अपंगांसाठीचं व्यवसाय प्रशिक्षण केंद्र- ‘संधीनिकेतन’ची इमारत आनंदवनात १९७० ला बांधून पूर्ण झाली. निवासाचीही सोय झाली. तरीदेखील अपंग व्यक्ती प्रशिक्षणासाठी दाखल होत नव्हत्या. कुष्ठरोगाच्या भीतीने पालक आपल्या अस्थिव्यंग पाल्यांना आनंदवनात पाठवायला तयार नव्हते. पहिली जवळजवळ दोन वर्ष अशीच गेली. दोन वर्षांच्या अखेरीस केवळ तीन प्रशिक्षणार्थी दाखल झाले होते : सदाशिव ताजने, सुनील तुलंगेकर आणि पुसाराम डोंगे. स्वप्नपूर्तीसाठी आतुर असलेले ऑर्थर तार्नोवस्की प्रशिक्षण सुरू होत नाही हे पाहून खूप वैतागले होते. ऑर्थर यांचं हे स्वप्न ज्यांच्या मेहनतीमुळे वास्तवात उतरलं अशी दोन माणसं म्हणजे सदाशिव ताजने आणि दुसरा आनंदवनात नव्यानेच दाखल झालेला कुष्ठमुक्त तरुण हरी बढे. तेव्हा सदाशिव आणि हरीबद्दल आधी जाणून घेणं क्रमप्राप्त आहे.

धोबीकाम करणाऱ्या आई-वडिलांच्या पोटी जन्मलेला सदाशिव यवतमाळ जिल्ह्य़ातल्या राळेगावचा. दोन वर्षांचा असताना पोलिओचा संसर्ग झाल्याने त्याचे दोन्ही पाय अधू झाले. पैशांअभावी गावातच वैदूकडून झाडपाल्याचे उपचार केले गेले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. पण सदाशिव पडला जिद्दी! खचून न जाता तो हातांवर चालायला शिकला. खेळण्यात, पोहण्यातही सदाशिव पटाईत! घरची प्रचंड गरिबी. तरीही आपल्या मुलाला किमान शिकवावं, या हेतूने सदाशिवच्या निरक्षर आई-वडिलांनी त्याला शिक्षणासाठी चौथीपासून वरोऱ्याला मामाकडे धाडलं. शाळा मामाच्या घरापासून एक किलोमीटर लांब होती, तरी तो हातांच्या बळावर शाळेत जात असे. घरी झाडझूड करणं, भांडी घासणं ही कामंही त्याला करावी लागत. कारण त्याशिवाय मामी जेवायला वाढत नसे. असा संघर्ष करत सदाशिव चिकाटीने मॅट्रिक झाला. दहावीच्या वर्गात असताना त्याच्या शाळेत पाचव्या इयत्तेत आनंदवनातली काही अंध मुलं एकात्म शिक्षण योजनेनुसार दाखल झाली. त्यांच्याकडून त्याला आनंदवनाविषयी कळलं. सदाशिव म्हणतो, ‘‘अपंग म्हणून मी अनेकदा टिंगल, अपमान गिळला होता. मी एकटाच असा जगात असल्याची भावना तोवर प्रबळ होती. ही मुलं आली आणि आम्हा समदु:खितांचं नातंच जुळून गेलं.’’ अपंगांसाठी सध्या आनंदवनात सोय नाही, हे ऐकून त्याचं मन खट्टू झालं. पुढे दहावीनंतरच्या शिक्षणाचं काय, हा प्रश्नही सदाशिवपुढे होता. वरोऱ्याचे अ‍ॅडव्होकेट डबले सदाशिवच्या मामांचे स्नेही. मामांनी त्यांच्याकडे सहजच सदाशिवचा विषय काढताच त्यांनी सदाशिवला ‘आनंदवनात बाबा आमटेंकडे जा.. तुझ्या शिक्षणाचा प्रश्न मिटेल,’ असं सांगितलं. सदाशिवला परमानंद झाला! दहावीला दिवाळीच्या सुट्टीत एके दिवशी सदाशिव वरोरा बसस्थानकावरनं एस. टी. पकडून थेट आनंदवनच्या गेटवर उतरला आणि तिथनं हातांच्या बळावर आत आनंदवनात आला. त्याची पहिली भेट झाली इंदूशी. इंदूने आपुलकीने त्याची विचारपूस केली आणि त्याला जेवायला वाढलं. त्याबद्दल सदाशिव म्हणतो, ‘‘गरिबीमुळे ताटात चारी ठाव पदार्थ कधी पाहायलाच न मिळालेल्या मला साधनाताईंच्या हातचं त्या दिवशीचं गरमागरम जेवण आजही तितकंच ताजेपणाने लक्षात आहे!’’ इंदूने सदाशिवविषयी बाबांच्या कानावर घातलं आणि बाबांनी सदाशिवला आनंदवनमध्ये ठेवून घेण्यास तात्काळ होकार दिला. १९७१ मध्ये सदाशिव चांगल्या गुणांनी दहावी झाला आणि आनंदवनात येऊन इथलाच झाला. त्यावेळी त्याची बाबांशी पहिल्यांदा भेट झाली. त्याचा पुढील शिक्षण घेण्यामागचा हेतू बाबांनी जाणून घेतला आणि मग म्हणाले, ‘‘ज्ञानासाठी शिक्षण जरूर घे. पण आत्मनिर्भरतेसाठी कोणतीतरी कलासुद्धा शिक. चौकटीतलं शिक्षण तुला नेहमी साथ देईलच असं नाही!’’ बाबांचं सांगणं शिरसावंद्य मानून सदाशिवने प्रेसमध्ये कंपोझिंग तसंच केनिंग वर्क शिकून घेतलं. सोबत आनंद निकेतन महाविद्यालयात बी.  ए.लाही प्रवेश घेतला.

