डॉ. रोहिणी पटवर्धन – rohinipatwardhan@gmail.com

प्रत्येकाने आयुष्यात पुढे येणाऱ्या अपरिहार्य अशा शेवटाचा जाणीवपूर्वक विचार करायला हवा. त्यासाठी वैद्यकीय इच्छापत्र किंवा लिव्हिंग विल महत्त्वाचं. अगदी शेवटच्या टप्प्यावर कोणत्या मर्यादेपर्यंत वैद्यकीय उपचार केले जावेत, रुग्णालयात लोळत, गोळत, विकलांग अवस्थेत पडून राहणे नको असेल तर वैद्यकीय इच्छापत्राचा जरूर विचार केला पाहिजे.

IAS officer awanish sharan share mpsc examination preparation tip
“इतकंही कठीण नाही” UPSC क्रॅक करण्यासाठी नक्की किती वेळ अभ्यास करावा? खुद्द प्रसिद्ध IAS नं दिल्या टिप्स
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
balmaifal story for kids why we celebrate gudi padwa as a new marathi year
बालमैफल: नवचैतन्याचा पाडवा
english medium schools in pune advertising on social media to attract students
पुणे: इंग्रजी शाळांवर समाजमाध्यमांत जाहिराती करण्याची वेळ… नेमके झाले काय?

आपण जगतो म्हणजे नेमकं काय करतो?

आपल्या इच्छेनुसार आपण पंचेंद्रियांनी सर्व अनुभव घेतो. ऐकतो, वाचतो, खातो, झोपतो.. या प्रत्येकाची नोंद आपल्या मेंदूमध्ये होत असते आणि त्या त्या क्रियेचा आनंद आपल्याला अनुभवायला मिळत असतो. त्या प्रक्रियेला शक्ती पुरवण्याचं काम आपलं हृदय करीत असतं. भावना हृदयापर्यंत पोचते म्हणजे खरं तर मेंदूपर्यंत पोचते, असंच म्हणायला हवं. हृदय शक्ती पुरवायला सक्षम आहे, तयार आहे, पण ती शक्ती घ्यायला मेंदूमध्ये क्षमता नाही असं झालं तर? अशी वेळ येणं म्हणजे भावनिकरीत्या मृत पण शारीरिक पातळीवर जिवंत- अशी स्थिती याला जगणं म्हणायचं कसं?

त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे आपण जिवंत आहोत हे आपल्या स्वत:लाही कळणार कसं? कारण कळविणारा मेंदू निकामी झालेला असतो. अशा वेळी सुरू होतो आपल्याच मुलांचा, आपल्या माणसांचा, शेवट माहिती नसलेल्या औषधोपचारांचा प्रवास! उपचार करीत राहणं- करीत राहणं हाच एक मार्ग राहतो. कारण उपचार थांबवणं म्हणजे आपण आपल्याच हाताने त्यांचा शेवट होण्यासाठी कारणीभूत होणं. तसं केलं तर मनात अपराधीपणाची भावना निर्माण होते, ती जन्मभर सलत राहते. मुलांच्या सुखासाठी आपण आयुष्यभर झटतो. त्यांना आर्थिक, मानसिक आणि शारीरिकसुद्धा त्रासात आपण आपल्या नकळत लोटत असतो. कारण आपणच आपल्या आयुष्याचा, आपल्या पुढच्या येणाऱ्या अपरिहार्य अशा शेवटाचा जाणीवपूर्वक विचार करीत नाही. हे थांबवण्याचा, घडू न देण्याचा मार्ग म्हणजे वैद्यकीय इच्छापत्र किंवा लिव्हिंग विल (’living will’’). त्यासाठी आपण आपल्या सर्व क्षमता शाबूत असताना आपल्यावर कोणत्या मर्यादेपर्यंत वैद्यकीय उपचार केले जावेत, बरे न होण्यासारखं दुखणं झालंच तर रुग्णालयात दाखल करावं अथवा नाही याबाबत विचार केला पाहिजे आणि जर का आपल्याला असं वाटत असेल की, रुग्णालयात लोळत, गोळत, विकलांग अवस्थेत पडून राहणं नको असेल तर मग आपण वैद्यकीय इच्छापत्राचा जरूर विचार केला पाहिजे.

