राम खांडेकर

जवळपास सर्वच खासगी साहाय्यक वा सचिव ‘होयबा’ का असतात, हे मला कधीच समजले नाही. तसेच बहुतांश मंत्र्यांना खासगी साहाय्यकाने दिलेला सल्ला का आवडत वा पटत नाही, हासुद्धा एक अभ्यासाचा विषय आहे. बहुतेक खासगी साहाय्यक मंत्र्यांच्या मागे मागे हातात दैनंदिन कार्यक्रमांची डायरी आणि नोटबुक घेऊन मुकाटय़ाने चालत असतात. गाडीतही मंत्र्यांच्या शेजारी बसायला खासगी साहाय्यकांना मिळत नसे. आधीच्या पंतप्रधानांकडेही हीच पद्धत असावी. मात्र, मी ती मोडीत काढली आणि पंतप्रधानांसोबत मागे त्यांच्या शेजारी बसू लागलो. साहाय्यकास पंतप्रधानांशी बोलण्याकरता, त्यांना काही विचारण्यासाठी हाच तर वेळ मिळतो!

medical treatment, pregnant minor, hospital , police complaint issue
अल्पवयीन गर्भवतीच्या उपचाराकरता इस्पितळाने पोलीस तक्रारीचा आग्रह धरणे अयोग्य…
israel hamas war
अग्रलेख : नरसंहाराची नशा!
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
deepak kesarkar
माझ्या विरोधात गंभीर गुन्हा दाखल नाही! शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे स्पष्टीकरण

मी नोकरीत कधीही माझे तत्त्व, ध्येय आणि सचोटीशी तडजोड केली नाही. कारण मी कधीच लाचार झालो नाही. तसेच मंत्र्यांकडून आणि पंतप्रधानांकडून कधी कसली अपेक्षा वा मागणी केली नाही. वसंतराव साठे यांच्याकडची एक आठवण सांगावीशी वाटते. साधारणत: प्रत्येक मंत्र्याकडे चतुर्थ श्रेणी नोकरांपैकी एक कोणीतरी त्या मंत्र्यांचा आवडता असतो. वसंतरावांच्या बाबतीत त्यांचा चालक हा त्यांचा अतिशय म्हणजे अतिशयच लाडका होता. त्यांच्या गाडीच्या लॉग बुकवर (दैनंदिन गाडीचा प्रवास) मी सही करीत असे. सरकारमध्ये ‘सफेद झूठ’चा जो प्रकार असतो, त्यापैकी हा एक. कारण मंत्र्यांच्या गाडीच्या दैनंदिन प्रवासाची नोंदविण्यात येणारी बरीच ठिकाणे ही खोटीच असतात. उदाहरणार्थ, मंत्र्यांची गाडी भाजी बाजारात गेली, तर तसे लिहिणे योग्य नसल्यामुळे त्याऐवजी एखादे सरकारी ठिकाण वा संसद सभासदांचे निवासस्थान प्रवासाचे ठिकाण म्हणून लिहिले जाते. हा प्रकार वर्षांनुवर्षे सुरू आहे.

एका ऑक्टोबरमध्ये पहिल्या आठवडय़ात लागून तीन सरकारी सुट्टय़ा आल्या होत्या. वसंतराव साठे आणि त्यांचे कुटुंब दिल्लीबाहेर होते, तर खासगी सचिव आठ दिवसांची सुट्टी मंजूर करून बाहेरगावी गेले होते. महिन्याच्या शेवटी तो चालक नेहमीप्रमाणे लॉग बुक सही करण्यासाठी घेऊन आला. त्याने या तिन्ही सुट्टय़ांमध्ये डय़ुटी केल्याचे दाखवले होते. कारण त्यावेळी महिन्यातील पहिल्या तीन सुट्टय़ांमध्ये चालक डय़ुटी करत असेल, तर त्यानंतरच्या सर्व सुट्टय़ांत त्याने केलेल्या डय़ुटीचा त्याला ‘ओव्हर टाइम’ मिळत असे. अर्थात, तो अराजपत्रित कर्मचाऱ्यांनाच मिळतो आणि तो पगाराच्या ५० टक्के असतो. इतर कर्मचाऱ्यांना ही मर्यादा ३३ टक्के होती. त्यामुळे प्रत्येकाचे एकच तत्त्व असते, की काही झाले तरी ५० टक्के ओव्हर टाइम आपल्याला मिळालाच पाहिजे. अनेकदा ते आठ-दहा दिवस सुट्टीवर असतात, पण ओव्हर टाइम बिल अशा तऱ्हेने तयार करतात, की ५० टक्के ओव्हर टाइम मिळायलाच हवा! मंत्र्यांच्या स्टाफचे ओव्हर टाइम बिल असल्याने त्याचे सहसा ऑडिटही होत नसे.

