय, तामिळनाडूस्थित हवाई प्रशिक्षक स्कूल तसेच ग्वाल्हेरच्या हवाई रणनीती विकासात्मक विभागात त्यांनी काम केले. सेवाकाळात विविध शिक्षणक्रम करण्यास त्यांनी प्राधान्य दिले. त्यात आण्विक विषयाशी संबंधित अभ्यासक्रम आणि ‘ज्युनिअर कमांडर कोर्स’ यांचा समावेश आहे. राहा अशा वेळी प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारत आहेत, जेव्हा हवाई दलासमोर अनेक आव्हाने आहेत. हवाई प्रशिक्षणासाठी ‘एचएएल’कडून विमाने मिळत नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे ही विमाने परदेशातून खरेदी करण्याचे समर्थन मावळत्या हवाई दल प्रमुखांनी केले होते. त्यामुळे एचएएल आणि हवाई दल यांच्यात संघर्ष निर्माण झाला. दुसरीकडे हवाई दलाच्या सामर्थ्यांत वाढ करणे, जुनाट विमाने बदलून अत्याधुनिक विमानांची खरेदी करणे या प्रक्रिया नेटाने पार पाडाव्या लागणार आहेत. शेजारील राष्ट्रांकडून असणारे धोके लक्षात घेऊन हवाई सामथ्र्य वाढविण्यासाठी पुढील दशकभरात मोठा निधी खर्च केला जाणार आहे. त्या अनुषंगाने १२६ राफेल विमानांच्या खरेदीच्या वाटाघाटी सुरू आहेत. स्वदेशी बनावटीचे तेजसही लवकरच समाविष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी लागणारे कौशल्य राहा यांच्या अंगी निश्चितच आहे.