‘‘इतक्या वर्षांमध्ये आम्हा दोघांचं व्यावसायिक, सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्य एकच झालं आहे.’’ सांगताहेत प्रीती पाटकर – प्रवीण पाटकर. समान सामाजिक जाणिवा, एकमेकांबद्दल प्रेम, आदर आणि त्याच्या आधारावर एकमेकांच्या साथीने त्यांनी समाजातल्या ‘नकोशा’ वर्गात जाणीवजागृती आणली आणि अनेक आयुष्यं मार्गी लावली..

समान सामाजिक जाणिवा, एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर आणि त्याच्या आधारावर एकमेकांच्या साथीने केलेली वाटचाल.. प्रीती आणि प्रवीण पाटकर यांच्या वैवाहिक आयुष्याचा प्रवास अशाच पद्धतीने झाला आहे. मुंबईतल्या ‘टाटा इन्स्टिटय़ूट फॉर सोशल सायन्स’मध्ये प्रवीण पाटकर प्राध्यापक होते तर प्रीती विद्यार्थिनी म्हणून समाजकार्याचे धडे घ्यायला आल्या होत्या. हा कालावधी १९८६चा. महाराष्ट्रात रोजगार हमी योजना सुरू होती आणि त्यासंबंधीच्या एका प्रकल्पावर दोघांनी सर्वप्रथम एकत्र काम केलं. त्यापूर्वी १९८३ पासून प्रवीण यांनी रायगड जिल्ह्यतील आदिवासी कातकरी समाजासाठी काम सुरू केलं. त्या वेळी अनेकजण स्वयंसेवक म्हणून काम करत होते, त्यामध्ये प्रीती यांचाही समावेश होता. त्या कालावधीबद्दल प्रवीण पाटकर सांगतात की, ‘‘रायगडबरोबरच रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणातल्या जिल्ह्यंमध्ये हंगामी स्थलांतरीत आदिवासींचं मोठय़ा प्रमाणात शोषण होत असे, वेठबिगारीसाठी मानवी वाहतूक होत होती, त्यांच्या मुलांचे हाल होत होते. कोकणात लाकडी कोळसा बनवण्याच्या बेकायदेशीर उद्योगांमुळे जंगल व शेतजमिनींचे अतोनात नुकसान होत होते. झाडं तोडल्यामुळे नद्यांना पूर येणं, जमिनीची सुपीकता कमी होणं अशा प्रचंड समस्या होत्या आणि खूप काम करावं लागणार होतं. मी तिथे माणसांचं आणि डोंगरांच्या पुनर्वसनाचं काम हाती घेतलं.’’

loksatta editorial pm narendra modi controversial statement on muslim community
­­­­अग्रलेख : पंतप्रधानांचे आभार माना!
The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