तर- त्या चालकाला लॉग बुकवर सही करण्यास मी नकार दिला. कारण बंगल्यावर कोणीच नव्हते, मग डय़ुटी कोणाची दाखवणार? शिवाय तीन दिवस गाडी कुठे गेली होती वा काही घटना घडली असेल तर..? असे संभाव्य प्रश्न ध्यानात घेऊन मी त्याला सही करण्यास स्पष्ट नकार दिला. त्याला हा आपला अपमान वाटला. रागात ते लॉग बुक त्याने फाडून टाकले आणि म्हणाला, ‘‘मैं साहब को बताऊंगा.’’ मी म्हटले, ‘‘जरूर सांग!’’ तो नक्कीच त्यांना सांगणार आणि मग मंत्रिमहोदय स्वत:च त्या लॉग बुकवर सही करण्याची शक्यता होती. मंत्रिमहोदय दिल्लीत आल्यावर त्याने त्यांना घडली गोष्ट सांगितली. त्यांनी वरिष्ठ खासगी सचिवांना या प्रकरणात लक्ष घालावयास सांगितले. त्या खासगी सचिवांनी त्यावर सही केली. त्यांनी मला हे सांगताच मी म्हटले, ‘‘तुम्ही तर सुट्टीवर होतात. मग सही कशी केली?’’ हे ऐकून त्यांचे धाबे दणाणले. परंतु ‘चिडियाँ चुग गई खेत’ अशी परिस्थिती होती!

नरसिंह रावांकडे मात्र असे काही नव्हते. ते सरळ, शांत स्वभावाचे, माणुसकीचा महामेरू होते. आपण पंतप्रधान आहोत याचा यत्किंचितही त्यांना गर्व नव्हता. त्यांची राहणी अगदी साधी होती. ते पूर्ण शाकाहारी होते. त्यांना कशाचेच व्यसन नव्हते. ते मंत्री असताना मात्र त्यांच्या स्वयंपाक्याने त्यांच्या या स्वभावाचा चांगलाच गैरफायदा घेतला होता. नरसिंह रावांकडे रुजू झाल्यानंतर काही दिवस मी बंगल्यात बसून काम करत असे. तेव्हा एकदा काही कामानिमित्त मी प्रथमच स्वयंपाकघरात गेलो होतो. तिथे भातासाठी काढून ठेवलेले तांदूळ पाहून मला धक्काच बसला, इतक्या कमी प्रतीचे ते तांदूळ होते. स्वयंपाक्याने त्यानंतर जे सांगितले ते ऐकून तर मला गरगरायलाच झाले. त्याने सांगितले, ‘‘नरसिंह रावांच्या नावाची शिधापत्रिका असून रेशनवरील धान्य आणूनच स्वयंपाक होतो. त्याच तांदळाचा भात मंत्र्यांसह सर्वासाठी होतो.’’ त्या तांदळाचा नमुना मी उचलून आणला आणि अनेकांना दाखवला. सर्वाची माझ्यासारखीच अवस्था झाली होती. पानात काय वाढले आहे याकडे नरसिंह रावांचे फारसे लक्ष नसे. विचारमग्न अवस्थेतच त्यांचे जेवण होई. परंतु अधूनमधून त्यांची मुले-मुली येत असत. पण त्यांच्यापैकी कोणाच्याच लक्षात ही गोष्ट कशी आली नाही याचे मला आश्चर्य वाटले.

