अफगाणिस्तानात, काबूलमध्ये जिल्हा पोलीस प्रमुख पदी कुणा महिलेची निवड होते आणि ती कामाला लागते, हीच तालिबान्यांचा तिळपापड करणारी आणि जगाला आश्चर्य आणि आनंद व्यक्त करावयास लावणारी बातमी.. कर्नल जमीला बयाझ यांच्यासाठी मात्र ही नियुक्ती हे त्यांच्या कष्टांचे अपेक्षित फळच होते. अफगाणिस्तानात महिला पोलीसच एकंदर दीड हजार, त्यात तिघीचौघीच काय त्या अधिकारपदांपर्यंत जाऊ शकल्या. त्यापैकी कुणीच आज हयात नाही. अशा स्थितीत जमीला यांनी आजवर कुणाही अफगाण महिलेला न मिळालेले जिल्हा पोलीस प्रमुखपद स्वीकारले आहे. त्यांच्यापुढे आता अडथळय़ांची शर्यतच असणार हे उघड होते, परंतु पहिला अडथळा म्हणजे पोलीस खात्यात आणि अधिकारपदांवर असलेल्या महिलांनाही पुरुष सहकाऱ्यांशी बोलण्यास परवानगी नसणे, हा! जमीला यांची नियुक्ती दोन दिवसांपूर्वी झाली, त्यानंतर तो त्यांनी पार केला. काम होणे, याला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे, हे त्यांनी सहकाऱ्यांच्याही गळी उतरवले. अफगाण पोलिसांचे नियम महिला कर्मचाऱ्यांसाठी इतके शिथिल की, गणवेशाऐवजी ‘नेहमीसारखा’ नखशिखान्त बुरखा वापरला तरी चाले. हे असले नियम तर जमीला यांनी कधीच मोडले होते. मी गणवेशच घालेन, फारतर कान-डोके आणि गळा झाकेन हा आग्रह त्यांनी आचरणात आणला. हे पाश्चात्त्यांचे थेर, म्हणून पाहणारे अफगाणिस्तानात कमी नाहीत. पण पाश्चात्त्यांची जी काही मदत अफगाणिस्तानला होते आहे ती ठीकच आहे आणि मला मिळालेले पद हादेखील अमेरिका व अन्य राष्ट्रांच्या फौजा येथे होत्या याचा एक अप्रत्यक्ष परिणाम आहे, असे जमीला सांगतात. त्यात तथ्यही आहे. अफगाणिस्तानात तालिबान्यांचा प्रादुर्भाव नव्हता, तेव्हा जमीला पोलीस दलात होत्या. तालिबानकाळात मात्र महिलांसाठी कुठलीही सरकारी सेवा अशक्यच होती.
आजघडीला त्यांचे वय ५०, घरी पती आणि दोन मुली व तीन मुलगे असा परिवार. त्या सर्वानी आपल्याला सतत साह्य केले नसते, धीर सोडला असता, तर पोलीस दलातील सेवेत इतकी पदे मिळालीच नसती, असे जमीला आवर्जून सांगतात. महिला पोलिसांचे काम हे महिला आरोपींपुरतेच मर्यादित असूनही अमली पदार्थाच्या विक्रीव्यवहारातील महिलांना पकडण्यात जमीला यांनी मोठी कामगिरी बजावली होती. तेव्हापासून पोलीस दलात त्यांचे नाव झाले. आता काबूल या राजधानीच्या शहरात, अतिमहत्त्वाची ठिकाणे असलेल्या भागाच्या पोलीस प्रमुख म्हणून फक्त महिलाच नव्हे तर पुरुषांवरही वचक ठेवण्याचे काम त्या पार पाडणार आहेत. आपले इरादे चांगले असल्यास कुठून ना कुठून साथ मिळते, यशही मिळते, हा त्यांचा विश्वास सार्थ ठरतो आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Jan 2014 रोजी प्रकाशित
जमीला बयाज
अफगाणिस्तानात, काबूलमध्ये जिल्हा पोलीस प्रमुख पदी कुणा महिलेची निवड होते आणि ती कामाला लागते, हीच तालिबान्यांचा तिळपापड करणारी आणि जगाला आश्चर्य आणि आनंद व्यक्त करावयास लावणारी बातमी..
First published on: 18-01-2014 at 05:16 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vyaktivedh jamila bayaz