प्रवीण पाटकर यांनी रायगडात एकीकडे माणूस आणि निसर्ग यांच्यात तुटलेला दुवा पुन्हा सांधण्याचा प्रयत्न सुरू केला होता. त्याच वेळी मुंबईत दुसरी कामंही सुरू झाली होती, त्याबद्दल प्रीती आणि प्रवीण यांनी दिलेली माहिती कोणाही सर्वसामान्य माणसाच्या अंगावर काटा आणणारी आहे. ‘‘१९८६मध्ये आम्ही कामाठीपुरा महापालिकेच्या शाळेत शालेय समाजकार्य प्रकल्पानिमित्ताने वेश्यावस्तीत फिरत होतो. त्या वेळी तिथले भीषण वास्तव समोर आले. तिथला परिसर म्हणजे लालबत्ती विभाग आणि शाळेत येणारे विद्यार्थी यांची संगती जुळत नव्हती. विद्यार्थी दुसऱ्या ठिकाणांहून येत होते. या भागात मोठय़ा प्रमाणात देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया राहत होत्या. त्यांची मुलं शाळेत येतच नव्हती. या स्त्रिया बेघर असतात. कुंटणखाना ही व्यवसायाची जागा असते. ते घर नसतं, त्यामुळे त्यात स्वयंपाकाचा कोपरा नसतो. जेवण बाहेरूनच मागवलं जायचं. या मुलांना झोपण्यासाठी हक्काची जागा नसायची. आईकडे गिऱ्हाईक आलेलं असताना लहान मुलांना पलंगाखाली झोपवलं जायचं. मूल थोडं मोठं व्हायला लागलं की त्याची रवानगी बाहेर व्हायची. बाहेर दुकानांच्या पायऱ्यांवर किंवा अशीच कुठे तरी ही मुलं झोपायची. घरपण हा प्रकार नव्हताच. मुलांचे होणारे हाल पाहणंही त्रासदायक होतं. आम्ही त्या मुलांशी बोलायला सुरुवात केली. त्यांच्याशी खेळायला लागलो. त्यांच्या गप्पांमधून त्यांचं जग उलगडत होतं. १३-१४ वर्षांची होईपर्यंत ही मुलं इथे राहायची. नंतर नाहीशी व्हायची, शक्यतो कुठे तरी गुन्हेगारी विश्वात सामावली जायची, जी मुलं इथेच राहायची ती गिऱ्हाईकांसाठी पान, दारू, ड्रग्ज, सिगारेट आणून देण्यासारखी कामं करायची, त्यांच्यासाठी ब्लू फिल्म लावायची, स्वत: व्यसनं करायची, ड्रग्जमध्ये अडकायची. मुली असतील तर त्यांना धंद्यासाठी तयार केलं जायचं. १०-१२ वर्षांच्या मुलींना धंद्याला लावलं जायचं. मुलांचाही वापर समलैंगिक देहबाजारासाठी केला जायचा. या मुलांना वडिलांचं नाव नसायचं. वडिलांचं नाव नाही म्हणून शाळेत प्रवेश मिळायचा नाही. या धंद्याला व्यवसाय म्हणून मान्यता नसल्याने बँका खातंही उघडू द्यायच्या नाहीत, कर्ज मिळणं तर दूरचीच गोष्ट. त्यामुळे स्त्रियांचा बचतीचा पैसा दलालांच्या नाहीतर घरवाल्यांच्या हातात असायचा. राहत्या जागेचा पुरावा नसल्यानं रेशनकार्ड मिळायचं नाही. या देशाचे नागरिक म्हणून साधे-साधे हक्कही नाकारले जात असत. हे सगळं खूप धक्कादायक होतं. या मुलांना अन्य बालकांप्रमाणे संरक्षण, हक्क व विकासाची संधी मिळवून दिली पाहिजे हा विचार आला आणि काम सुरू केलं. ‘प्रेरणा’ संस्था त्यातूनच सुरू झाली.’’

कामाठीपुऱ्यातलं हे भयाण, नग्न सत्य पचवणं अवघड असलं तरी त्यावर मात करणं अशक्य नाही हे प्रवीण आणि प्रीती यांनी ठामपणे ठरवलं होतं. या आणि अशा कामात साथ देण्याचा निर्णय घेतानाच, आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचा निर्णयही दोघांनी घेतला आणि १९८८ मध्ये दोघांचा विवाह झाला. ‘‘इतक्या वर्षांमध्ये आम्हा दोघांचं व्यावसायिक, सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्य एकच झालं आहे. लग्नानंतर सुरुवातीला आम्ही दोघांनीच राहण्याचा निर्णय घेतला. तेव्हा खूप काम असायचं. बाहेर आणि घरातही आम्हाला ओव्हरटाइम करावा लागायचा आणि हे आपणच करायचं असं आम्ही ठरवलं होतं. १९९० मध्ये मुलाचा – प्रथमचा- जन्म झाला आणि १९९२ मध्ये मुलीचा. तिचं नाव प्रार्थना ठेवलं. मुलं लहान असताना आम्ही त्यांना पाळणाघरात ठेवायचो. त्याबद्दल अपराधी वाटून घेतलं नाही. मुख्य म्हणजे दोघांच्याही आई-वडिलांना फक्त मुलं सांभाळायला म्हणून बोलवायचं नाही असं आम्ही पक्क ठरवलं होतं. आमच्या कामाच्या वेळा विचित्र होत्या, त्यामुळे अनेकदा नोकरमंडळींबरोबर जुळवून घेणंही शक्य व्हायचं नाही, पण त्याचा आम्हाला फारसा त्रास झाला नाही. कारण आम्हा दोघांनाही घरकामाचीही आवड आहे. घर स्वच्छ ठेवण्यात आमचा दोघांचाही सहभाग असतो. दोघांनाही स्वयंपाकाची आवड आहे. घराची साफसफाई करतानाच आमचा ताण हलका होतो,’’ प्रीती पाटकर सांगतात.