पंतप्रधानांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करणे हा स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा एक विनोदी प्रकार आहे. गेल्या २५-३० वर्षांत तंत्रज्ञानात जग इतके पुढे गेले आहे, परंतु आपण मात्र आहोत तिथल्या तिथेच! मी पहिल्यांदा पंतप्रधानांसोबत पूरग्रस्त भागाचा दौरा केला तेव्हाचे दृश्य मला आठवतेय. सर्व बाजूला पाणीच पाणी. मधे मधे काही अर्धी, तर काही पूर्णपणे पाण्यात गेलेली घरे. एकाही माणसाचेच काय, पण पक्ष्याचेही दर्शन झाले नाही. त्यावेळी मला लहानपणची एक आठवण झाली. नागपूरला २५०-३०० फूट रुंद पात्र असलेली नाग नदी आहे. तिचा उगम एका मोठय़ा तलावाच्या ‘ओव्हर फ्लो’मधून झालेला आहे. त्यामुळे तिला फक्त पावसाळ्यातच भरपूर पाणी असते. इतर वेळी जे पाणी असते ते तिला मिळालेल्या नाल्यांचे. दोन दिवस सतत पाऊस झाला की या नदीला पूर यायचा आणि त्यावरील पुलापर्यंत पाणी वाढायचे. भरपावसात तो पूर पाहण्यास सर्व लहान-थोर मंडळी जात असत. असो. मुद्दा हा, की आता दिल्लीत बसूनही विमानातूनही जी दिसणार नाहीत ती दृश्ये पाहता येण्याची शक्यता तंत्रज्ञानामुळे उपलब्ध झालेली असताना हे का करायचं? पण ही परंपरा मोडून वाईटपणा घेणार कोण?

एकदा नरसिंह रावांसमोरही असाच प्रश्न उभा राहिला. दक्षिण भारतातील चार राज्यांत वादळ व अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले होते. पंतप्रधानांनी या भागाची पाहणी करावी असा आग्रह सुरू होता. नाही म्हणणेही शक्य नव्हते. परंतु त्यासाठी कामांचे दोन दिवस खर्च करणे अनाठायी होते. नरसिंह रावांनी मला बोलावून त्यांची ही अडचण सांगितली. मी त्यांना म्हणालो, ‘‘आपण एका दिवसात हा सगळा कार्यक्रम आटोपून रात्री मुक्कामाला दिल्लीत येऊ. कसे ते विचारू नका. ते माझ्यावर सोपवा!’’ मी ताबडतोब व्हीआयपी स्क्वाड्रनच्या विंग कमांडरशी बोललो. ‘‘चार राज्यांत पूरपाहणी करण्याकरता दौरा आखायचा आहे, तर विमान पूर्ण सुरक्षा गृहीत धरून जमिनीपासून कमीत कमी किती उंचीवरून उड्डाण करू शकते, हे मला सांगा. म्हणजे त्यानुसार कार्यक्रम आखून तुम्हाला कळवीन.’’ त्यांनी जो आकडा सांगितला तो पाहणीसाठी मला योग्य वाटला. मग मी वेळेची बचत होईल असा कार्यक्रम आखला.

सकाळी आठला दिल्लीहून आम्ही निघालो. साडेदहाला चेन्नई विमानतळावर पोहोचलो. तिथे पाँडिचेरी व केरळच्या मुख्यमंत्र्यांना बोलावले होते. राजभवनावर न जाता विमानतळावरील एका हॉलमध्ये मुख्यमंत्रीद्वय आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करून पूरस्थितीचा आढावा घेतला. मदतीच्या अपेक्षेचा आकडा त्यांच्याकडून जाणून घेतला. केन्द्र सरकारचे संबंधित अधिकारीही सोबत होतेच. एक वाजता बैठक संपल्यानंतर तमिळनाडू, पाँडिचेरी व केरळच्या मुख्यमंत्र्यांसोबत उड्डाण करून कमी उंचीवरून संथगतीने तमिळनाडू, पाँडिचेरी व केरळच्या काही भागांतील पूरग्रस्त भागाची पाहणी करत करत त्रिवेंद्रमला दोनला पोहोचलो. तिथून तमिळनाडू व पाँडिचेरीचे मुख्यमंत्री परत गेले. जेवण झाल्यावर विमानतळावरच केरळ व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसह बैठक होऊन पूरस्थितीचा आढावा घेतला आणि साडेपाचला त्यांना घेऊन दोन्ही राज्यांचा पूरग्रस्त भाग पाहत दिल्लीकडे प्रयाण केले. कर्नाटकमधील शेवटची १०-१२ मिनिटे पाहणी करताना कॅप्टनला उजेड कमी झाल्यामुळे विमान इतक्या खालून नेणे योग्य वाटले नाही. ते माझ्याकडे आले आणि त्यांनी  आपली अडचण मला सांगितली. मी त्यांना सुचवले, विमान हळूहळू उंचीवर न्या. पंतप्रधानांना समजावून सांगण्याची जबाबदारी माझी. तीन-चार मिनिटांनी मी पंतप्रधानांकडे गेलो. तिथे मुख्यमंत्रीही होतेच. त्यांना म्हटले, की आता खालचा भाग फारसा काही दिसत नाहीये, तर आपण दिल्लीकडे प्रयाण करायचे का? तोपर्यंत विमान बऱ्याच उंचीवर गेले होते आणि खाली काहीच दिसत नव्हते. त्यांनी होकार दिला. आम्ही रात्री नऊ वाजता दिल्लीला परतलो. मुख्यमंत्र्यांना हवे होते ते घडले. दुसऱ्या दिवशी राज्यातील व देशातील सर्व वर्तमानपत्रांतून ‘पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांसह पूरग्रस्त भागाला भेट’ या शीर्षकान्वये पहिल्या पानांवर बातम्या झळकल्या.

