अशोक तुपे ashok.tupe@expressindia.com

१९७०ला एक बंड झाले. सुमारे ५० वर्षे अनेकांनी ज्या खस्ता खाल्ल्या त्याला यश मिळाले होते. आज चंदन लोखंडेसारखा एक डॉक्टर समाजात काम करतो. असे शेकडो चंदन वैदू समाजासाठी काम करीत आहेत. ‘शिक्षण हे माणूस घडविण्यासाठी, त्याला बदलण्यासाठी, उभे करण्यासाठी हवे,’ हे विचार चंदनप्रमाणेच वैदू समाजातील तरुणाईचेही आहेत.

Lok Sabha Election, Lok Sabha Election 2024,
डोके ठिकाणावर ठेवून मतदान कराल ना?
Kolhapur district, election campaign, caste and religion issues, kolhapur, hatkanangale constituency
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव
mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
buldhana japan marathi news, japanese language buldhana marathi news
गरिबीच्या अंधारावर मात करत निघाली उगवत्या सूर्याच्या देशात; बकऱ्या वळणाऱ्या रमाई कन्येला जपानमध्ये लाखोंचे ‘पॅकेज’

वैदू समाजातील माणसे पूर्वी जडीबुटी विकत. तुंबडय़ा लावीत. नाडी परीक्षा करीत. महिला सुया, बिबे, कंगवे विकत; पण वैद्यकीय क्षेत्राचा विकास झाल्यानंतर जडीबुटी आणि तुंबडय़ांचा व्यवसाय बंद पडला. पुरुषांनी डबे, चाळण्या करण्याचे काम सुरू केले. महिला आरसे, कंगवे, कटलरी सामान विकू लागल्या. भटकंती करणारा हा समाज मागून खात असे.

असेच बालपण एका लहानग्याच्या नशिबी आले. आईवडील गावोगाव जात. सहा वर्षांचा होईपर्यंत अंगावर कपडेच नव्हते. गावात भीक मागून खावे लागायचे. शिक्षिकेने दिलेल्या एका चपातीने शाळेची गोडी लागली. पोटाची भूक भागली म्हणून शाळेत गेला. शिक्षक चांगले भेटले. वसतिगृहात माध्यमिक शिक्षण घेतले. डॉक्टर झाला. जे भोगले ते इतरांच्या वाटय़ाला येऊ नये, म्हणून समाजाला परिवर्तनाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी पडद्याआड प्रयत्न केले. त्यातून अघोरी शिक्षेसाठी प्रसिद्ध असलेली वैदूंची जातपंचायत बंद पडली. बालविवाह रोखण्याची चळवळ सुरू झाली. ही कथा आहे निपाणी वाडगाव (ता. श्रीरामपूर) येथील चंदन लोखंडे या युवकाची. तो आयुर्वेद व होमिओपॅथीमध्ये डॉक्टर झालेला आहे. सध्या पुण्यात असतो. साऱ्या राज्यभर वैदूंच्या जिथेजिथे वस्त्या असतील तेथे जाऊन तिथल्या शिकलेल्या मुलांमध्ये बदल घडवतो आहे, त्यांना कायद्याचे ज्ञान देतो आहे. सातारा आणि निपाणी वाडगावला त्याने दोन वाचनालये सुरू केली. आणखी काही सुरू करायची आहेत. समाजातील शिकलेली मुले त्याला मदत करतात.