येथे हे प्रथम लक्षात घेतलं पाहिजे की, वैद्यकीय इच्छापत्र आणि इच्छामरण या दोन स्वतंत्र वेगळ्या पातळीवरच्या गोष्टी आहेत. दोन्हीचं अंतिम ध्येय ‘मृत्यू’ असलं तरी वैद्यकीय इच्छापत्र हे शारीरिक असमर्थता आली तर मृत्यूबद्दलचा निर्णय घेण्यासंदर्भात केलं जातं, तर इच्छामरण हे जगण्यातली अर्थहीनता लक्षात आल्यामुळे कधी शरीर ठीकठाक असतानाही केलं जातं. इच्छामरणाची चळवळ ही खूप वर्षांपासून ‘टू डाय विथ डिग्निटी’ या संस्थेच्या माध्यमातून सुरू केली होती. व्यक्तीला आपलं जीवन संपवायचं असेल तर हिंदू सांस्कृतिक संदर्भानुसार ‘प्रायोपवेशन’ आणि जैन धर्मामध्ये ‘संथारा’ यासारखे  मार्ग सुचविलेले आहेत आणि असे निर्णय घेतलेल्या व्यक्तीही आढळतात. श्री शंकराचार्य, ज्ञानेश्वर महाराज, रामदास स्वामी या संतांबरोबरच वि. दा. सावरकर, विनोबा भावे, गोपाळराव मंडलिक हे आणि यांच्यासारख्या विचारी व्यक्ती इच्छामरणाचा स्वीकार करण्यासाठी पुढे आलेल्या दिसून येतात.

सर्वसामान्य माणसाला तितकी झेप घेणं थोडं अवघड आहे, पण म्हणूनच निदान ‘वैद्यकीय इच्छापत्र’ या संकल्पनेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायची आवश्यकता निश्चितच आहे. अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर १० मार्च २०१८ ला सर्वोच्च न्यायालयाने ‘पॅसिव्ह युथनेशिया’ला मान्यता दिली. म्हणजेच एक प्रकारे वैद्यकीय इच्छापत्राला मान्यता दिली.

युथनेशिया हा मूळ ग्रीक शब्द आहे. त्याचा अर्थ ‘चांगलं मरण’ असा आहे. याचे दोन प्रकार मानले जातात. पहिला प्रकार अ‍ॅक्टिव्ह युथनेशिया. यामध्ये गंभीर, न बरा होणारा, वेदनादायी आजार झाला तर त्या व्यक्तीला जीवन संपवण्यासाठी औषध दिलं जातं. पॅसिव्ह युथनेशियामध्ये जेव्हा उपचारांचा उपयोग होणार नाही असं स्पष्ट होतं तेव्हा कृत्रिम उपाय, अथवा औषधोपचार थांबवले जातात. त्यानंतर व्यक्ती नैसर्गिकरीत्या मृत पावते. असे उपचार थांबवले जावेत यासाठी त्या व्यक्तीने किंवा ती व्यक्ती असे निर्णय घेण्यास असमर्थ असली तर तिच्या वतीने तिच्या जवळच्या नातेवाईकाने उपचार थांबवा, असं सांगणं आवश्यक असतं. त्या व्यक्तीला तो निर्णय घेताना अपराधी वाटू नये आणि एखाद्या व्यक्तीच्या मनाविरुद्ध असा निर्णय कोणी घेऊ नये यासाठी वैद्यकीय इच्छापत्र अत्यावश्यक असतं.

कोणतीही १८ वर्षांपेक्षा जास्त वयाची मानसिकदृष्टय़ा सक्षम असणारी व्यक्ती वैद्यकीय इच्छापत्र करू शकते. ते कोणत्याही दबावाखाली न येता संपूर्णपणे त्या व्यक्तीने आपणहून केलेलं असावं. लेखी स्वरूपात असावं. त्यामध्ये कोणत्या परिस्थितीमध्ये चालू केलेले उपचार थांबवावेत किंवा कोणत्या प्रकारचे केले जाऊ नयेत अथवा रुग्णालयात दाखल करू नये याबद्दल स्पष्ट उल्लेख असावा. त्यावर आपल्यापेक्षा लहान वयाच्या दोन व्यक्तींच्या साक्षीदार म्हणून सह्य़ा असाव्यात. सगळ्यात महत्त्वाचा भाग असा की, हा निर्णय प्रत्यक्षात आणण्याच्या वेळी वैद्यकीय इच्छापत्र करणारी व्यक्ती तो निर्णय देण्याच्या परिस्थितीत असेलच असं नाही हे लक्षात घेऊन आपल्या जवळच्या विश्वासाच्या व्यक्तीचं नाव त्यात लिहावं की ती व्यक्ती आपल्या वैद्यकीय इच्छापत्रातील व्यवस्था करण्यासाठी अधिकृत व्यक्ती असेल.