मुळात खासगी सचिव असतो कशासाठी? तर मंत्र्यांचे वा पंतप्रधानांचे प्रश्न व अडचणी सोडवण्यास हातभार लावण्यासाठी! तीन-चार महिन्यांनी मात्र मला विचार करण्याची वेळ आली, की पंतप्रधानांकडील आपले पद आणि विश्वास हे शाप आहे की वरदान? याचे कारण पंतप्रधानांकडील जबाबदारी पार पाडणे फारसे अवघड नव्हते; परंतु बाहेरील दुष्टचक्राला सामोरे कसे जायचे वा त्याचा सामना कसा करायचा, हा अवघड प्रश्न माझ्यापुढे व माझी पत्नी स्नेहलता हिच्यासमोर आ वासून उभा राहिला होता. काही वेळा तर मी या निर्णयाप्रतही आलो होतो, की या जबाबदारीतून आपण ताबडतोब मोकळे व्हायचे; अन्यथा आतापर्यंत निग्रहाने पाळलेल्या आपल्या तत्त्वांना व सचोटीला कलंक लागल्याशिवाय राहणार नाही.

उद्योगपती आणि त्यांच्या लायझन अधिकाऱ्यांकडून तुम्हाला विकत घेण्यासाठी  मोहात पाडण्याचे सर्व तऱ्हेचे प्रयत्न केले जातात. दिल्लीत हे वर्षांनुवर्षे चालत आलेले आहे. हे प्रयत्न यशस्वीही होत असणार. म्हणूनच तर ही परंपरा आजतागायत चालू राहिलेली आहे. तुम्ही त्यांच्यावर कितीही रागवा, त्यांना हात धरून बाहेर काढा; परंतु त्यांना त्याचे काहीच वाटत नाही. यात आपला अपमान होत असल्याचेही त्यांना वाटत नाही. सुदैवाने माझी पत्नी कर्मयोगी व स्थितप्रज्ञ होती, हे माझे भाग्य. ती एका गरीब, मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली होती. तिचे वडील हेडमास्तर होते. तिच्या लहानपणीच ते वारले. दोन भावांनी आपल्या क्लार्कच्या नोकरीत संसार सांभाळून तीन बहिणींची लग्ने केली होती. त्यामुळे माझ्या पत्नीची राहणी अगदी साधी होती. तिला कसलीही अपेक्षा वा आशा नव्हती. नटण्याचीही हौस नव्हती. ‘कर्मयोगी’ यासाठी म्हणतो, की विवाहानंतर स्त्रियांना प्रिय असलेला सोन्याचा एकही दागिना खरेदी करण्यासाठी आम्ही कधी सोन्याच्या दुकानात पाऊल ठेवले नव्हते. याला अपवाद दोन मंगळसूत्रांचा. विशेष म्हणजे मी अनेक देशांचा दौरा केला, पण तिने व मुलगा मुकुल याने एकाही वस्तूची कधी मागणी केली नाही. तिने कधी साडय़ांसाठीही आग्रह धरला नाही. लग्नकार्यात मिळालेल्या वा मी आणलेल्या साडय़ा हाच तिचा संग्रह होता. मोठय़ा सणाला वा लग्नकार्यात ती आईने दिलेली चेन आणि वेणूताईंनी (यशवंतराव चव्हाणांच्या पत्नी) एका संक्रांतीला दिलेला कोल्हापुरी साज हेच दागिने ती घालत असे. तिलाच जास्त या अशा लोकांना तोंड द्यावे लागे. कारण माझी भेट वारंवार होणे हे या मंडळींसाठी दुरापास्त असे.