अघोरी निर्णयासाठी जातपंचायती प्रसिद्ध होत्या. माणसांचे मूलभूत हक्क पंचायती हिरावून घेत. वाळीत टाकणे, दंड करणे, माणुसकीला काळिमा फासणारे निर्णय घेणे अशा अनेक जुलमी गोष्टी पंचांकडून घडत. मुंबईच्या जोगेश्वरी भागातील दुर्गा गुडेलू ही जातपंचायतीच्या निर्णयाविरुद्ध पहिल्यांदा पोलिसांत गेली. गुन्हा दाखल झाला; पण जो कायदा झाला तो श्रीरामपूरच्या दोन घटनांमुळे. अनिता नावाच्या तीन वर्षांच्या मुलीचा विवाह ४५ वर्षांच्या पुरुषाबरोबर लावण्यात आला. ती १८ वर्षांची झाली तेव्हा तो पुरुष ६० वर्षांचा झालेला होता. मुलीने ‘मी त्याच्याबरोबर नांदायला जाणार नाही’ असे सांगितले. तेव्हा जातपंचायत बसली, पंचांनी तिला एक रात्र तरी त्या पुरुषाबरोबर जावे लागेल, असा निर्णय दिला. चंदनने त्याविरुद्ध पडद्याआड लढाई केली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रंजना गवांदे, कृष्णा चांदगुडे, माधव बावगे यांच्याकडे तो गेला. हे प्रकरण त्याने पोलिसांकडे नेले. श्रीरामपुरातीलच एक बालविवाह त्याने रोखला. तेव्हा ‘मी पंच आहे, माझाच निर्णय अंतिम’ असे सांगितले गेले. त्यालाही चंदनने गनिमी काव्याने धडा शिकविला. जातपंचायत बरखास्त करण्याचा जो निर्णय झाला त्याचा मसुदा अ‍ॅड. असिम सरोदे यांनी तयार केला. त्यात श्रीरामपूरच्या दोन्ही घटनांचा उल्लेख आहे. पडद्याआड चंदन होता. आता जातपंचायत बरखास्त झाली. सुमारे ५० प्रकरणे न्यायालयात गेली. यापुढे न्यायनिवाडे हे कायद्यानुसार होणार आहेत. धडपडणाऱ्या चंदनसारख्या तरुणांचे त्यामागे योगदान आहे.

चंदनप्रमाणेच यापूर्वीही अनेकांनी बंड करण्याचा प्रयत्न केला. डॉ. माईक पवार हे त्यापैकीच एक. ते वडिलांना एकुलते एक होते. घरात मुलगी नव्हती. म्हणून त्यांचे लग्न अडविले गेले. त्यांनी वैदू समाजातील पहिला आंतरजातीय विवाह १९७० साली केला; पण पवार यांनी चळवळीत आयुष्य घालविले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद मिळाल्याने त्यांना बडय़ा असामींचा त्रास झाला नाही. कामामुळे समाज पुढे ऐकू लागला.

समाजातील आणखी काही तरुणांनी आंतरजातीय विवाह केले आहेत, मात्र आजही त्यांच्यावर दडपण आहे. त्यामुळे ते कुटुंब घरी किंवा गावाकडे नेत नाहीत. शहरातच कुटुंब ठेवतात. बंडाचे धाडस त्यांच्यात नाही. दबावाला ते बळी पडतात. मुक्त श्वास त्यांना घेता येत नाही. डॉ. माईक पवार यांनी जे धाडस केले ते आजही करताना तरुणाई कचरताना दिसते.