वैद्यकीय इच्छापत्र करताना आणि केल्यानंतरही जे जे म्हणून आपल्याशी संबंधित लोक आहेत, मग ते जवळचे नातेवाईक, आपली मुलं, नातवंडं, मित्रमंडळ सर्वाना आपण असं इच्छापत्र केलं आहे याची स्पष्ट कल्पना द्यायलाच हवी. कारण हा निर्णय घ्यायची जेव्हा वेळ येते त्या वेळी त्या व्यक्तीच्या मनाची स्थिती अत्यंत नाजूक, मानसिक ताणयुक्त असते. निर्णय घेताना एखादी जरी व्यक्ती विपरीत बोलली तर त्या व्यक्तीला आयुष्यभर त्रास होत राहतो. कधी कधी ते फार गंभीर रूप धारण करते. हा निर्णय घेताना इतरांनी भावनिक आधार देणं गरजेचंच आहे.

कधी कधी वैद्यकीय इच्छापत्र केलेलं नसलं तरीही डॉक्टर जवळच्या नातेवाईकांना त्यांच्या प्रकृतीसंदर्भात माहिती देतात आणि मग निर्णय त्या व्यक्ती घेतात. अशा वेळी तर सर्वाचा भावनिक आधार त्या व्यक्तीला बळ पुरवू शकतो.

मार्च २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने बिल पास केले खरे, पण ते प्रत्यक्षात आणण्यासाठीच्या अटी इतक्या मोठय़ा आणि इतक्या विचित्र आहेत की, त्याचा प्रत्यक्षात काहीच फायदा नाही. फक्त इतकंच समाधान, की वैद्यकीय इच्छापत्र करता येतं हे मान्य झालं.

प्रत्यक्षात मात्र वैद्यकीय इच्छापत्र प्रत्यक्षात आणण्यासाठी रुग्ण, डॉक्टर आणि त्यांचे जवळचे नातेवाईक यांच्या परस्परसामंजस्याचा उपयोग होतो आणि वैद्यकीय इच्छापत्र केलं असल्याने अपराधीपणाची भावना न येता निर्णय घेता येतो.

वैद्यकीय इच्छापत्र समजून घेणं, करणं आणि प्रत्यक्षात येणं हा खूप मोठा आवाका असलेला विषय आहे. (एकूणच ‘मृत्यू’ या विषयावर खूप ऊहापोह होण्याची आवश्यकता आहे.)

माझ्याकडे लिहिण्यासाठी विषय खूप आणि २०१८ या वर्षांमध्ये आता फक्त ५ लेख बाकी आहेत, त्यामुळे भावनिकदृष्टय़ा का आणि कसा वैद्यकीय इच्छापत्राचा विचार करावा हे लक्षात यावं या दृष्टीने हा लेख लिहिला आहे. प्रत्यक्षात यावर स्वतंत्र परिषद घेण्याची गरज आहे. प्रागतिक विचाराच्या महाराष्ट्रामध्ये या विषयावर विचार करणारे अनेक विचारवंत आहेत. पुण्यात ‘एड ऑफ लाइफ ग्रुप’ या प्रकारच्या परिषदा घेतो. या लेखासाठी संदर्भ म्हणून वापरलेली निवडक पुस्तकं आणि वृत्तपत्रं याची यादी देत आहे. वाचकांना त्याचा निश्चित उपयोग होईल.

१) जगायचीही सक्ती आहे – ले. – मंगला आठलेकर- राजहंस प्रकाशन

२) अटळ दु:खाला सामोरे जाताना – ले. – संज्योत देशपांडे

३) वार्धक्य विचार लेखक – मंगला गोडबोले – उन्मेष प्रकाशन

४) वृद्धांसाठी निवडीचा अधिकार – ले. –  विनायक लिमये – शब्द प्रकाशन

५) ‘सन्मान इच्छामरणाचा’ परिसंवाद पुणे, मुंबई, नागपूर.

६) ‘आपल्यासाठी आपणच’ आणि ‘आनंदस्वर ज्येष्ठांसाठी’ या दोन्ही पुस्तकांमध्ये वैद्यकीय इच्छापत्रासंबंधात वेगवेगळ्या दृष्टिकोनातून लिहिलेले लेख आहेत.

७) बिइंग मॉर्टल – ले. – अतुल गवांदे –  प्रकाशक – मेट्रोपोलिटन बुक्स.

या शिवाय मराठी, इंग्रजी वर्तमानपत्रातूनही याविषयीचे लेख प्रसिद्ध झाले आहेत.

chaturang@expressindia.com