तुम्हाला विकत घेण्याचे पहिले पाऊल असते ‘पाकीट’ संस्कृती! ती देशात सर्वदूर बहुतेक कार्यालयांत प्रचलित आहे. दुसरे म्हणजे संबंधित कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला मोहात पाडणे. लायझन अधिकारी त्यात अनुभवी असतात. उद्योगपती पंतप्रधानांना भेटण्यास आले की त्यांचे अधिकारी मला पाकीट घेण्यासाठी आग्रह करीत. कधी ते घरी जाऊन माझ्या पत्नीला पाकीट देण्याचा प्रयत्न करीत. मी साध्या क्लार्कपासून जॉइंट सेक्रेटरीच्या पदापर्यंत पोहोचल्यामुळे खर्चापेक्षा पगार बराच होता. आम्हा दोघांना कसले व्यसन नव्हते. कपडय़ांचेही आम्ही शौकीन नव्हतो. मग या पैशाचे करायचे काय? त्यांना नको-नको म्हणत बाहेर काढताना आम्हाला नाकीनऊ येत. एक लायझन अधिकारी अयशस्वी ठरला की दुसरा आपले तंत्र वापरण्यासाठी सरसावे. हा प्रकार दोन वर्षे सुरू होता.

दुसरा प्रकार उद्योगपतींकडून व्हायचा. बहुतेक उद्योगपती भेटण्यास आले की म्हणत, ‘‘आज से आपकी जिम्मेदारी हमारी. आप अपने काम में ध्यान दिजीए और हम कुटुंब की जिम्मेदारी संभालेंगे. दिल्ली में हम आपको कही भी फ्लॅट लेकर देंगे, जिससे निवृत्ती के बाद आपकी जिंदगी आराम से कटेगी. आप नागपूर के हैं, तो वहाँ भी एकाद् मकान, फ्लॅट या प्लॉट लेकर देंगे. इतना ही नहीं आप अपनी कोई भी- याने कोई भी माँग करो, वह पुरी होगी.’’ वाचकहो, ‘कोई भी- याने कोई भी’चा मथितार्थ आपण समजायचा तो समजून घ्या!

तिसरा प्रकार जो सर्वसाधारणपणे वापरला जातो, तो म्हणजे पंचतारांकित हॉटेलांमध्ये जेवण! हे काम लायझन अधिकाऱ्यांचे असते. त्यांना माहीत असते, की सर्वसामान्य माणसाने कधी पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवणच काय, पण दारातून प्रवेशही केलेला नसेल. या मोहाला बळी पडण्याची शक्यता जास्त असते. चौथा प्रकार तुमच्या नावावर एखादी मालमत्ता करून देण्याची तयारी! यासाठी कायदेशीर कागदपत्रे अशा तऱ्हेने तयार केली जातात, की ती मालमत्ता तर तुमचीच राहते, परंतु वरकरणी ती तुमची आहे असे कोणीही सिद्ध करू शकत नाही. ही वकिलांच्या चलाखीची किमया असते. तुम्हाला खरे वाटणार नाही, पण हे सगळं सत्य आहे. त्यावेळी नव्या अ‍ॅम्बेसिडर गाडीची किंमत दीड लाखाच्या आसपास असावी. ती मला कायदेशीररीत्या माझ्याकडून दहा हजारांचा चेक घेऊन ‘सेकंड हॅण्ड’ म्हणून विकत देण्याची तयारीसुद्धा एका उद्योगपतींनी दाखवली होती. हे तो कसे करणार होता याची मला कल्पना नाही. परंतु त्याने खात्री दिली होती, की ती नवीन  असूनही ती नवी नाही अशीच कागदपत्रे राहतील.

एकुणात, सारे मती गुंग करणारे होते. असो!

ram.k.khandekar@gmail.com