विश्वातील कृष्णद्रव्याचे गूढ जवळपास उलगडत आले असून येत्या दोन आठवडय़ात त्याबाबतचा महत्त्वपूर्ण शोध जाहीर होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील ‘अल्फा मॅग्नेटिक स्पेक्ट्रोमीटर’ या कण संकलकातील निरीक्षणांच्या नोंदीची माहिती लवकरच जाहीर केली जाणार आहे, असे मॅसॅच्युसेटस इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेचे भौतिकशास्त्रज्ञ सॅम्युअल टिंग यांनी सांगितले. अल्फा मॅग्नेटिक स्पेक्ट्रोमीटरच्या प्रयोगात नेमके काय निष्कर्ष हाती आले याबाबत टिंग यांनी काहीच सांगितले नाही, परंतु त्यात कृष्णद्रव्याच्या अस्तित्वाचा उलगडा होणार असल्याचे त्यांनी सूचित केले आहे. विश्वातील एकूण वस्तुमानाच्या बरेचसे वस्तुमान हे कृष्णद्रव्याच्या स्वरूपात असल्याचे सांगितले, हा काही किरकोळ शोधनिबंध नाही असे टिंग यांनी ‘अमेरिकन असोसिएशन फॉर अ‍ॅडव्हान्समेंट ऑफ सायन्स’ या संस्थेच्या वार्षिक सभेत सांगितले.
या संशोधनातील निष्कर्ष इतके महत्त्वाचे आहेत की, तो किमान तीस वेळा पुन्हा लिहिण्यात आला आहे. कृष्णद्रव्याच्या आकलनाबाबत ही एक छोटीशी पायरी आहे, पण ते त्याचे अंतिम उत्तर असणार नाही असे त्यांनी सूचित केले आहे. भौतिकशास्त्रातील काही सिद्धांतानुसार कृष्णद्रव्य हे विम्प्स म्हणजे क्षीण आंतरक्रिया असलेल्या जास्त वस्तुमानाच्या कणांचे बनलेले असते. जेव्हा वस्तुमान व प्रतिवस्तुमान यांच्यातील सहभागी घटक एकत्र येतात तेव्हा ते एकमेकांना नष्ट करतात. जर दोन विम्प्सची टक्कर झाली तर ते नष्ट होतात व त्यातून कणांची जोडी तयार होते. त्यात इलेक्ट्रॉन व पॉझिट्रॉन यांचा समावेश असतो. अल्फा मॅग्नेटिक स्पेक्ट्रोमीटर हा आकाशगंगेतील कृष्णद्रव्याच्या नष्ट होण्याच्या क्रियेत तयार झालेले पॉझिट्रॉन व इलेक्ट्रॉन शोधून काढू शकतो. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात हे यंत्र मे २०११ मध्ये बसवण्यात आले असून त्याने आतापर्यंत २५ अब्ज कण शोधले आहेत; त्यात ८ अब्ज इलेक्ट्रॉन व पॉझिट्रॉन यांचा समावेश आहे. या प्रयोगात जर मोठय़ा प्रमाणात विशिष्ट ऊर्जेचे पॉझिट्रॉन सापडले तर त्यातून कृष्णद्रव्याचा उलगडा होऊ शकतो.