bmc swimming pool marathi news
मुंबई महानगरपालिकेचे दहा तरण तलाव प्रशिक्षणासाठी खुले; २४ एप्रिलपासून ऑनलाईन नावनोंदणी, प्रशिक्षण कालावधी २१ दिवसांचा
master of human capital management and employee relations affiliated to mumbai and nagpur university
शिक्षणाची संधी : एचआर’मधील संधी
Aai Je Recruitment 2024 Under Airports Authority Of India Applications
AAI JE Recruitment 2024: भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत भरती; तब्बल ४९० जागांसाठी १ मेपर्यंत करता येणार अर्ज
women hostel building Nanded
नांदेडमधील महिला वसतिगृहाची वास्तू बनली भाजपचे प्रवेश केंद्र !

हरी मूळचा जळगाव जिल्ह्य़ातल्या हिंगोणे गावचा. वयाच्या सोळाव्या वर्षी कुष्ठरोगाचं निदान झालं आणि हरीचं आयुष्य विखुरलं गेलं. वर्षभर गावठी उपचार झाले, पण उतार पडला नाही. हाता-पायाच्या बोटांना येऊ  लागलेली विकृती, त्वचेची संवेदना नष्ट झाल्याने सतत होणाऱ्या जखमा यामुळे हरी गांजून गेला. सख्खे- चुलत नातेवाईक तिरस्कार करू लागले. हरीच्या असहाय वडिलांनी अखेर नववीत शिकत असलेल्या आपल्या मुलाचं नाव शाळेतून काढलं. अमरावतीला कुष्ठरोगावर उपचार होतात असं त्यांना कळलं होतं. सुदैवाने हरीचे काकाही अमरावतीलाच नोकरीसाठी होते. वडील हरीला घेऊन अमरावतीला आले आणि काकाने त्याला उपचारांसाठी अमरावतीजवळील तपोवन इथल्या जगदंबा कुष्ठधामात भरती केलं. धडपडय़ा हरीने तिथे उपचार घेता घेता दहावीपर्यंतचं शिक्षणही पूर्ण केलं आणि प्री-डिग्रीसाठी नागपूरच्या धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये दाखला घेतला. वर्षभरात तेही शिक्षण पूर्ण केलं आणि जून ७१ मध्ये नागपूरच्या एका वकिलांच्या परिचयातून तो आनंदवनात आला. शिक्षणाची अदम्य इच्छा असलेल्या हरीनेही आल्या आल्या आनंद निकेतन महाविद्यालयात आर्टस्ला प्रवेश घेतला.