अ‍ॅड. मानवेंद्र वैदू यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारापासून प्रेरणा घेऊन धम्म स्वीकारला. गुलाब वाघमोडेंसह अनेकांनी समाज बदलण्याचा प्रयत्न केला. त्याला कमीअधिक यश आले. मल्लू शिंदे यांनीही अनेक मेळावे घेऊन प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला; पण खरे यश मिळाले ते शिक्षणाच्या प्रसारामुळे. वैदू समाज हा आला आंध्र प्रदेशातून. भिक्षा मागून खायचे, औषधाचे जे थोडेफार ज्ञान होते ते वापरून उपजीविका भागवायची, असा या समाजातील अनेकांचा जीवनक्रम. १९८०च्या दशकानंतर हे चित्र पालटू लागले. वैदू समाजाची भटकंती बंद झाली. तो शहरात अन् गावात स्थिरावला. पालात राहणारा आता घरात आला. भिक्षा मागणे बंद झाले. स्वाभिमानाने आणि स्वत:च्या कर्तृत्वावर तो उभा राहिला. पत्र्याच्या डब्यापासून चाळणी करणे, स्टेशनरी विकणे ही कामे या समाजातील अनेक जण आज करतात. अनेकांनी किराणा दुकाने टाकली. भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. काहींनी शेती घेतली. थोडे फार अजूनही या मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. पूर्वी वैदूं्चे कुत्रे प्रसिद्ध असत. त्यांचा शिकारीसाठी वापर होई. जंगली प्राण्यांची शिकार केली जायची. आता तेही बंद झाले. पूर्वी घरात शिळे खाल्ले जायचे, तेही आता थांबले. ताजा स्वयंपाक घराघरांत सुरू झाला. वैदू समाजाची पूर्ण जीवनशैली गेल्या २५ ते ३० वर्षांत बदलली. या बदलत्या जीवनशैलीमागे तरुणाईचा रेटा मोठा होता. या समाजात व्यसनाधीनता मोठी होती. अगदी अंत्यविधीलाही दारू लागायची. लग्नकार्यात तर ते सर्रास सुरू होते. कंदुरीचे कार्यक्रम चालायचे. आता तेही बदलले. मुले, मुली शिकू लागली. पदवीधर झाली. काहींना नोकऱ्या मिळाल्या, तर काहींना मिळाल्या नाहीत. पण अगदी वडापावची गाडी चालविण्यापासून तर चहाची दुकाने सुरू करण्यापर्यंत तरुण काहीही उद्योग करतात. कष्टाने जगणारा हा समाज, चोऱ्याचपाटय़ांपासून दूर राहिलेला आहे. बदलत्या जगरहाटीत त्याने अद्याप प्रामाणिकपणा सोडलेला नाही. एक मोठा फरक म्हणजे, घरात जरी तेलुगु बोलले जात असले तरी आता मराठी बोलीभाषा वाढली आहे. तरुण आता शुद्ध मराठी बोलतात. पूर्वी मुलीला हुंडा द्यावा लागायचा. आता त्या प्रथा बंद झाल्या. राहणीमान बदलले.

प्रभात मल्लू हा तरुण संगणक अभियंता आहे. तो समाजमाध्यमांत जाहिरात क्षेत्रात काम करतो. काही तरुण-तरुणी पदवीधर आहेत, मुले शिकत आहेत, पण अजूनही शिक्षण क्षेत्रात फार मोठी प्रगती करायची आहे. आज ना उद्या ते चित्र बदलेल. आजही अनेक तरुण समाजापासून फटकून वागतात, लोकांना घाबरतात. या तरुणांना मुख्य प्रवाहात आणावे लागेल, असे प्रभातचे म्हणणे आहे. तरुण एकत्र येतात. अन्य समाजातील बदलांची चर्चा करतात. त्यांची संख्याही मोजकीच आहे. मात्र दिशा मिळेल असा त्याचा दावा आहे.

कायद्याच्या बडग्याने आणि परिवर्तनाच्या रेटय़ाने जातपंचायत बंद झाली. परंपरेची काठी आपटण्याचा आवाज गायब झाला. देवधर्म, लग्नकार्य, सोयरीक, भाऊबंदकी, रीतिरिवाज यासंबंधीचे अलिखित कायदे संपले. आता मढीच्या रंगपंचमीला भरणाऱ्या जातपंचायतीऐवजी प्रबोधनाचे मेळावे सुरू झाले. हे काही एका दिवसात घडले नाही. त्यामागे तरुणांचा रेटा होता. शिक्षणामुळे झालेला हा बदल होता. १९७०ला एक बंड झाले. सुमारे ५० वर्षे अनेकांनी ज्या खस्ता खाल्ल्या त्याला यश मिळाले होते. आज चंदन लोखंडेसारखा एक डॉक्टर समाजात काम करतो. असे शेकडो चंदन वैदू समाजासाठी काम करत आहेत. ‘शिक्षण हे भौतिक प्रगतीकरिता आहे, हा विचार बदलला पाहिजे. शिक्षण हे माणूस घडविण्यासाठी, त्याला बदलण्यासाठी, उभे करण्यासाठी हवे,’ हे विचार चंदनप्रमाणेच वैदू समाजातील तरुणाईचेही आहेत.