अमेरिकेतील सिएटलमधील एका मंदिराच्या भिंतीवर नाझी स्वस्तिक रंगवून हिंदूंना देशाबाहेर जा असा संदेश रंगविण्यात आल्याची घटना अजूनही ताजी असतानाच एका शिख विद्यार्थ्यांची वर्णद्वेषी टिंगलटवाळी करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. या घटना दिसतात साध्याच. पोलिसी भाषेत सांगायचे तर कधीकधी अदखलपात्र वाटाव्यात इतक्या साध्या. पण त्यामागील सामाजिक द्वेषभावना ध्यानी घेतली की त्यांतील गांभीर्य स्पष्ट होते आणि मग एखाद्या देवळाच्या भिंतीची टारगटांनी केलेली नासधूस वा शाळकरी मुलांचे निरागस भांडण असे त्याचे स्वरूप राहात नाही. सीएटलमधील देवळावर ‘गेट आऊट’ असे लिहिलेले आढळल्यानंतर तेथील हिंदू समुदायातून एक लक्षणीय प्रतिक्रिया आली होती. एका महिलेने त्या संदेशावर म्हटले होते, की बाहेर जायला कोणाला सांगता आहात? हा देशच मुळात निर्वासितांनी बनलेला आहे. एकेकाळी जगाचे मेल्टिंग पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेतील हे वास्तवच पुसून टाकण्याचे अतिरेकी प्रयत्न सध्या सुरू आहेत. त्या देशाला काळे, पिवळे, विटकरी रंग तसे पूर्वीपासूनच फार भावत होते अशातला भाग नाही. त्या देशात वर्णद्वेषाच्या मुद्दय़ावरून यादवी युद्ध झालेले आहे, हा इतिहास विसरता येण्यासारखा नाही. त्याच वर्णद्वेषाला आत राष्ट्रवादाचे एक वेगळे परिमाण लाभले आहे. त्याला प्रामुख्याने कारणीभूत ठरला ‘नाईन इलेव्हन’चा दहशतवादी हल्ला. त्या घटनेनंतर मुस्लिमांविरोधातील द्वेषमूलक गुन्ह्य़ांमध्ये पाच पटीने वाढ झाली असल्याची एफबीआयची आकडेवारी आहे. वस्तुनिष्ठ विचार करण्याची क्षमता एखाद्या समाजाने गमावली की तो सरसकटीकरणाच्या मागे लागतो. ते सोपे असते. अमेरिकेत नाईन इलेव्हननंतर तेच घडले आहे. तो हल्ला लादेनने घडवून आणला. पण त्यासाठी सर्व मुस्लिमांना जबाबदार धरणाऱ्या प्रवृत्ती तेथील समाजात आहेत. त्यांचे अज्ञान केवळ एवढय़ावरच थांबत नाही. हा कदाचित तेथील शिक्षणव्यवस्थेचा दोष असावा, परंतु बहुतेक अमेरिकनांचा भूगोल याबाबत जरा कच्चाच दिसतो. त्यामुळेच तेथे भारतीयांचीही पाकी म्हणून अवहेलना करण्यात येते आणि शिखांना अरबी मुसलमान समजले जाते. जॉर्जियातील एका प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांला शाळेच्या बसमधून जाताना त्याचे वर्गमित्र दहशतवादी म्हणून चिडवतात. त्याची टिंगलटवाळी करतात. हे घडते ते केवळ अज्ञानातूनच असेही म्हणता येणार नाही. लहान मुलांची मने टीपकागदासारखी असतात. त्यांनी हा वर्णद्वेष त्यांच्या आसपासच्या वातावरणातूनच टिपला असावा. म्हणून ती घटना अधिक गंभीर आहे. अमेरिकेची वाटचाल कोणत्या दिशेने सुरू आहे हेच त्यातून दिसते आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी एक वृद्ध भारतीय पोलिसी अत्याचारामुळे पंगू झाला. बिचाऱ्याचा रंग गोरा नव्हता, हा त्याचा दोष होता. हे केवळ आशियायी नागरिकांनाच भोगावे लागते असे नाही. आफ्रिकी-अमेरिकनांचीही तीच अवस्था आहे. त्यातील काहींना तर थेटच पोलिसांच्या गोळ्यांना बळी पडावे लागले आहे, लागत आहे. बराक ओबामा यांच्यासारखा आफ्रिकी-अमेरिकी राष्ट्राध्यक्ष असतानाच्या काळात हे सारे घडते आहे. यातून दोन गोष्टी तर स्पष्टच दिसतात. अमेरिकेतील पुढची निवडणूक ही रिपब्लिकनांसाठी सोपी जाणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अमेरिका पुन्हा सामाजिक सरसकटीकरणाच्या विकृत मार्गाने चालली आहे. खरे तर त्यामुळेच उजव्या रिपब्लिकनांना येणारी निवडणूक सोपी असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young sikh boy racially abused in us
First published on: 04-03-2015 at 01:01 IST