१९७२ चा एप्रिल उजाडला होता. आनंदवनातील कामं पार पाडता पाडता सदाशिव आणि हरीचं शिक्षण सुरू होतं. संधीनिकेतन केंद्राबद्दल अधिकाधिक अपंगांना माहिती झाली तरच प्रशिक्षणासाठी दाखल होणाऱ्यांचा टक्का वाढू शकेल असं आम्हाला जाणवू लागलं. मग वरोरा तालुक्यातील बहुविध अपंगत्व असलेल्या व्यक्तींचं सर्वेक्षण करायची जबाबदारी सदाशिव आणि हरी या दोघांकडे दिली गेली. त्याचं कारण होतं.. सदाशिव अपंग, तर हरी कुष्ठमुक्त. त्यामुळे अपंगांच्या विश्वाशी हे दोघं निगडित होतेच. १९७२ च्या उन्हाळ्यात या जोडगोळीने तब्बल महिना- दीड महिना बैलगाडीने फिरत ३३ खेडी पिंजून काढली. इंदूने भल्या पहाटे करून दिलेला जेवणाचा डबा घेऊन हे दोघं जे बाहेर पडत ते थेट रात्रीच आनंदवनात परतत. खेडय़ात कुष्ठरुग्ण, अपंग किती, त्यांच्या अपंगत्वाचा प्रकार, उपजीविकेची साधनं अशी सर्व माहिती या दोघांनी गोळा केली. या सव्‍‌र्हेदरम्यान या दोघांनी कुष्ठरोगाबद्दल असलेले लोकांचे गैरसमज दूर करण्याचाही जीव तोडून प्रयत्न केला. तरी गावातील अपंग तरुणांना व्यवसाय प्रशिक्षणासाठी आनंदवनात पाठवण्यास मात्र कुणी राजी होत नव्हतं. सदाशिव एक आठवण सांगतो. एका अपंग मुलाचे पालक सदाशिवला म्हणाले, ‘‘घरच्या कुत्र्याला खायला घालणं आम्हाला जमतं, तर आम्ही आमच्या अपंग मुलाच्या पोटाला नक्कीच घालू शकतो.’’ आता यावर ही जोडगोळी काय बोलणार? फार मोठय़ा कष्टाने या दोघांनी एका गावच्या एका तरुणाचं प्रशिक्षण घेण्यासाठी मन वळवलं. त्यानंतर थोडय़ाच दिवसांत आणखी एक मुलगा आनंदवनात आला. सर्वेक्षणानंतर प्रशिक्षणासाठी दाखल होणाऱ्या अपंगांचं प्रमाण सुरुवातीला अल्प असलं तरी यामुळे संधीनिकेतन प्रवृत्ती गावोगावी रुजण्यास खूप मदत झाली. जिल्हा प्रशासनाशीही संधीनिकेतनसंदर्भात बाबांनी बराच पत्रव्यवहार केला. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी या उपक्रमाचं महत्त्व जाणत संधीनिकेतनची माहिती जिल्ह्यतील अपंग व्यक्तींपर्यंत पोहोचविण्यात बरंच सहकार्य केलं. अशा रीतीने संधीनिकेतनमध्ये दाखल होणाऱ्या अपंग व्यक्तींचा टक्का हळूहळू वाढू लागला.

१९७४  च्या मध्यात संधीनिकेतनमध्ये दाखल झालेल्या प्रशिक्षणार्थीची संख्या २३ च्या घरात पोहोचली होती. सुरुवातीला शिवणकला, मुद्रण आणि केनिंग या तीन प्रवृत्तींमध्ये प्रशिक्षण दिलं जायचं. ऑर्थर तार्नोवस्की संधीनिकेतनच्या प्रगतीबद्दल खूप समाधानी होते. वर्षांतून किमान दोन वेळा ते इंग्लंडमधून आनंदवनाला येत, संधीनिकेतनची वाटचाल जाणून घेत.. आणि संधीनिकेतनच नव्हे, तर आनंदवनाच्या पुढील विकास योजनांकरिता सहकार्य मिळवण्यासाठी जगभर अनेकांशी पत्रव्यवहार करत. बाबांनी संधीनिकेतनच्या विस्ताराबाबत सहकार्यासाठी Canadian International Development Agency (CIDA) कडे एक योजना सादर केली होती. त्यावर उकऊअ ने महारोगी सेवा समितीच्या अपंगांच्या क्षेत्रातील कामाविषयी माहिती गोळा करून अभिप्राय सादर करण्याची जबाबदारी नवी दिल्लीस्थित ‘इंडियन सोशल इन्स्टिटय़ूट’ या संस्थेकडे दिली होती. त्या संस्थेच्या सहसंचालकांना ऑर्थर यांनी २१ डिसेंबर १९७४ रोजी आनंदवनातून एक पत्र लिहिलं आणि त्यात संधीनिकेतनच्या प्रगतीविषयी माहिती कळवताना त्यांनी म्हटलं होतं.. ‘‘अपुरा निधी आणि इतर प्रश्न पुढे उभे असतानाही गेल्या दोन वर्षांतली संधीनिकेतनची प्रगती वाखाणण्याजोगी आहे. आज इथे २३ अपंग प्रशिक्षणार्थी आहेत. आणि याआधी बरेचसे प्रशिक्षण घेऊन बाहेरही पडलेत. त्यांच्यातला प्रत्येकजण आपापल्या गावी परतून स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आपलं भविष्य घडवतो आहे. आनंदवनापासून ४० मैलांवर असलेल्या एका खेडय़ात मी जाऊन आलो. तिथे मला संधीनिकेतनमध्ये शिवणकाम शिकलेला एक वैद्य नावाचा प्रशिक्षणार्थी भेटला. मी त्याची चौकशी केली तेव्हा तो मला म्हणाला, ‘‘संधीनिकेतनमध्ये दाखल होण्यापूर्वीचं माझं आयुष्य खूपच विदारक अनुभवांनी भरलेलं होतं. नातेवाईकांकडून मिळणारी हिणकस वागणूक, समाजाचा तिरस्कार, टिंगलटवाळी सहन करतच मी लहानाचा मोठा झालो. पण आज मी गावातला एक यशस्वी टेलर आहे. मी स्वकमाईमधून स्वत:चं पोट भरतो आहेच; शिवाय माझ्या आजारी असलेल्या लहान बहिणीचा सांभाळही करतो आहे.’’ वैद्य पुढे म्हणाला, ‘‘आता मला मोठं घर बांधायचं आहे आणि लवकरच रेडीमेड कपडय़ांचं दुकानही मी सुरू करणार आहे.’’