‘‘प्रीतीनं कधीच नोकरी केली नाही. घरासाठी कमाई करण्याची जबाबदारी मी घेतली होती. मी १९७५ पासून नोकरी करतच होतो. १९९५ पर्यंत मी ‘टिआयएसएस’मध्ये प्राध्यापकी केली. वीस वर्षांच्या सेवेत एकदाही एलटीए घेतला नाही, कारण सुट्टीच घेतली नाही. त्या वेळीही नोकरी करून उरलेल्या वेळेमध्ये माझं काम सुरू होतं. रायगड जिल्ह्यत पुनर्वसनाच्या कामाचा भाग म्हणून पेणमध्ये १९८६ पासून आदिवासी आश्रमशाळा चालवत होतो, २६ वर्षांनंतर ती दुसऱ्यांकडे हस्तांतरित केली. शाळेत जवळपास ४५०-५०० निवासी मुलं शिकतात, या शाळेचा दहावीचा निकाल आजही ९५ ते १०० टक्के लागतो. विशेषत: खेळांमध्ये ही मुलं आघाडीवर असतात. अनेक स्पर्धामध्ये त्यांनी अजिंक्यपदं मिळवली आहेत. ही आश्रमशाळा असो किंवा कामाठीपुऱ्यात मुलांसाठी चालवलेल्या संस्था असो आमचा दृष्टिकोन स्वच्छ आहे. मुलं प्रौढ होईपर्यंत ती समाजाची व शासनाची जबाबदारी असतात. आणि उपेक्षित, वंचित मुलांना तर समाजाने भरभरून दिलं पाहिजे,’’ प्रवीण पाटकर आपली भूमिका स्पष्ट करतात. ‘‘कामाठीपुरा आणि फॉकलंड रोड या परिसरातल्या मुलांमध्ये आणखी एक समस्या मोठी होती, आरोग्याची. अनेक मुलं जन्मत: एचआयव्ही पॉझिटिव्ह असायची. एकदा एड्स झाला की त्यांना वाचवता येत नाही, अशा मुलांना वाचवण्यासाठी काम केलं, पण अनेक मुलं दगावली. तेव्हा आईकडून गर्भातील मुलांना एचआयव्हीची लागण होऊ  नये यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याला बऱ्यापैकी यशही मिळालं.

कामाठीपुऱ्याच्या कामाबद्दल प्रीती अधिक माहिती देताना सांगतात की, ‘‘जगभरात मुलांच्या हक्कांबद्दल बोललं जातं. इथली मुलं तर जणू काही अदृश्य होती, समाजाला दिसतच नव्हती. त्यांच्याबद्दल चर्चा होत नसे आणि विशेष म्हणजे ही चौकट मोडायला, नवीन व्यवस्था तयार करायला तथाकथित सभ्य समाजाचाच विरोध होता. पोलिसांचाही सुरुवातीला फारसा सकारात्मक प्रतिसाद नव्हता. ‘तुम्ही वेश्या व्यवसायाला प्रोत्साहन देत आहात,’ असे आरोपही आमच्यावर झाले. पण आमचा संवादावर विश्वास होता. क्रांती आपणच घडवायची असते आणि तुकडय़ातुकडय़ातूनच यंत्रणा बदलत असते. सगळी कामं शासन व पोलिसांवर सोपवून चालत नाही. आम्ही विरोध करणाऱ्या लोकांशी भांडलो नाही, उलट त्यांच्याशी सतत संवाद साधत राहिलो. लोक वाईट नसतात, तर त्यांनी कधी या गोष्टींचा विचारच केलेला नसतो, त्यामुळे ते विरोध करत असतात. पण त्यांना या सगळ्या गोष्टी हळूहळू लक्षात येऊ  लागल्या आणि आम्हाला आमच्या कामात पाठिंबाही मिळायला लागला. विशेषत: पोलिसांच्या दृष्टिकोनात खूप सकारात्मक बदल झाला आहे. आतापर्यंत आम्ही कामाच्या निमित्तानं हजारो शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांना भेटलो आहोत, त्यांना त्यांची मुलं या दलदलीतून बाहेर पडायला हवी असतात, त्यांच्या मुलांसाठी ‘इज्जत की जिंदगी’ हवी असते. ते देण्याचा प्रयत्न आपण समाजानेच केला पाहिजे.’’

