नाटय़पूर्ण घटनांनी भरलेल्या आपल्या आयुष्यावर तयार झालेला चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच लुई झाम्पेरिनी यांचे निधन झाले. हिटलरशी हस्तांदोलन, जपान्यांकडून कैद, प्रशांत महासागरात युद्धविमान पडल्यावर पाण्यातच कंठावे लागलेले दिवस, मरणवार्तेनंतर मायदेशी परतल्यावर झालेले जोरदार स्वागत, अशा अनेक आठवणींचा अखेरचा जिवंत ठेवा त्यांच्या जाण्यामुळे हरपला आहे. वयाच्या ९७व्या वर्षी न्यूमोनियाशी ४० दिवसांची झुंज देऊन ते गेले.  
२६ जानेवारी १९१७ रोजी जन्मलेले लुई खेळांत प्रथमपासून पुढे असत. बर्लिनमध्ये १९३६ साली भरलेल्या ऑलिम्पिकसाठी अमेरिकी धावपटूंच्या चमूत त्यांना स्थान मिळाले, तेही ५००० मीटर धावण्याच्या शर्यतीसाठी. अर्थात, या शर्यतीत त्या वर्षी फिनलंडने सुवर्ण- रौप्य आणि स्वीडनने कांस्यपदक मिळवले; परंतु अवघ्या १९ वर्षांच्या, वयाने सर्वात लहान असलेल्या या धावपटूच्या कौतुकाचा भाग म्हणून जर्मन हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलरने त्यांच्याशी हस्तांदोलन केले होते. पुढल्या ऑलिम्पिकसाठी (१९४०) लुई यांची कसून तयारी सुरू असतानाच दुसऱ्या महायुद्धाचे वारे वाहू लागले. मग ऑलिम्पिक स्पर्धा रद्दच झाल्या आणि लुईदेखील, मैदानी सराव सोडून सरळ हवाईदलात दाखल झाले. बॉम्बफेक पथकात त्यांची नेमणूक झाली.
प्रशांत महासागराने त्यांच्या आयुष्यात महानाटय़ घडवले, ते याच काळात. या महासागरात अमेरिकेच्या कोसळलेल्या युद्धविमानाचे अवशेष शोधण्याच्या कामी एकंदर ११ सैनिकांपैकी एक, म्हणून झाम्पेरिनी हवाई पाहणीस गेले असता, ते शोधविमानही समुद्रात कोसळले. ११ पैकी फक्त तिघे जण वाचले, ते तिघेही पोहत किनारा शोधू लागले.. ‘कच्चे मासे खाऊन आम्ही जगलो.. तिसरा सहकारी मरण पावला.. अखेर, ४७ व्या दिवशी आम्ही दोघे (मी आणि रसेल फिलिप्स ऊर्फ ‘फिल’) किनाऱ्याला लागलो’ असे लुई झाम्पेरिनी यांनी सांगितले होते. हा किनारा जपानच्या ताब्यातील मार्शल बेटांचा असल्याने ते युद्धबंदी बनले. युद्धकैद्यांवर कसकसल्या औषधांच्या चाचण्या घेणे हा छळाचा नेहमीचा प्रकार, त्यातून लुई आणि फिल सुटले नाहीतच, पण त्यांचा छळ अनन्वित झाला आणि १९४५च्या मध्यावर तर ते दिसेनासेच झाले, तेव्हा अन्य  अमेरिकी युद्धकैद्यांची खात्री झाली की हे दोघे आता या जगात नाहीत! त्यामुळे, अमेरिकेने त्यांची अधिकृत नोंद ‘मृत’ अशी केली होती.. परंतु लुई यांना अगदी अखेरीस जपान्यांनी मुक्त केले. ते अमेरिकेत आले, तेव्हा त्यांचे जंगी स्वागतही झाले.  विजय, पराक्रम यांनी रूढार्थाने लुई यांना हुलकावणीच दिली खरी, पण जीवन-मृत्यूच्या संघर्षांत माणसाच्या क्षमता आणि जिद्दीचे प्रतीक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाई. १९४६ साली ते विवाहबद्ध होऊन सुखाने जगले.