वैद्य याच्यासारखी अनेक अपंग माणसं प्रशिक्षित होत बाहेर पडू लागली आणि संधीनिकेतन आकाराला येऊ  लागलं. आनंदवनात जे जे नवे उद्योग सुरू झाले ते सर्व संधीनिकेतनशी जोडले जाऊ  लागले आणि त्यांचं प्रशिक्षणही इथे दिलं जाऊ  लागलं. एव्हाना हरीने आणि सदाशिवने आनंद निकेतन महाविद्यालयातून यशस्वीरीत्या बी. ए. पूर्ण केलं. शिक्षण संपल्यानंतर बाबांनी हरीला कार्यकर्ता म्हणून शंकरभाऊ- सिंधूमावशीच्या मदतीला सोमनाथला पाठवलं. सदाशिवकडे १९७५ मध्ये संधीनिकेतनच्या ‘सुपरवायझर’पदाची जबाबदारी दिली गेली. आणि संधीनिकेतनच्या पहिल्या तुकडीत दाखल झालेला प्रशिक्षणार्थी ते सुपरवायझर हे एक वर्तुळ पूर्ण झालं. पण ही तर सुरुवात होती. आपल्या अपंगत्वावर दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर मात करत त्याने स्वत:च्या यशस्वी जीवनाचा पाया तर रचलाच; सोबत आपल्यासारख्या इतर अनेक वंचित अपंग बांधवांच्या आयुष्यातील सामाजिक न्यायाची प्रकाशवाटही त्याने उजळ केली. कालौघात महाराष्ट्र सरकारच्या समाजकल्याण विभागाकडून संधीनिकेतनला मान्यता मिळाली आणि नंतर अनुदान प्राप्त होऊ  लागलं. बाबा म्हणत, ‘अपंगत्व शारीरिक असतं. ते मानसिक होता कामा नये.’ याच आदर्शवादी शिकवणीतून सदाशिवसारख्या अनेक अपंग बांधवांच्या आयुष्याचे अर्थ संधीनिकेतनने बदलून टाकले.

संधीनिकेतन म्हणजे ऑर्थर तार्नोवस्की यांच्या आयुष्याचं स्वप्न! आणि भर उन्हात बैलगाडी हाकत गावोगाव फिरून सदाशिव आणि हरीने केलेलं अपंगांचं सर्वेक्षण हेच त्या स्वप्नाच्या पायाभरणीतलं पहिलं पाऊल! अपंगांना व्यवसाय प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर करण्याच्या या स्वप्नाचं क्षितीज पुढे आनंदवनात अपंगांच्या पुनर्वसनापर्यंत विस्तारत गेलं आणि बहुविध अपंगत्व असलेल्या व्यक्तींचं ‘हिम्मतग्राम’ (Village of Valiants) नावाचं हक्काचं गावच आनंदवनात निर्माण झालं!

विकास आमटे vikasamte@gmail.com