कामाठीपुऱ्यात लहान मुलांवर, विशेषत: मुलींवर होणारे अत्याचार पाहिले तर भल्याभल्यांची झोप उडाल्याशिवाय राहणार नाही. या मुलांच्या पुनर्वसनासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल प्रीती आणि प्रवीण सांगतात की, ‘‘या मुलांसाठी अनेक सेवा सुरू केल्या. इतर ठिकाणी दिवसा पाळणाघरं असतात, पण इथं रात्रीच्या पाळणाघरांची गरज होती. त्यामुळे आम्ही रात्री पाळणाघर सुरू केलं. (रात्री चालणारं हे जगातलं पहिलं पाळणाघर ठरलं.) मग या स्त्रियांनी हळूहळू त्यांच्या मुलांना शाळेत पाठवायला सुरुवात केली. ही मुलं शाळेत रुळण्यासाठी ‘एज्युकेशन सपोर्ट प्रोग्राम’ सुरू केला. मुलांना आईपासून तोडायचं नाही, पण त्यांना धोका असेल तर आश्रयगृहांमध्ये ठेवण्याची सोय करण्यात आली. बाबा आमटेंनी आमचं काम पाहिलं. त्यांनी पहिल्याच टप्प्यात काही मुलं चंद्रपूरला आनंदवनात स्वीकारली. आमच्या कामाला मिळालेली ही मोठी पावती होती. या प्रश्नाच्या जनजागृतीसाठी देशभरात, दक्षिण आशियात व नंतर जगभर फिरलो, लोकांसमोर हा प्रश्न मांडला. धोरणात्मक बदलांसाठी प्रयत्न केले. या कामात यश येऊन केंद्र सरकारच्या मानवी वाहतुकीला प्रतिबंध घालणाऱ्या कायद्याच्या आखणीसाठीही योगदान दिलं. त्याबरोबर सार्क आणि युनायटेड नेशन्ससारख्या संस्थांनीही आमच्या भूमिकांना सातत्यानं व्यासपीठ दिलं आहे.’’

कामाचं स्वरूपच असं होतं की ताण येणं अपरिहार्य असायचं. आता त्याची सवय झाली असली तरी सुरुवातीच्या काळात अनेक प्रतिकूल अनुभवांनाही सामोरं जावं लागलंच. त्या तणावावर मात करण्यासाठी अधिकाधिक काम करत राहणं हाच उपाय होता. दोघांनी आपलं सहजीवनही त्या पद्धतीनंच आखून घेतलं. ‘‘मुलांबरोबर वेळ घालवणं, त्यांना भरपूर आणि चांगला वेळ देणं, जेवण करणं, आवडीनं त्यांचे डबे भरणं, यातून आम्हाला भरपूर आनंद मिळतो. आता मुलं मोठी झाली आहेत आणि आपापल्या करिअरमध्ये प्रगती करत आहेत. आमचे बरेचसे नातेवाईक मुंबईमध्येच आहेत. त्यांचंही आम्हाला वेळोवेळी सहकार्य मिळालं आहे. आम्हाला कौटुंबिक कार्यक्रमांना उपस्थित राहणं शक्य नसतं हे त्यांनी स्वीकारलं आहे,’’ प्रीती पाटकर समाधानानं सांगतात. नातेवाईकांबरोबरच मुलांच्या मित्रांच्या पालकांचीही प्रीती आणि प्रवीण यांना भरपूर मदत झाली आहे. आपण काही तरी चांगलं काम करत आहोत हे लोकांना माहिती असतं तेव्हा ते आवर्जून मदत करतात, याचा अनुभव त्यांना वारंवार येतो.

प्रवीण त्यांच्या सहजीवनाचं सार थोडक्यात सांगतात, ‘‘जेव्हा कार्य हेच वैयक्तिक आयुष्य बनतं तेव्हा व्यक्तीच्या सामाजिक भूमिका खङ्ग बनतात. एकमेकांजवळ वावरताना त्यात चकमकीची ठिणगी न उडणे हे अस्वाभाविक आहे अनारोग्याचे लक्षण आहे. पण ज्याच्या त्याच्या ठिणग्या ज्याला त्याला विझवाव्या लागतात. ठिणगी सापडताच तेल ओतून त्याचा वणवा करू पाहणारे वडीलधारे, नातेवाईक,  सहकारी, आसपास असतील तर बगीचा खाक व्हायला वेळ लागत नाही. अशी माणसे मग कायम भळभळते व्रण घेउन उरलेला प्रवास करतात. वडीलधाऱ्यांनी आम्हाला आमची स्पेस दिली. त्यामुळे वैचारिक भूमिका प्रखर असूनही कधी ठिणग्यांचे वणवे झाले नाहीत.

आता आता कुठे या सहप्रवासाबद्दल थोडंफार कळू लागलं आहे. आमच्यामध्ये कोणी कुणाच्या पुढे नसतं ना कोणी कुणाच्या मागे. कोणी कुणाचा सूर्य नसतं ना कोणी कोणाची सावली. ना कोणी स्तंभ ना दीपस्तंभ, भयाण काळोखी गुहांमध्ये शिरण्याचा निर्णय सहमताने घेतलेला असतो. खांदे दुखले तरीही पाळीपाळीने तळव्यावर दिवा उंच उचलून धरीत आम्ही पुढे जात असतो कारण हा एक सहप्रवास असतो. असे आपण सहप्रवासी झालो की काळोखाला जागोजाग छिद्रे पाडीत अगणित काजवे बनून प्रकाश स्वत:हून आपल्या सोबतीला येतो.’’

निमा पाटील

nima_patil@hotmail.com